कतारने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली आहे.या माजी नौदल अधिकाऱ्यांना अज्ञात प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
त्यांच्या सुटकेनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) घोषणा केली की, संयुक्त अरब अमिरातीचा दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान 15 फेब्रुवारी रोजी कतारला भेट देतील.
ऑगस्ट 2022 मध्ये या नौदल अधिकाऱ्यांना अज्ञात प्रकरणात अटक करण्यात आली होती.
भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी सकाळी अचानक जाहीर केलं की, कतारच्या अमीराच्या आदेशावरून या आठही अधिकाऱ्यांना सोडून देण्यात येणार आहे.
याकडे भारताचा राजनैतिक विजय या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय.
सुटकेनंतर दिल्लीला पोहोचलेल्या एका नौदल अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आम्ही भारतात सुखरूप पोहोचलो ही खूप आनंदाची बाब आहे. साहजिकच आम्ही यासाठी पंतप्रधान मोदींचे विशेष आभार मानू कारण त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाशिवाय हे शक्य झालं नसतं."
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतारच्या न्यायालयाने या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
या आठ अधिकाऱ्यांमध्ये कॅप्टन नवतेज गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, अमित नागपाल, एस.के. गुप्ता, बी.के. वर्मा, सुगुणाकर पकाला, नाविक रागेश यांचा समावेश होता.
नंतर त्यांची फाशीची शिक्षा 3 ते 25 वर्षांपर्यंत कमी करण्यात आली.
कतारमधून माजी अधिकाऱ्यांची सुटका
या माजी अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलंय की, "कतारच्या दाहरा ग्लोबल कंपनीत काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांची सुटका झाली असून भारत सरकार या सुटकेचं स्वागत करत आहे. कतारच्या अमीरांनी जो निर्णय घेतला त्याचेही आम्ही कौतुक करतो."
सुटकेनंतर सोमवारी संध्याकाळी भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितलं की, संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी कतारलाही जाणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या कतार दौऱ्याचा संबंध भारतीय नागरिकांच्या सुटकेशी जोडल्यावर क्वात्रा म्हणाले की, अशा भेटी काही महिने आधीच आखल्या जातात.
मोदींनी यापूर्वी जून 2016 मध्ये कतारला भेट दिली होती.
कतार दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे कतारच्या अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेणार आहेत.
क्वात्रा म्हणाले की, "काळासोबतच कतार आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखीन दृढ होत आहेत. राजकारण, व्यवसाय, व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा पुरवठा या संदर्भात दोन्ही देशांमधील संबंध दृढ झालेत. संस्कृती आणि सुरक्षा या आघाडीवरही दोन्ही देशांमधील सहकार्य वाढले आहे.'
पाकिस्तानात सुरू झाली चर्चा
या आठ भारतीयांच्या सुरक्षित सुटकेची चर्चा आता पाकिस्तानात देखील सुरू आहे.
भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी हे त्यांच्या पातळीवर घडवून आणलं. दुबई येथे आयोजित कॉप-28 मध्ये पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांची भेट घेतली आणि वैयक्तिक संभाषणादरम्यान भारतीयांच्या सुरक्षित सुटकेचा मुद्दा उपस्थित केला."
अब्दुल बासित म्हणाले, "या आठ भारतीयांना इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचे आरोप होते. त्यामुळे त्यांना कतारमध्ये अटक करून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण भारताने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि शेवटी यश मिळालं.
भारताच्या पंतप्रधानांनी गेल्या वर्षी दुबईत कतारच्या अमीरांची भेट घेतली होती आणि आपल्या नागरिकांच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला होता."
बासित पुढे सांगतात की, "मला वाटतं की हे भारताच्या राजकीय मुत्सद्दीपणाचं यश आहे. यातून असा संदेश जातो की भारताला आपल्या नागरिकांची काळजी आहे. कतारनेही भारताचं म्हणणं ऐकून घेतलंय. गेल्या 10 - 15 वर्षांत या क्षेत्रात भारताचा प्रभावही वाढलाय.
मला असं सांगायचं आहे की, आपण आपल्या शत्रू राष्ट्राकडूनही काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. भारताने सर्वांसमोर एक चांगलं उदाहरण ठेवलंय. या संपूर्ण प्रकरणात मोदींचा मोठा वाटा आहे."
अब्दुल बासित पुढे म्हणाले, "भारताचं हे जाळं बऱ्याच ठिकाणी आहे. भारताचे इस्रायलशी असलेले संबंध सर्वज्ञात आहेत. पाकिस्तानविरुद्ध इस्रायल आणि भारत यांच्यातील सहकार्य खूप मजबूत आहे. भारताचं हे जाळं अगदी दूरवर पसरलं असून आखाती देशांनीही याकडे लक्ष दिलं पाहिजे."
