Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीन कोरोना : नान्जिंग प्रांतातला संसर्ग वुहानपेक्षाही भयंकर, चीनच्या सरकारी माध्यमांचा दावा

चीन कोरोना : नान्जिंग प्रांतातला संसर्ग वुहानपेक्षाही भयंकर, चीनच्या सरकारी माध्यमांचा दावा
, शनिवार, 31 जुलै 2021 (21:20 IST)
चीनच्या नान्जिंग शहरामधून सुरू झालेल्या कोव्हिड-19ची साथ 5 प्रांतांमध्ये आणि बीजिंगमध्ये पसरली असून वुहाननंतरचं हे सर्वांत मोठं संक्रमण असल्याचं चीनच्या सरकारी माध्यमांनी म्हटलंय.
 
20 जुलैला नान्जिंग शहरातल्या विमानतळावर पहिल्यांदा हा व्हायरस आढळला आणि त्यानंतर आतापर्यंत जवळपास 200 जणांना याची लागण झालेली आहे.
 
आता नान्जिंग विमानतळावरची सगळी उड्डाणं 11 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलंय.
 
असा संसर्ग पसरणं हे यंत्रणेचं अपयश असल्याची टीका होत असतानाच आता संपूर्ण शहरात टेस्टिंग करण्यात येतंय.
 
या शहरामध्ये राहणाऱ्या 93 लाख लोकांच्या चाचण्या करून घेण्यात येणार आहेत. यामध्ये काही दिवसांसाठी या शहरात आलेल्यांचाही समावेश असेल, असं सरकारी मालकीच्या शिनहुआ न्यूजने म्हटलंय.
लांबच लांब रांगांमध्ये उभे लोक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या मेसेजेसमध्ये पाहायला मिळतात. अधिकाऱ्यांनी या लोकांना मास्क घालण्याची, 1 मीटर अंतर ठेवून उभं राहण्याची आणि रांगेत उभं असताना एकमेकांशी बोलणं टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
या संसर्गासाठी डेल्टा व्हेरियंट कारणीभूत असून विमानतळ जास्त गजबजलेला असल्याने रुग्णसंख्या वाढली असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
 
10 जुलैला रशियाहून शहरात आलेल्या विमानातील सफाई कर्मचाऱ्याशी या रुग्णांचा संबंध असल्याचं नान्जिंगचे आरोग्य अधिकारी डिंग जी यांनी सांगितलं.
 
या सफाई कर्मचाऱ्यांनी सफाईसाठीचे कठोर नियम पाळले नसल्याचं शिनहुआ न्यूजने म्हटलंय.
 
याबद्दल विमानतळाच्या मॅनेजमेंटला कानपिचक्या देण्यात आल्या असून या प्रकरणी योग्य देखरख ठेवण्यात आली नसून मॅनेजमेंट 'अनप्रोफेशनल' वागल्याचं कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नियामकांनी म्हटलंय.
 
हा व्हायरस चेंगडू आणि राजधानी बीजिंगसह किमान 13 शहरांमध्ये पसरल्याचं चाचण्यांमधून आढळलंय.
पण असं असलं तरी हा संसर्ग अजूनही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असून नियंत्रणात आणला जाऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत असल्याचं ग्लोबल टाईम्सने म्हटलंय.
 
नान्जिंगमध्ये संसर्ग झालेल्यांपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
 
चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या लशी डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी आहेत का, याविषयीची चर्चा या संसर्गामुळे चीनमधल्या सोशल मीडियावर सुरू झालेली आहे.
 
पण ज्यांना हा संसर्ग झालाय, त्यांनी लस घेतली होती का हे अजून स्पष्ट नाही.
 
चीनच्या लशी वापरणाऱ्या काही दक्षिण आशियान देशांनी आपण इतर लशी वापरणार असल्याचं नुकतंच जाहीर केलं होतं.
 
आतापर्यंत चीनने आपल्या सीमा बाहेरच्या प्रवाशांसाठी बंद ठेवत आणि स्थानिक संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने पावलं उचलत एकूणच साथ आटोक्यात ठेवलेली आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला, त्याची लढत ऑस्ट्रेलियाशी होईल