इंडोनेशियात तीन चर्चच्या प्रार्थनेच्यावेळी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांमध्ये किमान 11 जण ठार झाले तर किमान डझनजण जखमी झाले आहेत. मोटरसायकलवरून आलेल्या या आत्मघातकी हल्लेखोरांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.
या बॉम्बस्फोटांपैकी पहिला हल्ला सुराबाया शहरातील सांता मारिया रोमन कॅथोलिक चर्चवर झाला. तेथील बॉम्बस्फोटामध्ये चौघेजण ठार झाले. यामध्ये एक हल्लेखोरही मारला गेला, असे पोलिस प्रवक्ते फ्रान्स बारुंग मान्गेरा यांनी वार्ताहरांना सांगितले. या स्फोटामध्ये एकूण 41 जण जखमी झाले. त्यामध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या स्फोटानंतर काही मिनिटातच दिपोनेगोरो चर्चवर आणि त्यानंतर पान्तेकोस्ता चर्चवरही अशाचप्रकारे आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. हे बॉम्बस्फोट किमान 5 हल्लेखोरांनी घडवले होते. त्यामध्ये बुरखाधारी एका महिलेचाही समावेश होता. या महिलेबरोबर दोन लहान मुलेही होती. तिला दिपोनेगोरो चर्चच्या बाहेर अडवण्यात आले होते. मात्र तिने आत घुसून एका व्यक्तीला मिठी मारली आणि बॉम्बचा स्फोट झाला, असे एका सुरक्षा रक्षकाने सांगितले.
अध्यक्ष जोको विदोदो यांनी सुरबाया येथील घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीची पहाणी केली. अल्पसंख्यांक ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करण्यासाठी झालेल्या या हल्ल्यांचा अध्यक्षांनी निषेध केला आहे. 2000 साली ख्रिसमसच्या रात्री अशाच प्रकारे चर्चवर झालेल्या हल्ल्यांमध्ये 15 जण मरण पावले होते. तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.