कतारसोबत भारताचा मोठा करार
हल्लीच भारताच्या गोवा या राज्यात भारत ऊर्जा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात कतार एनर्जीने भारतासोबत 20 वर्षांचा एलएनजी विक्री आणि खरेदी करार करणार असल्याची घोषणा केली होती.
हा करार कतार आणि भारतीय कंपनी पेट्रोनेट यांच्यात होणार असून या कराराचा कार्यकाळ 20 वर्षांचा आहे.
कतार हा जगातील सर्वात मोठा एलएनजी निर्यात करणारा देश आहे परंतु अलीकडे अमेरिकेने या उत्पादनात कतारला मागे टाकलंय.
कतार दरवर्षी 77 एमटीपीए गॅसचं उत्पादन करतो. त्यांना 2027 पर्यंत याचं उत्पादन वाढवून 126 एमटीपीए पर्यंत करायचं आहे. जेणेकरून आशिया आणि युरोपवर त्यांची पकड मजबूत होईल. याठिकाणी आता अमेरिका यायचा प्रयत्न करते आहे.
क्वात्रा म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये 20 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार सुरू असून कतार हा भारतातील महत्त्वाचा गुंतवणूकदार आहे.
कतारमध्ये राहणारे आठ लाख 40 हजार भारतीय हे दोन्ही देशांमधील महत्त्वाचा दुवा आहेत. अशा परिस्थितीत मोदींच्या कतार दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखीन सुधारण्याच्या दिशेने चर्चा होईल.
माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारताने कतारचे आभार मानले असून क्वात्रा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं आणि या भारतीयांच्या सुटकेसाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले.
या माजी नौदल अधिकाऱ्यांवर नेमके कोणते आरोप होते याबद्दल कतार आणि भारत या दोन्हीही देशांनी काहीच माहिती दिलेली नाही. तसेच या लोकांच्या सुटकेसाठी कोणत्या अटी ठेवण्यात आल्या होत्या याचीही माहिती देण्यात आलेली नाही.
या लोकांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.
या मुत्सद्देगिरीला भारताला यश कसं मिळालं ?
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या भारतीयांच्या सुटकेसाठी भारतीय अधिकाऱ्यांची एक टीम गेल्या अनेक दिवसांपासून कतारमध्ये उपस्थित होती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि इतर काही अधिकाऱ्यांनी सुटकेबाबतच्या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे या अहवालात लिहिले आहे. डोभाल यांनी या मुद्द्यावर अनेकवेळा कतारला भेट दिली आहे.
दुबईतील कॉप-28 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचीही भेट घेतली होती.
त्यावेळी भारत सरकारने माहिती देताना सांगितलं होतं की ही चर्चा कतार मधील भारतीय नागरिकांच्या संदर्भात होती.
या आठ अधिकाऱ्यांपैकी केवळ सातच भारतात परतले.
कमांडर पूर्णेंदू तिवारी यांचं कुटुंब कतारमध्ये राहतं. तिवारी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दोहा येथे थांबले असून ते लवकरच भारतात परतणार आहेत.
2019 मध्ये तिवारी यांना प्रवासी भारतीय असा सन्मान देण्यात आला होता. दाहरा ग्लोबलमध्ये काम करत असताना तिवारी कतारच्या नौदलाच्या जवानांना प्रशिक्षण द्यायचे.
हे नौदल अधिकारी भारतात परतल्यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आम्ही भारतात परतण्यासाठी 18 महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधानांचे खूप आभारी आहोत. त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय हे शक्यच झालं नसतं.
कतार आणि भारताचे संबंध
भारत आणि कतार यांचे संबंध कायमच मैत्रीपूर्ण राहिले आहेत. कतारमध्ये आठ लाखांहून अधिक भारतीय काम करतात.
जून 2022 मध्ये या मैत्रीपूर्ण संबंधात एक बाधा आली होती. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती.
त्यावेळी भारताने यासंदर्भात माफी मागावी अशी मागणी कतारने केली होती. अशी मागणी करणारा कतार पहिलाच देश होता. कतारने भारतीय राजदूताला बोलावून त्यांच्याजवळ तीव्र आक्षेप नोंदवला होता.
मात्र, भाजपने नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. यात भारताच्या सत्ताधारी पक्षातील नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
जेव्हा भाजपने नुपूर शर्मा यांना निलंबित करण्याची घोषणा केली तेव्हा मात्र कतारनेही भाजपच्या या कृतीचं स्वागत केलं. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाल्याचं कतारने म्हटलं होतं.
भारताने प्रत्युत्तरात असं म्हटलं होतं की, "आमचा सांस्कृतिक वारसा आणि विविधतेतील एकतेच्या मजबूत परंपरांमुळे आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्यांवर आधीच कठोर कारवाई करण्यात आली आहे."
Published By- Priya Dixit