रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनने ड्रोन हल्ल्याने मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रशियाने केला आहे. मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळलाय. 3 मे रोजी रशियन माध्यमांवर एक व्हीडिओ क्लिप झळकू लागली, ज्यात राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर अर्थात क्रेमलिनवर एक स्फोट होताना दिसतोय. रशियन सुरक्षा यंत्रणेचा दावा आहे की हा युक्रेनने केलेला ड्रोन हल्ला होता.
पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी हे आरोप फेटाळत म्हटलंय की, “आम्ही पुतिन किंवा मॉस्कोवर हल्ला करणार नाही. आम्ही आमच्या देशात राहूनच, आमची शहरं, आमची गावं वाचवतोय.”
पण वर्षभरापासून युद्धात अडकलेल्या दोन देशांमध्ये तणाव आणखी वाढलाय. खरंच रशियन राष्ट्राध्यक्षांवर असा हल्ला होऊ शकतो का?
24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. तेव्हापासून हजारो सैनिकांचा आणि नागरिकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे. आणि हे युद्ध आजही कुठे शमताना दिसत नाहीय.
आणि आता या कथित ड्रोन हल्ल्यामुळे रशिया युक्रेन युद्ध आणखी चिघळू शकतं का? की या हल्ल्यामुळे रशियाचीच नाचक्की झाली आहे?
कुणाचा रणनीती? कुणाची फजिती?
खरंतर ड्रोनचा वापर रशिया युक्रेन युद्धात सुरुवातीपासूनच होतोय. आधीच कडाक्याच्या थंडीत रशियाला युक्रेनमध्ये बराच संघर्ष करावा लागत होता, त्यातच युक्रेनी सैन्य ड्रोनच्या मदतीने रशियन सैन्याचं लोकेशन हेरून त्यांना लक्ष्य करत होतं. त्यामुळे हे पहिलंच असं आधुनिक युद्ध म्हणता येईल ज्यात ड्रोन इतकी महत्त्वाची भूमिका बजावतायत.
पण गेल्या काही काळात, खासकरून 2023च्या सुरुवातीपासून असे किमान 20 ड्रोन हल्ले झालेत, खासकरून रशियामध्ये.
यात कधी इंधन साठवलेल्या डेपोंना लक्ष्य करण्यात आलंय, कधी वायुदलाच्या तळांना, कधी रेल्वे रुळांना तर कधी साध्या गावांनाही. आणि आताचं ताजं लक्ष्य ठरलाय राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान.
पण क्रेमलिनवरचा हा हल्ला खरंच युक्रेनने केला असावा का?
मध्यंतरी युक्रेनचे डिजिटल क्रांती मंत्री मायखेयलोव्ह फेडोरोव्ह म्हणाले होते की युक्रेनकडे आता एक शक्तिशाली R18 ड्रोन आलाय, “जो युक्रेनची राजधानी कीव्हपासून मॉस्कोला जाऊन परतही येऊ शकतो,” म्हणजे सुमारे 1700 किमी अंतर.
आतापर्यंत युक्रेनने रशियामध्ये झालेल्या कुठल्याही ड्रोन हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाहीय. पण ड्रोन तज्ज्ञ स्टीव्ह राईट म्हणतात क्रेमलिनवरचा ड्रोन जर युक्रेननेच सोडला असेल तर तो युक्रेनमधून लाँच करण्याची शक्यता कमीच आहे. तो त्यापेक्षा क्रेमलिनच्या जास्त जवळहून उडवला गेला असावा, असं त्यांना वाटतं.
मात्र जर हा हल्ला खरंच झाला असेल तर, क्रेमलिनच्या इतक्या जवळ एका परकीय शक्तीचा ड्रोन येणं, यामुळेच रशियाची एकप्रकारे पोलखोलसुद्धा होताना दिसतेय. ती कशी?
पुतिन यांची सुरक्षा व्यवस्था कशी असते?
