म्यानमारमधील सशस्त्र अल्पसंख्याक वांशिक गटाच्या नियंत्रणाखालील गावावर लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 40 लोक ठार आणि सुमारे 20 जखमी झाले. जातीय गट आणि स्थानिक सेवाभावी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. हवाई हल्ल्यामुळे लागलेल्या आगीत शेकडो घरे जळून खाक झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. पश्चिम राखीन राज्यातील अल्पसंख्याक वांशिक गट अराकान आर्मीच्या नियंत्रणाखाली असलेल्या रामरी बेटावरील क्यौक नी माव गावात बुधवारी हा हल्ला झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, लष्कराने या भागात कोणत्याही हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही. गावातील परिस्थितीची स्वतंत्रपणे पुष्टी करता येत नाही, कारण परिसरात इंटरनेट आणि मोबाईल फोन सेवा जवळजवळ विस्कळीत झाली आहे.