- केली एनजी
जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आता देशात त्सुनामीच्या लाटा उसळू लागल्या आहेत.
जपानमधून येत असेल्या वृत्तांनुसार, देशाच्या मध्यवर्ती भागात काही मीटर उंच त्सुनामीच्या लाटा उसळू लागल्या आहेत. या लाटा या भागातील किनारपट्टीपर्यंत पोहोचू लागल्या आहेत.
जपानच्या राष्ट्रीय प्रसारक एनएचके (NHK) ने सांगितलं, "इशिकावा प्रांतातील वाजिमा शहरात 1.2 मीटर उंच समुद्राच्या लाटा दिसल्या. तोयामा प्रांतातील तोयामा शहरातही त्सुनामीमुळे समुद्रात लाटा उसळताना दिसत होत्या.
"इशिकावा प्रांतातील किनारी नोटो भागातील रहिवाशांना "ताबडतोब उंचवटा असणाऱ्या भागात जाण्यास सांगितलं गेलं आहे."
जपानच्या हवामान विभागाने 'या भागातील लाटा 5 मीटरपर्यंत पोहोचू शकतात,' असा इशारा दिला आहे.
अधिकाऱ्यांनी शेजारच्या निगाटा आणि तोयामा प्रांतांसाठी देखील त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.
या भागात तीन मीटर उंचीच्या लाटा उसळतील, असा इशारा देण्यात आला आहे.
2011 मध्येही जपानमध्ये जोरदार भूकंप झाला होता. यानंतर त्सुनामी येऊन खूप नुकसान झालं होतं. यामुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागला होता.
2011 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे जपानचा अणु प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता.