Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्रान्स निवडणुकीत डाव्यांनी उजव्या आणि अति-उजव्यांना कसा दिला धोबीपछाड?

France Elections 2024
, मंगळवार, 9 जुलै 2024 (00:40 IST)
कोणालाही हे अपेक्षित नव्हतं. फ्रान्समधील निवडणुकीत प्रचंड नाट्य नक्कीच होतं, मात्र निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहेत.फ्रेंच वाहिन्यांवर याबाबत बातम्या झळकल्या तेव्हा उजव्या विचारसरणीच्या मरीन ल पेन आणि पंतप्रधान होण्याची तयारी केलेले तरुण नेते जॉर्डन बार्देला हे प्रत्यक्षात विजयी होतील अशी स्थिती नव्हती.
 
फ्रान्समधील डाव्या विचारसरणीच्या आघाडीनं निवडणूक जिंकली अशी शक्यता निर्माण झाली. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मध्यममार्गींनी अनपेक्षितपणे या निवडणुकीत पुनरागमन केलं. तर अती उजव्या विचारसरणीचा नॅशनल रॅली (RN)पक्ष तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला.
त्यानंतर जाँ लूक मेलाँशा या डाव्या आघाडीच्या अनुभवी आक्रमक नेत्यानं निवडणुकीतील विजयाचा दावा करण्यात जराही वेळ घालवला नाही. त्यांना जहालमतवादी, कट्टर नेते म्हणून ओळखलं जातं.
 
राष्ट्राध्यक्षांनी न्यू पॉप्युलर फ्रंटला (डाव्या विचारसरणीच्या पक्षांची आघाडी) सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं पाहिजे, असं त्यांनी स्टालिनग्राड चौकात बोलताना म्हटलं. मॅक्रॉन आणि त्यांच्या आघाडीचा या निवडणुकीत पराभव झाला आहे हे मॅक्रॉन यांनी स्वीकारावं असा आग्रह जाँ लूक मेलाँशा यांनी धरला.
 
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना धक्का देणाऱ्या या निवडणुकीसाठी जीन यांनी घाईत तयार केलेल्या या आघाडीमध्ये त्यांचा स्वत:चा कट्टरतावादी फ्रान्स अनबोव्ड (France Unbowed) पक्ष, ग्रीन्स, समाजवादी, कम्युनिस्ट आणि अगदी ट्रॉटस्कीवाद्यांचा समावेश आहे. पण, सरकार स्थापन करता येईल, एवढा मोठा विजय त्यांना मिळवता आलेला नाही.
 
फ्रान्समध्ये त्रिशंकू संसद असणार आहे. 577 जागांच्या संसदेत बहुमतासाठी 289 जागांची आवश्यकता आहे. मात्र देशातील तीन आघाड्यांपैकी एकाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही.
भाषणानंतर मेलेकॉन यश साजरं करण्यासाठी प्रचंड समर्थकांसह प्लेस दि ला रिपब्लिक (Place de la République) चौकात गेले. त्यावेळी त्याठिकाणी 8,000 लोक गोळा झाले होते, असं पोलिसांनी सांगितलं.
 
पॅरिसच्या नैऋत्येला असलेल्या बॉइज द विनसेन्स पार्कात उत्साहाअभावी नॅशनल रॅलीच्या समर्थकांचा जल्लोष फिका पडला.
 
एका आठवड्यापूर्वी मरीन ल पेन आणि जॉर्डन बार्देला त्यांच्या सत्तेत येण्याच्या शक्यतेबद्दल बोलत होते. त्यांना संभाव्य बहुमत मिळण्याची चर्चा होती.
 
मरीन ल पेन यांनी या निकालावर समाधान व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, "दोन वर्षांपूर्वी आमच्याकडं फक्त सात खासदार होते. आज रात्री फ्रान्समधील खासदारांच्या संख्येचा विचार करता नॅशनल रॅली (RN)पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे."
 
मागील संसदेत नॅशनल रॅलीचे 88 खासदार होते आणि आता 140 पेक्षा जास्त खासदार आहेत. त्यादृष्टीनं मरीन यांचं म्हणणं बरोबर होतं. इतर दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे 100 पेक्षा जास्त खासदार नाहीत. कारण मॅक्रोनिस्ट (मॅक्रॉन यांची आघाडी) आणि पॉप्युलर फ्रंट हे दोन्हीही पक्ष नसून आघाड्या किंवा युती आहेत.
 
जॉर्डन बार्देला यांनी, अनैसर्गिक सन्मानशून्य युतीद्वारे त्यांचा पक्ष अयशस्वी झाला आहे अशी तक्रार केली. मॅक्रॉन गट आणि डावे यांनी एकत्र येऊन हे साधलं आहे. या पक्षांच्या अनैसर्गिक युतीबद्दल जॉर्डन यांचं म्हणणं चुकीचं नव्हतं, मात्र ही युती म्हणजे एक तात्पुरती सोय आहे, असंही ते म्हणाले.
रिपब्लिकन फ्रंटचा भाग मानणाऱ्या 200 पेक्षा जास्त उमेदवारांनी दुसऱ्या फेरीतून माघार घेतली. चांगल्या स्थितीत असलेला प्रतिस्पर्धी नॅशनल रॅली (RN)ला जिंकण्यापासून रोखू शकेल, असा त्यामागचा विचार होता.
 