पुतिन जगातल्या सर्वांत जास्त सुरक्षा असलेल्या व्यक्तींपैकी एक मानले जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदारी फेडरल गार्ड सर्व्हिस किंवा FSO नावाच्या एका एजंसीवर असते, जशी भारतात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप किंवा SPGआहे.
पुतिन त्यांचा बहुतांश कारभार क्रेमलिनमधूनच हाकतात. मॉस्कोमधल्या सर्वांत महत्त्वाच्या आणि सर्वांत सुरक्षित अशा या कंपाउंडमध्ये पूर्वी रशियाचा झार राहायचा. आज तिथे राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान, सरकारी कार्यालयं आणि काही रहिवासी इमारती आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार पुतिन यांनी मधल्या काळात एका अपार्टमेंटमध्येही बराच वेळ घालवल्याचं म्हटलं होतं. पण तरीही त्यांचा नियमित मुक्काम आणि ऑफिस हे क्रेमलिनमधलंच त्यांचं निवासस्थान आहे.
त्यांच्या गाड्यांचा ताफा अर्थातच कुठल्याही दुसऱ्या राष्ट्राध्यक्षासारखाच लांब, सुरक्षा उपकरणांनी सज्ज आणि शक्तिशाली असतो. त्यांच्या तफ्याच्या प्रवासावेळी मॉस्कोमध्ये नेहमीच एअरस्पेस बंद केली जाते आणि शहरातल्या ट्राफिकवरही निर्बंध लादलेले असतात.
कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात पुतिन यांच्या अवतीभवतीचं वातावरण हे कायम नीटनेटकं आणि सुनियोजित दिसतं.
अनेकदा तर तेच ते लोक त्यांच्या अवतीभवती वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या वेशांमध्ये दिसल्यावरूनही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुतिन एखाद्या व्हीडिओमध्ये जर त्यांच्या ऑफिसमध्ये काम करताना किंवा भाषण देताना दिसत असतील, तर ते कुठे आहेत, हे कधीच ठामपणे सांगता येणार नाही.
APवृत्तसंस्थेच्या एक बातमीनुसार त्यांनी अनेक शहरांमध्ये ऑफिसेस तयार करून घेतलेले आहेत, जिथे अगदी टेबलपासून ते भिंतीवरच्या चित्रांपर्यंत, सारंकाही हुबेहूब असतं.
इतकंच काय तर एखाद्या संवेदनशील आणि धोक्याच्या ठिकाणी पुतिन हे बॉडी डबल वापरतात, म्हणजे त्यांच्यासारखीच दुसरी एक व्यक्ती लोकांमध्ये असते, असाही आरोप अनेकदा झाला आहे. पण पुतिन यांनी तो फेटाळला सुद्धा आहे.
पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्यांच्या सेक्युरिटी ताफ्यात 13 वर्षं काम केलेल्या एका अधिकाऱ्याने ऑक्टोबर 2022मध्ये रशियामधून पळ काढला होता.
नंतर लंडनस्थित Dossier Center या पुतिनविरोधी माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत त्या अधिकाऱ्याने सांगितलं होतं, की पुतिन यांच्याकडे कधीच स्वतःचा मोबाईल फोन नसतो. त्यांना नेहमी सर्व माहिती त्यांच्या आजूबाजूला असलेले त्यांचे विश्वासू लोकच देत असतात, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं होतं.
पण हो, पुतिन कुठेही गेलेत, की त्यांना रशियाचे शासकीय टीव्ही चॅनल्स पाहायचे असतात, असंही त्याने सांगितलं.
आता इतकी शक्तिशाली, सुरक्षा व्यवस्था असलेल्या व्यक्तीवर ड्रोन हल्ला झाल्याचं रशियाने म्हटलं आहे, तर यात नक्कीच रशियाचा कमकुवतपणा दिसतो, असं तज्ज्ञ सांगतात.
पण आता युक्रेनला भीती आहे की या कथित हल्ल्याचं कारण सांगत मॉस्को रशियामध्ये युक्रेनविरोधी भावना आणखी आणि त्यासोबतच त्यांचा हल्ला आणखी तीव्र करेल.
Published By- Priya Dixit