Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नासाने आर्टेमिसचे प्रक्षेपण थांबवले, या मोहिमेचे महत्त्व काय आहे?

nasa
, सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (18:49 IST)
जान्हवी मुळे
सर्व जगाचे लक्ष असलेल्या 'आर्टेमिस' यानाचे प्रक्षेपण आजच्यासाठी थांबवले आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाची आज मोहीम सुरू होणार होती. पण तांत्रिक कारणामुळे हे प्रक्षेपण थांबवण्यात आले आहे. पुढील सूचना येईपर्यंत हे प्रक्षेपण थांबवण्यात आलेले आहे.
 
लाँच डायरेक्टर चार्ली ब्लॅकवेल यांनी सांगितले की 'इंजिन ब्लीड'मुळे यानाचे प्रक्षेपण थांबवण्यात आले आहे. वैज्ञानिक डेटा जमा करून याची माहिती घेतील.
 
चंद्राला गवसणी घालून हे यान सहा आठवड्यांनी पृथ्वीवर परतणार अशी योजना होती. ही महत्त्वाकांक्षी योजना विज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल मानली गेली आहे.
 
केवळ नासाच नाही, तर भारतातील इस्रो ही संस्थाही चांद्र मोहीमेवर काम करते आहे. पण हे सगळं कशासाठी सुरू आहे?
 
आर्टेमिस प्रकल्प काय आहे?
20 जुलै 1969 रोजी अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांच्या रूपानं मानवानं चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. नासाच्या अपोलो-11 मोहिमेअंतर्गत ते चंद्रावर गेले होते.
 
डिसेंबर 1972 मध्ये अपोलो-17 पृथ्वीवर परतलं आणि त्यानंतर अपोलो मोहिमा स्थगित झाल्या. म्हणजे माणूस चंद्रावर जाऊन आला, त्याला आता 50 वर्षं पूर्ण होतायत.
 
या पन्नास वर्षांत तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे आणि पुन्हा एकदा नासा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे.
 
या नव्या मोहिमेचं नाव आहे, आर्टेमिस. अपोलोप्रमाणेच आर्टेमिस हे एका ग्रीक देवतेचं नाव आहे. पुराणकथांमध्ये आर्टेमिस ही अपोलोची जुळी बहीण आणि चंद्राची देवी असल्याचं मानलं जातं. म्हणजे नासानं केवढं समर्पक नाव दिलंय बघा.
 
अपोलो मोहिमेद्वारा नासानं 24 पुरुषांना अंतराळात पाठवलं होतं, ज्यातल्या 12 जणांना प्रत्यक्षात चंद्रावर उतरण्याची संधी मिळाली. पण हे सर्व पुरुष आणि गौरवर्णीय होते.
 
आर्टेमिस प्रकल्पाअंतर्गत पहिल्यांदाच महिला आणि गैर-गौरवर्णीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याचा नासाचा मानस आहे.
 
आर्टेमिस प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यांत रॉकेट तयार करण्यासाठी नासा इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीची मदतही घेणार आहे. म्हणजे पहिल्यांदाच एखादी खासगी कंपनी चांद्र मोहिमेत सहभागी होईल.
 
अशी आहे आर्टेमिस-1 मोहिम
 
आर्टेमिस-1 हा या प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. त्याअंतर्गत नासाचं नवं स्पेस लाँच सिस्टिम अर्थात एसएलएस ओरायन या अंतराळयानाला घेऊन अवकाशात झेपावेल.
 
एक मीटर रुंद आणि पाच मीटर लांब असलेल्या या यानात मानवाकृती पुतळेही ठेवण्यात आले आहेत, ज्यांना कमांडर मॅनिकिन कँपोस, हेल्गा आणि जोहार अशी नावं देण्यात आली आहेत. आर्टेमिसच्या पुढच्या मोहिमांमध्ये वापरण्यासाठी तयार केलेले स्पेससूट्स आणि इतर गोष्टींची तपासणी या मोहीमेत होणार आहे.
 
