Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इस्रायल हमास युद्धः कलिंगड असं बनलं पॅलेस्टाईनच्या समर्थनाचं आणि इस्रायलच्या विरोधाचं प्रतीक

israel hamas war
, शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (12:09 IST)
इस्रायल-गाझा युद्धादरम्यान पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्यासाठी कलिंगड एक शक्तिशाली चिन्ह म्हणून पुढे आलं आहे.पॅलेस्टाईनच्या ध्वजाचा रंग अगदी कलिंगडाच्या लाल, काळया, पांढऱ्या आणि हिरव्या रंगासारखा आहेत. पॅलेस्टाईन समर्थक रॅली आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये कलिंगडाचे फोटो ठळकपणे दिसत आहेत.
 
कलिंगड पॅलेस्टिनी ऐक्याचे प्रतीक कसं बनलं त्यामागचा इतिहास जाणून घेऊ.
 
"पॅलेस्टाईनमध्ये त्यांचा स्वतःचाच झेंडा फडकावणं गुन्हा आहे. लाल, काळा, पांढरा आणि हिरवा रंग पॅलेस्टिनी ध्वजाचं प्रतीक म्हणून पॅलेस्टीनींनी इस्रायली सैनिकांविरुद्ध कलिंगडाचे तुकडे केले."
 
या ओळी अमेरिकन कवी अरासेलिस गिरमे यांच्या 'ओड टू द वॉटरमेलन' या कवितेतील आहेत. पॅलेस्टिनी समस्येचा संदर्भ म्हणून ते फळाचा प्रतीकात्मक उल्लेख करतात.
 
लाल, काळा, पांढरा आणि हिरवा हे रंग केवळ कलिंगडाचे नाहीत तर पॅलेस्टिनी ध्वजातही आहेत. म्हणूनच, जगभरातील पॅलेस्टाईन समर्थक मोर्चे आणि गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान सोशल मीडिया पोस्टमध्ये असंख्य कलिंगड दिसले.
 
पण कलिंगड हे रूपक बनण्यामागे एक इतिहास आहे.
 
पॅलेस्टाईन ध्वजावर बंदी
1967 च्या अरब-इस्त्रायली युद्धानंतर इस्रायलने गाझा आणि वेस्ट बँकचा ताबा घेतला. त्यावेळी जिंकलेल्या प्रदेशांमध्ये पॅलेस्टिनी ध्वज आणि त्याचे रंग यासारखी राष्ट्रीय चिन्ह प्रदर्शित करण्यास बंदी घातली.
 
झेंडा वापरणं जणू एक गुन्हाच बनला. याच्या निषेधार्थ पॅलेस्टिनींनी कलिंगडाचे तुकडे वापरण्यास सुरुवात केली.
 
1993 मध्ये इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात झालेल्या ओस्लो करारानंतर, पॅलेस्टिनी प्राधिकरणाने ध्वजाला मान्यता दिली होती. गाझा आणि इस्रायल व्याप्त वेस्ट बँकच्या काही भागांवर शासन करण्यासाठी प्राधिकरण तयार करण्यात आलं.
 
'न्यूयॉर्क टाईम्स'चे पत्रकार जॉन किफनर यांनी ओस्लो करार अस्तित्वात आल्यानंतर लिहिलं होतं की, "एकदा गाझामध्ये काही तरुणांनी कापलेले कलिंगड नेले म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. या तरुणांनी लाल, काळा आणि हिरवा पॅलेस्टिनी रंग परिधान करून प्रतिबंधित झेंडे असलेली मिरवणूक काढली होती. आणि तिथे उभे असलेल्या सैनिकांना शिवीगाळ केली."
 
काही महिन्यांनंतर म्हणजेच डिसेंबर 1993 मध्ये वृत्तपत्राने नोंद केली होती की, अटकेच्या दाव्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. मात्र इस्रायल सरकारच्या प्रवक्त्याला याविषयी विचारलं असता त्यांनी अशा घटना घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं होतं.
 
तेव्हापासून कलाकारांनी पॅलेस्टाईनला समर्थन देण्यासाठी कलिंगडाच्या कलाकृती तयार करणं सुरू ठेवलं.
 
कलिंगडाचे तुकडे
सर्वात प्रसिद्ध कलाकृती मध्ये खालेद होरानी यांची कलाकृती आहे. 2007 मध्ये त्यांनी 'सब्जेक्टिव्ह अॅटलस ऑफ पॅलेस्टाईन' या पुस्तकासाठी कलिंगडाचा एक तुकडा काढला होता.
 
