सिगारेटच्या अर्धवट जळालेल्या तुकड्यांनी नेदरलँडवासीय हैराण झाले असून या तुकड्यांचे ढीग रसत्यांवर साचले आहेत. अखेर यावर नामीशक्कल म्हणून कावळ्यांना कामाला जुंपण्यात आले आहे. कावळ्यांकडून हे काम करुन घेण्यासाठी एक खास चमू काम करत आहे.
सर्व पक्ष्यांमध्ये कावळ्याला सर्वाधिक बुद्धिमान पक्षी समजले जाते. त्यामुळे हे काम त्याच्याकडे सोपविण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले. नेदरलँडमध्ये वर्षाला साधारण 60 लाख टन सिगारेटच्या थोटकांचा कचरा जमा होतो. हा कचरा साफ करण्यासाठी 12 वर्षे लागतील, असा अंदाज आहे. त्यामुळे कावळ्यांच्या मदतीने हा कचरा साफ करण्याची कल्पना क्रोटेड सिटी या कंपनीने काढली. रूबन व्हॅन डेर आणि बॉब स्फीकमेन हे या कंपनीचे संस्थापक आहेत.
या कंपनीने आधी नेदरलँडमधील निवडक ठिकाणच्या कावळ्यांना प्रशिक्षण दिले. रसत्यावर पडलेले थोटक उचलून ते जागोजागच्या कुंड्यांमध्ये टाकायला त्यांना शिकविण्यात आले. त्याबदल्यात या कावळ्यांना भरपूर खायला देण्यात येते. सध्या हे कावळे थोटके व्यवस्थित कुंड्यांमध्ये टाकत असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी एक संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे.