नायजेरियाच्या उत्तर-पश्चिम भागात लष्कराच्या हवाई हल्ल्यात अनेक नागरिक ठार झाले. संघर्षग्रस्त भागात लष्कराने सशस्त्र गटांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. हे नागरिक स्थानिक सुरक्षा दलांसोबत मिळून काम करत होते. नागरिकांवर हा हल्ला चुकून झाला. अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी ही माहिती दिली.
गेल्या वर्षभरात लष्कराचा हा तिसरा हवाई हल्ला आहे, ज्यात नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
नायजेरियन लष्कर झामफारा राज्यातील जुर्मी आणि माराजुन भागात बंडखोर गटाला लक्ष्य करत होते. राज्याच्या राज्यपालांचे प्रवक्ते सोलोमन बाला इद्रिस यांनी रविवारी सांगितले की, हवाई हल्ल्यात काही नागरिकही ठार झाले आहेत. हे लोक 'सिव्हिलियन जॉइंट टास्क फोर्स' आणि 'लोकल व्हिजिलन्स फोर्स'चे सदस्य होते. हे लोक परिसरातून पळून जात असल्याचे इद्रिसने सांगितले. त्यामुळे त्यांना दरोडेखोर समजण्यात आले.
मात्र, किती नागरिकांचा मृत्यू झाला हे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही. नायजेरियन हवाई दलाने देखील कोणतेही अधिकृत विधान जारी केले नाही. स्थानिक रहिवासी सलिसू माराजुन यांनी सांगितले की त्यांनी 20 मृतदेह मोजले. तर 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लागोस स्थित रिसर्च ऑर्गनायझेशन 'एसबीएम इंटेलिजन्स'च्या अहवालानुसार नायजेरियन आर्मी बंडखोरांना तोंड देण्यासाठी अनेकदा हवाई हल्ले करत असते. पण 2017 पासून या हल्ल्यांमध्ये 400 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.