Afghanistan earthquake अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात शनिवारी (7 ऑक्टोबर) ला आलेल्या तीव्र भूकंपानंतर बचावकार्य वेगाने सुरू आहे.
या भूकंपानंतर अफगाणिस्तानात संपर्काची साधनं पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. बचावकार्यासाठी दूरच्या भागात जाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत. संयुक्त राष्ट्र आणि अन्य संस्था जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात आहे.
सर्वाधिक प्रभावित गावांमध्ये बहुतांश घरं ही मातीची होती.
हेरात येथील राहिवासी बशीर अहमद यांचं कुटुंब यांच्यापैकीच एका गावात राहत होतं. त्यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं की भूकंपाच्या पहिल्या झटक्यातच सर्व घरं जमीनदोस्त झाली.
ते म्हणाले, “जे घरात होते ते तिथेच गाडले गेले. त्या कुटुंबियांची आम्हाला काहीही माहिती नाही.”
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 465 घर जमीनदोस्त झाली आहेत.
गावातले लोक हाताने ढिगारा बाजूला करून जिवंत लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
घरं उद्धवस्त झाल्यानंतर दुसरी रात्र लोकांना उघड्यावर व्यतित करावी लागली.
तालिबान सरकारच्या मते या भूकंपात 2000 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा ठोस आकडा नाही.
हेरान प्रांत इराणच्या सीमेपासून 120 किलोमीटर दूर आहे. ही अफगाणिस्तानची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. या भागाची लोकसंख्या 19 लाखाच्या आसपास आहे.
अफगाणिस्तानमध्ये भूकंप येत राहतो. विशेषत: हिंदूकुश भागात. गेल्या वर्षी डजून च्या प्रक्तिका प्रांतात 5.9 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात 1000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो लोक बेघर झाले होते.
हा भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. भूकंप झाल्यानंतर बराच वेळ धक्के जाणवत होते. भूकंपामुळे इराणच्या सीमेलगत असलेल्या हेरात शहरातील इमारतींचं मोठं नुकसान झालं आहे.
या भूकंपात बचावलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आधी तिथल्या इमारती जोरजोरात हलल्या आणि त्यांच्यावर कोसळल्या.
“आम्ही आमच्या ऑफिसमध्ये होतो आणि अचानक बिल्डिंग हलायला लागली. भिंतीवरचं प्लॅस्टर निघालं, आणि भिंतींना भेगा पडू लागल्या. भिंतींचा आणि इमारतीचा काही भाग कोसळला,” असं हेरात येथील राहिवासी बशीर अहमद यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं.
“मी माझ्या कुटुंबाशी संपर्क साधू शकत नाहीये. नेटवर्क नाहीये. मला खूप काळजी वाटतेय आणि मी घाबरलोय. हा भूकंप भीषण होता,” असं त्यांनी म्हटलं.