Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंकीपॉक्स हे जागतिक पातळीवरचं आरोग्य संकट - WHO ची घोषणा

मंकीपॉक्स हे जागतिक पातळीवरचं आरोग्य संकट - WHO ची घोषणा
, रविवार, 24 जुलै 2022 (11:13 IST)
मंकीपॉक्स हा रोग म्हणजे जागतिक पातळीवरची आरोग्य आणीबाणी असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. जेव्हा एखाद्या रोगाच्या जगात केसेस वाढतात तेव्हा अशा प्रकारची घोषणा WHO कडून होते.
या रोगाच्या संदर्भात WHO ने दोन बैठका घेतल्या. दुसऱ्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
 
सध्या 75 देशात मंकीपॉक्सच्या 16000 केसेस नोंदवण्यात आल्या आहेत असं WHO च्या महासंचालकांनी सांगितलं.
 
या रोगामुळे आतापर्यंत पाच मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
मंकीपॉक्स आजाराबाबत केंद्र सरकारनेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. भारतात सद्य स्थितीत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पण जगभरात वाढणारे या आजाराचे रुग्ण पाहता आपण तयार रहायला हवं असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या सूचनेत म्हटलं होतं.
 
आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी पुढील गोष्टी करू नयेत
 
1.आजारी आणि त्वचेवर जखम झालेल्या लोकांसोबत जवळचे संबंध ठेवू नयेत
 
2.मेलेले किंवा जिवंत उंदीर, खार आणि माकडांसोबत संपर्क नसावा
 
3.अफ्रिकेतील जंगली प्राण्यांपासून बनवण्यात आलेल्या गोष्टी वापरू नयेत. उदाहरणार्थ क्रिम, लोशन आणि पावडर
 
4.आजारी व्यक्तींचे कपडे, चादर, वापरू नयेत
 
5अंगावर रॅश असेल आणि ताप आला असेल तर तात्काळ डॉक्टरांना दाखवावं
 
6.ज्या देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आलेत. अशा देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचं मॉनिटरिंग करावं.
 
तसंच प्रवाशाला कोणतीही लक्षणं नसतील तर 21 दिवसापर्यंत मॉनिटर करावं, लक्षणं दिसू लागताच तपासणी करावी असंही या मार्गदर्शक सूचनेत म्हटलं आहे.
 
लक्षणं असलेल्या व्यक्तींचे नमुने एनआयव्ही पुणेला पाठवण्यात यावेत, रुग्णांना रुग्णालयात किंवा घरी एका खोलीत आयसोलेट करावं. रुग्णांनी ट्रिपल लेअर मास्क घालावा
 
त्वचेवर असलेली जखम किंवा फोड शक्यतो कव्हर करून ठेवावेत. उदाहरणार्थ लांब हाताचे आणि पायाचे कपडे घालावेत
 
त्वचेवरील जखम किंवा फोड पूर्ण बरे होईपर्यंत आणि खपली पडेपर्यंत आयसोलेशन करावं
 
मंकीपॉक्स आजाराने ग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचं 21 दिवस लक्षणांसाठी मॉनिटरिंग करावं
 
या आजाराने ग्रस्त रुग्ण घरी उपचार घेत असेल तर बाहेरून घरात कोणालाही घेऊ नये
 
ज्या रुग्णांना श्वास घेण्यास अडथळा येण्याची लक्षणं आहेत त्यांनी घरात मास्क घालावा. घरातील इतर सदस्यांनीदेखील मास्क घालावा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
 
1. मंकीपॉक्स म्हणजे काय?
मंकीपॉक्स हा रोग मंकीपॉक्स विषाणूमुळे होतो. हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळे व्हायचा त्याच विषाणू कुटुंबाचा हा सदस्य आहे. देवीपेक्षा या रोगाची तीव्रता खूपच कमी आहे आणि संसर्ग होण्याची शक्यताही कमी आहे.
 
हा रोग पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या दुर्गम भागात आढळतो. वेस्ट आफ्रिकन आणि सेंट्रल आफ्रिकन असे या विषाणूचे दोन प्रकार आहेत.
 
इंग्लंडमध्ये या रोगाचे दोन रुग्ण आढळले आहेत. ते नायजेरियाला गेले होते. त्यामुळे या रुग्णांना वेस्ट आफ्रिकन या प्रकाराची बाधा झाली असण्याची दाट शक्यता आहे. या संसर्गाची तीव्रता सौम्य असते, पण तरीही याबाबत अधिक माहिती येणं अद्याप बाकी आहे.
 
तिसऱ्या रुग्णाला या दोन रुग्णांद्वारे बाधा झाली आहे. सध्या आढळलेल्या चार केसेस पैकी तीन लंडनमध्ये आहेत तर एक ईशान्य इंग्लंड भागात आहे. त्यांचा एकमेकांशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप आढळलेले नाहीत. या रुग्णांनी प्रवासही केलेला नाही. त्यामुळे त्यांना ही बाधा इंग्लंडमध्येच झाली आहे.
 
मंकीपॉक्सची लक्षणं आढळल्यास तातडीने डॉक्टरकडे जावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
 
2.मंकीपॉक्सची लक्षणं कोणती?
सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना आणि अस्वस्थपणा यांचा समावेश होतो.
 
एकदा ताप चढला की शरीरावर पुरळ येतं. त्याची सुरुवात चेहऱ्यापासून होते. त्यानंतर ते शरीराच्या इतर भागात पसरत जातं. मुख्यत्वे पंजाला आणि तळपायाला पुरळ येतं.
 
 
हे पुरळ अतिशय खाजरं असतं. त्याचे विविध टप्पे असतात. शेवटी त्याची खपली होते आणि पडते. त्याचे व्रण राहतात.
 
हा संसर्ग आपोपाप 14 ते 21 दिवसात बरा होतो.
 
3. या रोगाची बाधा कशी होते?
संसर्ग झालेल्या रुग्णाशी खूप जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. हा विषाणू, त्वचा, श्वासनलिका, डोळे, नाक किंवा तोंडाच्या वाटे शरीरात प्रवेश करतो.
 
यापूर्वी हा आजार लैंगिक संबंधातर्फे पसरतो हे स्पष्ट झालं नव्हतं. मात्र या रोगाचा प्रसार लैंगिक संबंधातूनही होतो.
 
माकडं, उंदीर, खार, यांना हा आजार झाला असेल आणि त्यांच्याशी थेट संपर्क आला तर माणसाच्या शरीरात विषाणू जाऊ शकतो. तसंच रुग्णाने वापरलेले कपडे किंवा चादर यांच्यावाटेही हा रोग पसरतो.
 
4.हा रोग किती धोकादायक आहे?
बहुतांश केसेसमध्ये फारसा धोका नाही. काही वेळेला हा रोग कांजिण्यांसारखा भासतो. काही आठवड्यात रुग्ण बरा होतो. मंकीपॉक्स काही वेळेला धोकादायक ठरू शकतो. या रोगामुळे आफ्रिकेत काही मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.
 
5.या रोगाचा प्रसार किती प्रमाणात होतो?
हा रोग पहिल्यांदा एका अपहरण केलेल्या माकडात आढळला होता. 1970 पासून अनेकदा हा रोग 10 अफ्रिकन देशात पाहायला मिळालं आहे.
 
2003 मध्ये अमेरिकेत या रोगाचा प्रसार झाला होता. आफ्रिकेच्या बाहेर झालेला या रोगाचा हा पहिलाच प्रसार होता. आफ्रिकन देशातून आयात केलेल्या काही छोट्या सस्तन प्राण्यांत हा रोग आढळला होता. त्यांच्यावाटे तो कुत्र्यांना झाला आणि या कुत्र्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला झाला. तेव्हा 81 केसेस आढळल्या होत्या. पण कोणत्याच रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
 
2017 मध्ये नायजेरियात या रोगाचा मोठा उद्रेक झाला होता. पहिला रुग्ण सापडल्यानंतर तब्बल 40 वर्षानंतर हा उद्रेक झाला होता. तेव्हा 172 रुग्ण सापडल्याचा संशय होता. त्यापैकी 75 टक्के पुरुष होते आणि त्यांचं वय 21 ते 40 दरम्यान होतं.
 
6.उपचार काय?
या रोगासाठी कोणताच उपचार नाही. रोगाचा प्रसार वाचवणं हाच एक उपाय आहे. मंकीपॉक्सलविरुद्ध लसींची उपयुक्तता 85 टक्क्यांपर्यंत आहे. काही केसेसमध्ये अजूनही त्यांचा वापर होतो.
 
7.लोकांनी घाबरून जायला हवं का?
तज्ज्ञांच्या मते सध्या घाबरण्याची अजिबात गरज नाही. इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मते धोका अत्यल्प आहे.
 
नॉटिंगहॅम विद्यापीठातले विषाणूशास्त्राचे प्राध्यापक डॉ. निक फिन म्हणतात, "हा रोग सहजासहजी पसरत नाही हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एकूणच जनतेला या रोगाचा धोका कमी आहे. जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्याशी संपर्कात आलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची आणि त्यांना शक्य तितकी मदत करण्याची प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभाग पार पाडत आहे."
 
8. समलिंगी पुरुषांना याचा अधिक धोका आहे का?
युरोपमध्ये समलैंगिंक संबंध असणाऱ्या पुरुषांमध्ये याचा प्रसार झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र मंकीपॉक्स हा लैंगिंक संबंधाद्वारे पसरणारा रोग मानला जात नाही.
 
जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ अँडी सिल सांगतात, "काही पुरुषांमध्ये असा प्रसार दिसून आला आहे परंतु काही लोकांद्वारे याला सोशल मीडियावर समलिंगी आजार म्हटलं जात आहे, तसं नाहीये. या आजाराच्या अगदी जवळच्या संपर्कात आल्यावर तो होतो. लैंगिक संबंधातून होणाऱ्या आजारात प्रसार होण्यासाठी लैंगिक संबंध कारणीभूत असतात. परंतु मंकीपॉक्सचा प्रसार लैंगिक संबंधातून होत नाही."
 
9. लहान मुलांना मंकीपॉक्स होतो का?
हो, लहान मुलांना मंकीपॉक्स होऊ शकतो. प्रौढांपेक्षा पौगंडावस्थेतील मुलांना मंकीपॉक्स होण्याची शक्यता फार असते. नवजात बालकाला जन्माच्या वेळेस किंवा शारीरिक जवळीकेतून मंकीपॉक्स होऊ शकतो.
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2024 नंतरच्या राजकारणाची सूत्र आपल्याकडेच - रोहित पवार