Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इक्वेडोरच्या तुरुंगात टोळीयुद्ध, कैद्यांनी एकमेकांवर फेकले हातबॉम्ब; 116 ठार

इक्वेडोरच्या तुरुंगात टोळीयुद्ध, कैद्यांनी एकमेकांवर फेकले हातबॉम्ब; 116 ठार
, गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (14:54 IST)
इक्वेडोरमध्ये तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या टोळीयुद्धात आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
 
देशाच्या इतिहासात तुरुंगातील हिंसाचाराची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी आणि दुर्दैवी घटना असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ग्वायाक्विल या शहरातील तुरुंगात मंगळवारी (28 सप्टेंबर) घडलेल्या या घटनेमध्ये जवळपास पाच जणांचं शीर कापण्यात आलं, तर इतरांना गोळ्या घालण्यात आल्या. कैद्यांनी एकमेकांवर ग्रेनेड फेकल्याचंही पोलीस कमांडर फॉस्टो बुनॅनो यांनी सांगितलं.
 
जगभरातील ड्रग्ज गँगबरोबर संबंध असेलेल कैदी असलेल्या या तुरुंगातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 400 पोलिसांची मदत घ्यावी लागली. सध्या इक्वेडोरमध्ये कार्यरत असलेल्या मेक्सिकोच्या ड्रग तस्कर टोळ्यांच्या आदेशावरून तुरुंगामध्ये हे टोळीयुद्ध भडकल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. तुरुंगात निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भयावह होती, असं तुरुंग संचालक बोलिव्हर गारझॉन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
"काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर रात्री पुन्हा एकदा गोळीबार आणि स्फोट झाले. त्यानंतर सकाळी आम्ही याठिकाणी पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. नेमका वाद झाला त्याठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत. याठिकाणी आणखी मृतदेह मिळाले असं, ते म्हणाले.
 
तुरुंगावर ताबा मिळवण्यासाठी दोन गँगमध्ये होणाऱ्या अशा प्रकारच्या टोळीयुद्धाच्या घटनांमधली ही आणखी एक ताजी घटना समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारे तुरुंगातील टोळीयुद्धात 79 कैद्यांचा मृत्यू झाला होता.
 
मंगळवारी रात्री द लिटरल पेनिटेंटिअरी तुरुंगात घडलेली घटना ही देशातली आजवरची सर्वांत गंभीर आणि भयावह घटना ठरली आहे.
 
तुरुंगातील एका विंगमध्ये असलेल्या कैद्यांनी बोगद्याच्या माध्यमातून दुसऱ्या विंगमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी दोन्ही टोळ्यांनी एकमेकांवर हल्ला केला. यात सुमारे 80 हून अधिक कैदी जखमी झाले आहेत.
 
ही धुमश्चक्री सुरू असलेल्या विंगमध्ये सहा आचारी अडकलेले होते. पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी देशातील तुरुंग यंत्रणेमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
 
द लिटरल पेनिटेंटिअरी तुरुंगात लॉस कोनरॉस या युरोपियन टोळीतील कैदी आहेत. या टोळीचे संबंध मेक्सिकोमधील शक्तीशाली ड्रग्ज तस्कर टोळी सिनालोआशी आहेत.
 
तर जॅलिस्को न्यू जनरेशन कार्टल (CJNG) ही मेक्सिकोतील गुन्हेगारांची टोळीदेखील इक्वाडोरमधील टोळ्यांशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहे. इक्वाडोर ते मध्य अमेरिकेपर्यंतच्या तस्करीच्या मार्गावर ताबा मिळवण्यासाठी ते हा प्रयत्न करतायत. सध्या सिनालोआ टोळीचा याठिकाणी ताबा आहे.
 
जुलैमध्ये राष्ट्राध्यक्ष लासो यांनी इक्वेडोरमध्ये तुरुंग क्षमतेपेक्षा 30 टक्के अधिक भरलेले असल्याचं म्हटलं होतं. तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी ज्या कैद्यांनी त्यांची बहुतांश शिक्षा पूर्ण केली आहे किंवा किरकोळ गुन्हे असतील त्यांना सोडण्याचा विचार असल्याचं जाहीर केलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यापुढे माणसाला बिबट्यांसोबतच राहावं लागणार का?