मेरी-कॅरोलिन या मरीन ल पेन यांची धाकटी बहीण आहेत. त्याही ले मॅन्स मधून निवडणुकीच्या रिंगणात होती. मात्र मेरी-कॅरोलिनचासुद्धा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
 
त्यांचा फक्त 225 मतांनी पराभव झाला. मॅक्रॉन यांचा उमेदवार बाहेर पडल्यानंतर एलीस लेबोचर या मेलेकॉनच्या उमेदवारानं मेरी-कॅरोलिन यांचा पराभव केला.
 
फ्रान्समधील या निवडणुकीत 66.63 टक्के मतदान झालं. संसदीय निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीतील 1997 नंतरचं हे सर्वाधिक मतदान आहे. नॅशनल रॅली (RN)चं मतदान थांबलं असलं तरी यावेळी त्यांना बिगर RN म्हणजे विरोधी मतांचा सामना करावा लागला. नॅशनल रॅली (RN)ला अटकाव किंवा अडथळा निर्माण करण्यासाठी अनेकदा या प्रकारचे डावपेच वापरले जात होते.
संपूर्ण फ्रान्समध्ये जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा नॅशनल रॅली (RN)गमावत होती.
 
त्यांचे काही उमेदवार अजिबात प्रभावी नव्हते.
एका महिलेनं त्या पुय-द-डोम मधून निवडून आल्या तर वर्णद्वेषी विनोद थांबवण्याचं वचन दिलं होतं. तर अग्नेयेकडील हॉत-सेवोईमध्ये एक फारशी तयारी न केलेला तरुण उमेदवार होता, त्यांनी टीव्हीवर मध्यममार्गी (centrist)प्रतिस्पर्ध्याबरोबर वादविवादात भाग घेतला होता. त्यांनी क्वचितच एखाद्या मुद्द्यावर प्रभाव पाडला.
 
हे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. मात्र त्यातून नॅशनल रॅली (RN)ची ग्रामीण भागातील वाढ दिसून आली.
 
नॅशनल रॅलीला 32 टक्के मतं मिळाली. 37 टक्के मतं त्यांच्या उजव्या मित्रांसह आणि 1 कोटीपेक्षा जास्त मतदारांनी चौकट ओलांडली आहे.
 
पॅरिसच्या पूर्वेला मेअक्समध्ये नॅशनल रॅलीचा निसटता विजय झाला.
 
मतदान केल्यानंतर क्लॉडिन म्हणाल्या, त्यांच्या ओळखीतले लोक जवळच्या मित्रांसोबत नसल्यास नॅशनल रॅलीला मतं दिल्याचं मान्य करत नाहीत.
 
अंदाजित निकालापूर्वी रात्री 8 वाजता, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन बोलतील अशी जोरदार शक्यता व्यक्त केली जात होती. मॅक्रॉन 90 मिनिटांपूर्वीच बैठकीला गेले असल्याची बातमीही पसरली.
 
अखेर मॅक्रॉन यांचे अडचणीत आलेले पंतप्रधान, गॅब्रिएल अत्तल यांनी सरकारच्या वतीनं प्रतिक्रिया दिली.
चार आठवड्यांपूर्वी मॅक्रॉन यांनी निवडणूक योजना उघड केल्यानंतर ते मख्ख चेहऱ्यानं आणि हाताच्या घडी घालून राष्ट्राध्यक्षांच्या समोर बसले होते.
 
आता त्यांनी जाहीर केलं आहे की, ते सकाळी आपल्या वरिष्ठांना (राष्ट्राध्यक्षांना) आपला राजीनामा सादर करणार आहेत. मात्र जोपर्यत आवश्यकता आहे तोपर्यत ते पदावर कार्यरत राहतील.
 
वॉशिंग्टनमधील नाटोच्या बैठकीसाठी अत्तल मंगळवारी संध्याकाळी रवाना होणार आहेत. त्यामुळं लगेचच त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाची नियुक्ती करण्याची शक्यता कठीण आहे.
 
निवडणूक निकालांनंतर फ्रान्सची वाटचाल राजकीय अस्थैर्याकडं सुरू झाली आहे. यातून बाहेर पडण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग सध्या दिसत नाही. अशा परिस्थितीत रस्त्यांवर निदर्शनं होण्याच्या चर्चा होत होत्या. मात्र पॅरिससह नॅन्टेस आणि लियॉन या शहरांमध्ये काही मोजक्याच घटना नोंदवल्या गेल्या.
 
आता सर्वांच्या नजरा राष्ट्राध्यक्षांवर आहेत. त्यांनाच या राजकीय कोंडीतून मार्ग काढावा लागेल.
 
नवीन संसद 10 दिवसांमध्ये स्थापन होईल. मात्र पॅरिस ऑलिम्पिकची सुरूवात 26 जुलैला होत आहे. त्यामुळं फ्रान्सकडं त्यासाठी पुरेसा वेळ असेल.
 
लिबरेशन या डावीकडं झुकणाऱ्या वृत्तपत्रानं या रात्रीचं वर्णन सेस्ट ऑफ (C'est Ouf)या मथळ्यानं केलं.
 
फ्रेंच भाषेत याचा अर्थ "हा वेडेपणा आहे" असा होतो. मात्र त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे, मतदारांनी सत्तेच्या दिशेनं होत असलेली नॅशनल रॅलीची वाटचाल थांबवली.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्पेनमधील कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटला सुवर्ण पदक; जाणून घ्या विनेशचा प्रवास