'द स्टोरी ऑफ द वॉटरमेलन' नावाचं हे चित्र जगभर गाजलं. मे 2021 मध्ये इस्रायल-हमास संघर्षादरम्यान याला अधिक महत्त्व प्राप्त झालं.
 
कलिंगडाच्या चित्राचा वापर करण्याची लाट या वर्षाच्या सुरुवातीला आली. जानेवारी महिन्यात इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन ग्विर यांनी पोलिसांना सार्वजनिक ठिकाणांवरील पॅलेस्टिनी ध्वज हटवण्याचे निर्देश दिले होते.
 
पॅलेस्टिनी झेंडे फडकवणे म्हणजे दहशतवादाचे समर्थन करण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. यानंतर इस्रायलविरोधी मोर्च्यांदरम्यान कलिंगडाची चित्रं दिसू लागली.
 
इस्रायली कायदा पॅलेस्टिनी ध्वजांना बेकायदेशीर ठरवत नाही. पण जर पोलिस आणि सैनिकांना ते ध्वज सार्वजनिक व्यवस्थेला धोका वाटत असतील तर ते काढून टाकण्याचा अधिकार आहे.
या वर्षी जुलैमध्ये जेरुसलेममध्ये झालेल्या निदर्शनात पॅलेस्टिनी निदर्शकांनी पॅलेस्टिनी ध्वजाच्या रंगात कलिंगड आणि स्वातंत्र्य शब्दाची चिन्ह चित्रित केली होती.
 
तेच ऑगस्टमध्ये आंदोलकांच्या एका गटाने तेल अवीवमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या न्यायिक सुधारणांच्या योजनांचा निषेध करण्यासाठी कलिंगडाचे चित्र असलेले टी-शर्ट घातले होते.
 
अलीकडेच, गाझा युद्धाचा निषेध करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कलिंगडाचे फोटो वापरण्यात आले होते. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ कलाकार पुढे आले.
 
ब्रिटिश मुस्लीम कॉमेडियन शुमिरुन नेस्सा हिने टिक टॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कलिंगडाचे एक फिल्टर तयार केले आणि तिच्या फॉलोवर्सना देखील व्हीडिओ बनवण्यास सांगितलं. त्यातून मिळालेली रक्कम गाझाला मदत म्हणून देऊ असं तिने आश्वासन दिलं.
 
काही सोशल मीडिया युजर्स पॅलेस्टिनी ध्वजाऐवजी कलिंगड पोस्ट करत आहेत. त्यांना भीती आहे की पॅलेस्टिनी ध्वज पोस्ट केले तर त्यांचं खातं बंद केलं जाईल.
 
यापूर्वी, पॅलेस्टिनी समर्थक युजर्सने इंस्टाग्रामवर 'शॅडो बॅन' लादल्याचा आरोप केला आहे. विशिष्ट पोस्ट इतर लोकांच्या फीडमध्ये दिसणार नाहीत याची खात्री करण्यासाठी जेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हस्तक्षेप करतो तेव्हा त्याला 'शॅडो बॅन' म्हणतात.
 
पण बीबीसी सायबर अफेयर्सचे वार्ताहर जो टायडी म्हणतात की, हे आता घडत असल्याचा कोणताही पुरावा नाही.
 
ते म्हणतात, "पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पोस्ट करणार्‍या युजर्सवर कोणतही शॅडो बॅन लावल्याचं षडयंत्र झालंय असं वाटत नाही."
 
ते म्हणतात, "लोक सोशल मीडिया पोस्टमध्ये कलिंगड वापरत आहेत, परंतु ते पॅलेस्टिनी ध्वजाचाही खुलेआम वापर करत आहेत आणि संघर्षाबद्दल उघडपणे लिहित आहेत."
 
पॅलेस्टाईनमध्ये कलिंगड हे अनेक दशकांपासून राजकीय प्रतीक मानलं जात होतं, विशेषत: पहिल्या आणि दुसऱ्या इंतिफाद दरम्यान.
 
आज कलिंगड केवळ या प्रदेशात लोकप्रिय फळ म्हणून नाही तर पॅलेस्टिनी आणि त्यांच्या संघर्षाला पाठिंबा देणार्‍यांच्या पिढ्यांसाठी एक शक्तिशाली द्योतक बनलं आहे.
 















Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उलटं चालण्याचा शरीर आणि मेंदूला काय फायदा होतो? वाचा