ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची (लेबर पार्टी) विजयाकडे जोरदार वाटचाल सुरू आहे. त्याचवेळी विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांचा हुजूर पक्ष (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) पराभवाच्या मार्गावर आहे. ब्रिटनमध्ये 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा लेबर पार्टी म्हणजेच मजूर पक्षाची सत्ता येत आहे.
मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर इंग्लंडचे नवीन पंतप्रधान होऊ शकतात. लेबर पार्टीला आतापर्यंत 210 जागा मिळाल्या आहेत, तर कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीला केवळ 34 जागा जिंकता आल्या आहेत. एक्झिट पोलनुसार लेबर पार्टीला 410 जागा मिळण्याची शक्यता आहे.
कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीला केवळ 131 जागा मिळतील असा अंदाज आहे. सर कीर स्टार्मर यांनी सोशल मीडियावर मतदारांचे आभार मानले आहेत.
2010 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा विजय झाला आणि डेव्हिड कॅमेरून पंतप्रधान झाले होते
बीबीसी, आयटीव्ही आणि स्कायच्या एक्झिट पोलनुसार सर कीर स्टार्मर यांचा पक्ष 326 चा बहुमताचा आकडा गाठून 'डाउनिंग स्ट्रीट'कडे वाटचाल करत आहे. सध्या सत्तेत असलेल्या हुजूर पक्षाला 131 जागा मिळतील असं दिसत आहे.
आपल्या मतदारसंघात विजयी झाल्यानंतरच्या पहिल्या भाषणात, "आता आमच्यावर काम करण्याची जबाबदारी आहे."
'रिफॉर्म यूके' या पक्षाने हुजूर पक्षाच्या मतांमध्ये मोठं विभाजन केलं आहे. रिफॉर्म यूकेचे उमेदवार अनेक जागांवर दुसऱ्या स्थानावर आहेत. या पक्षाचा पहिला खासदार निवडून आला आहे. या पक्षाचे नेते निगेल फॅरेज यांचा निकाल येणे बाकी आहे.
हुजूर पक्षाची मते कमी झाल्यामुळे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाला फायदा होताना दिसत आहे. त्यांना 61 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यांच्यासाठी हा निकाल 2010 नंतरचा सर्वोत्तम असेल.
स्कॉटलंडमध्ये लेबरचे वर्चस्व परत आल्याने स्कॉटिश नॅशनल पार्टी 38 जागा गमावण्याची शक्यता आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या ग्रीन पार्टीला आपल्या खासदारांची संख्या दुप्पट करून दोनवर पोहोचण्याची संधी आहे. इतरांना 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
कोण आहेत कीर स्टार्मर?
एप्रिल 2020 मध्ये मजूर पक्षाचे नवीन नेते म्हणून सर कीर स्टार्मर यांची निवड झाली होती. स्टार्मर 61 वर्षांचे आहेत याआधी जेरेमी कॉर्बिन ब्रिटनमध्ये विरोधी लेबर पार्टीचे नेतृत्व करत होते. व्यवसायाने वकील असलेले स्टार्मर 2015 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते.
लेबर पार्टीच्या नेत्याच्या निवडणुकीत, स्टार्मर पहिल्या फेरीतील मतमोजणीत 50 टक्क्यांहून अधिक मतांनी पुढे होते.
लेबर पार्टीचे नेते बनल्यावर स्टार्मर म्हणाले होते की, "या महान पक्षाला नवीन आशा आणि आत्मविश्वासाने एका नव्या युगात घेऊन जाण्याचा त्यांचा उद्देश आहे."
पक्षाने जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात ते म्हणाले की, "मी निवडून आलो ही माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे आणि मला आशा आहे की, वेळ आल्यावर मजूर पक्ष सरकार स्थापन करून पुन्हा एकदा देशाची सेवा करण्यास सक्षम असेल. "
लेबर पार्टीच्या मोठ्या विजयानंतर की स्टार्मर काय म्हणाले?
इंग्लंडच्या निवडणुकीत लेबर पार्टी विजयाकडे वाटचाल करत आहे. या विजयानंतर लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर म्हणाले की ज्या मतदारांनी त्यांना मतं दिली नाहीत त्यांच्यासाठीही ते काम करणार आहेत.
कीर स्टार्मर म्हणाले की, "मी प्रत्येक व्यक्तीसाठी काम करणार आहे."
मतदारांना उद्देशून स्टार्मर म्हणाले की, "मी तुमचा आवाज बनेन, मी रोज तुमच्यासाठी लढत राहीन. मी बदल करण्यासाठी सुसज्ज आहे."
कीर स्टार्मर पुढे म्हणाले की, "आता बदलाला सुरुवात झाली आहे. हे आपली लोकशाही आहे. हा तुमचा समुदाय आहे, तुमचं भविष्य आहे. तुम्ही मतदान केलं आहे आता निकाल देण्याची जबाबदारी आमची आहे."
विरोधी पक्षाचे नेते होण्याआधी कीर स्टार्मर यांनी पाच वर्ष वकिली केलेली आहे. २००८ ते २०१३ याकाळात इंग्लंड आणि वेल्समध्ये त्यांनी वकील म्हणून काम केलं आहे.
मागच्या चार वर्षांपासून 61 वर्षांचे कीर स्टार्मर हे इंग्लंडच्या संसदत विरोधी पक्षाचे नेते आहेत. राजकीयदृष्ट्या डाव्या विचारसरणीच्या मजूर पक्षाला मध्यवर्ती विचारसरणीकडे नेण्याचं श्रेय त्यांना जातं.
हा विजय लेबर पार्टीचा सगळ्यात मोठा विजय ठरेल का?
एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले तर लेबर पार्टीचे 410 खासदार निवडून येतील. टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वात 1997 मध्ये लेबर पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या जवळ जाणारा हा निकाल ठरेल.
20 वर्षांपूर्वी लेबर पार्टीला इंग्लंच्या इतिहासातला सगळ्यात मोठा जनादेश मिळाला होता. लेबर पार्टीचे तत्कालीन नेते टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे गेलेल्या लेबर पार्टीचे एकूण 419 खासदार निवडून आले होते आणि काँजर्वेटिव्ह पक्षाला त्यावेळी 165 जागांपर्यंत मर्यादित राहावं लागलं होतं.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदा लेबर पार्टीला 410 जागा मिळतील असा अंदाज आहे, 1997 पेक्षा हा आकडा फक्त 9 ने कमी असेल. जर प्रत्यक्ष निकालात लेबर पार्टीने एक्झिट पोल्सच्या अंदाजापेक्षा जास्त जागा मिळवल्या आणि 419चा आकडा ओलांडला तर लेबर पार्टीच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा विजय ठरेल. कीर स्टार्मर हे टोनी ब्लेअर यांचा विक्रम मोडीत काढतील.
या निवडणुकीत लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष हा तिसऱ्या स्थानी राहण्याची शक्यता आहे, या पक्षाला 61 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेला.
Published By- Priya Dixit