Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ
, मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (13:20 IST)
स्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, तरीही मनामध्ये एक प्रश्र्न निमित्तमात्रे रेंगाळत राहतो की, स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य या स्थित्यंतराच्या आधीचा समृद्ध भारत आपल्याला पुन्हा निर्माण करता येईल का?
 
या बाजूंनी विचार व चिंतन करताना बर्‍याच त्रुटी आपल्यासोर येत राहतील. या त्रुटी आपल्या वागण्यातून आणि राष्ट्रभक्तीतून दूर करू पाहाणार्‍या एकेक भारतीय सुपुत्राला भारताता साद घालते आहे. ती साद ऐकून राष्ट्रीय कर्तव्ये आपल्या काळजात भिनवणे म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करणे होय.
 
खरे तर किती साध्या साध्या गोष्टींमध्ये चुकतोय आपण? महासत्ता हे साध्य भारताला साध्य करायचे असेल तर आपले सार्वजनिक जीवनातले वर्तन परिवर्तनाच्या दिशेने व्हायला हवे..
 
72 वर्षांपूर्वी दीडशे वर्षांचे पारतंत्र्य भारताने सोसले. पारतंत्र्याच्या या दीडशे वर्षांआधीचा वैभवशाली भारत आजही इतिहासाच्या पाऊलखुणातून काळजाला साद घालतो. तत्कालीन राजेशाहीध्ये अंतर्गत वर्चस्व प्रस्थापित करताना माजलेली बेदिली आणि मतभेदामुंळे महाकाय खंडप्राय प्रदेशाचे सार्वभौत्व या द्यावर एकत्र येण्याचा अभाव होता. याचा फायदा घेऊन पाश्चात्य साम्राज्यवादाने भारताच्या पवित्र मातीत आपली पाळेमुळे पसरायला सुरूवात केली. भौगोलिक समृद्धीचा मागोवा घेत व्यापार करता करता इंग्रज राज्यकर्ते बनले.
 
तत्कालीन ब्रिटिश राजनीतीमध्ये सांस्कृतिक आक्रमणाचा प्रयत्न व सत्तेवर पूर्ण अंकुश ठेवण्यासाठी कठोर शासनाची व्यूहरचना आदी बाबीमुंळे भारतीय विचारवंतांमध्ये असंतोष पसरत गेला.
 
मुळातच भारतीय माती समृद्धी आणि स्वाभिमानाने भरली आहे. त्यामुळे परकीय सत्तेच्या आश्रयाखाली मान मोडून राहाणे भारतीयांना शक्यच नव्हते. तरीही पारतंत्र्यामुळे तुकड्या तुकड्यात विभागलेल्या आणि एकमेकांशी भांडत बसलेल्या राजेशाहीचा अस्त आणि नव्या एकसंध प्रशासनव्यवस्थेचा उगम या दोन गोष्टी ब्रिटिशांनी आपल्याला आपल्या विकसनाकरिता दिलेल्या अनमोल देणग्याच म्हणाव्या लागतील. या प्रशासनव्यवस्थेतील आपली भारतीय म्हणून जी काही शासनप्रणाली विकसित करावी लागली असती त्याव्यवस्थेचा बराचसा पाया ब्रिटिशांनी त्यांच्या कठोर नियावलीतच घातला होता. ही एक पारतंत्र्यातही आपल्याला मिळालेली चांगली गोष्ट होय.
 
असे असले तरी आज आपण आपल्याच देशाच्या उन्नतीकरिता केलेले नियम व घटना संपूर्णपणे पाळतो आहोत का? हा चिंतनाचा विषय व्हायला हवा. भारतीय नागरिक म्हणून भारताच्या साध्या साध्या नियमांची व व्यवस्थापनाच्या साध्या साध्या तत्त्वांची आपण हेळसांड करतोय का? याचाही विचार प्रत्येक राष्ट्रीय सणाला आपण करायला हवा.
 
एस.टी. बस ही सर्वसामान्य माणसाच्या दळणवळणाची रक्तवाहिनी आहे. मग गाडी प्लॅटफॉर्मला   लागताना आपल्याकडे स्वयंशिस्तीने रांग होते का? प्रचंड ढकलाढकली आणि रांग वगैरे काही असते किंवा करायची असते याचा किती विसर पडत असतो आपल्याला! प्रत्येकाला वाटते की नियम लागू व्हायला हवेत, परंतु माझा नंबर झाल्यावर! अशाने येथील सार्वजनिक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे वारंवार दिसते. 
 
बसमध्ये ढकलाढकली ही तर नित्याचीच बाब आहे. पण कोणत्याही समाजाच्या आंदोलनाकरिता एस.टी. बस खुशाल जाळल्या जातात, फोडल्या जातात हे योग्य नव्हे. सार्वजनिक मालमत्ता आणि सर्वसामान्य माणूस यांचं नातं असतं. उदा.- एखादा साधा कामगार किंवा नोकरदार कधी स्वतःच्या कारने कामाला किंवा काम झाल्यावर घरी जाऊ शकणार आहे का? तरीही याच बसने जा-ये करणारी माणसे जेव्हा बसेसची तोडफोड करतात त्यावेळी आश्चर्य वाटते. त्याचबरोबर शांततापूर्ण मार्गाने आंदोलने केल्यावर सरकारला जाग येत नाही. असा सरकारबद्दल अविश्र्वास सामान्य माणूस किंवा आंदोलक यांच्यात दिसून येतो. परिणामतः एखादा प्रश्र्न सुटताना दुसरीकडे सार्वजनिक व्यवस्थापनावर व राष्ट्रीय आस्थापनेवर हिंसात्मक ओरखडे उठत राहतात.
 
रेल्वे, बसेस वा दळणव्यवस्था बंद पाडल्याशिवाय आपली दखल घेतली जात नाही असे एखाद्या देशातील नागरिकांना वाटत असेल, आणि सरकारकडूनही यावर चिंतन होत नसेल; तर एकुणात आपल्या देशाला प्रगती करण्यासाठी अजून खूपच प्रयत्न करावे लागतील, हे सत्य होय.
 
भारत हा माझा देश आहे. माझा म्हणून मी त्याची काळजी घेईन एवढे जरी वाटले, आणि ते आचरण्यासाठी चार पावले टाकली तरी स्वातंत्र्याचा अर्थ आम्हास समजला असे म्हणावे लागेल.
 
दीपक कलढोणे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

...तर 10 ऑगस्टला पृथ्वीवर येऊ शकते भयानक आपत्ती, NASA ने शोधला पृथ्वीला टक्कर देणारा एस्टेरॉयड