पृथ्वीवरून उड्डाण केल्यावर हे यान चंद्राला प्रदक्षिणा घालून 10 ऑक्टोबर 2022 रोजी पृथ्वीवर परतेल आणि पॅसिफिक महासागरात स्प्लॅश डाऊन करेल. या 42 दिवसांत ओरायन यान 13 लाख मैलांचा प्रवास करणार आहे.
 
हे यान पृथ्वीवर परतेल तेव्हा तो काळ या मोहिमेसाठी मोठा कसोटीचा असेल. पृथ्वीच्या वातावरणात शिरताना ओरायन अतिशय वेगानं खाली येईल, हा वेग ताशी 38,000 किलोमीटर म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्ष 32 पट जास्त असेल. अशा वेळेस वातावरणाशी घर्षण होईल, तेव्हा ओरायन यानाचं उष्णताविरोधी कवच तग धरून राहतं का हे तपासलं जाईल.
 
सगळ्या चाचण्या व्यवस्थित पार पडल्या, तर 2024 साली या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे आर्टेमिस-2 मोहिमेतून प्रत्यक्ष माणसांना चंद्राच्या कक्षेत पाठवलं जाणार आहे. तर 2025 साली आर्टेमिस-3 मध्ये दोन अंतराळवीर चंद्रावर उतरतील.
 
नासासाठीच नाही, तर युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)साठीही ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे. कारण या यानाच्या पुढच्या मुख्य भागाला अंतराळात पुढे ढकलणारं सर्विस मोड्यूल हे ईएसएनं तयार केलं आहे. या सहकार्याची परतफेड म्हणून भविष्यातल्या मोहिमांद्वारा युरोपियन अंतराळवीरांना चंद्रावर उतरता येईल अशी ईएसएला अपेक्षा आहे.
 
पण सध्या चांद्र मोहिमेवर काम करणारा अमेरिका हा एकमेव देश नाही. जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि रशिया हे देशही सध्या ल्यूनर मिशन म्हणजे चांद्र मोहिमांवर काम करत आहेत. भारतही यात मागे नाही.
 
भारताची चांद्र मोहीम - चांद्रयान-3
 
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत एक रोव्हर चंद्रावर उतरवण्याचा (सॉफ्ट लँडिंग) प्रयत्न केला होता जो अपयशी ठरला.
 
पण पुढच्या वर्षापर्यंत चांद्रयान-3 अवकाशात झेपावू शकेल अशी अपेक्षा आहे. या मोहिमेतही चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला जाईल. चंद्राच्या पृथ्वीपासून पलीकडे असलेल्या भागावर हे यान उतरवण्याची योजना आहे.
 
चांद्रयान सोबतच इस्रोची टीम गगनयान मोहिमेवर काम करत आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय बनावटीच्या रॉकेट आणि यानातून भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची आणि पृथ्वीवर परत आणण्याची इस्रोची योजना आहे.
 
पण मुळात अशा मोहिमेची गरज काय आहे?
 
चांद्र मोहिमांवर खर्च कशासाठी?
सध्या सुरू असलेल्या चांद्र मोहिमा म्हणजे कुणाला ही नव्या युगाची अंतराळशर्यत किंवा स्पेस रेस आहे असं वाटतं. तर कुणाच्या मते आपल्या देशातलं तंत्रज्ञान किती विकसित आहे, हे दाखवण्याची ही संधी ठरू शकते.
 
आर्टेमिस प्रकल्पात आणि इतर देशांमध्येही सध्या सुरू असलेल्या चांद्र मोहिमांमध्ये मानवरहित मोहिमांची संख्या मोठी आहे. या मोहिमांतून जीवनावश्यक सामुग्री चंद्रावर पाठवली जाणार आहे, म्हणजे दशकभरात काही माणसं चंद्रावर राहायाला जाऊ शकतात. तिथे अभ्यास करू शकतात. चंद्राजवळ अंतराळात ल्यूनर स्पेस स्टेशनच्या उभारणीचीही योजना आहे.
 
भविष्यात माणसाला मंगळावर जायचं असेल, तर त्या मोहिमेच्या तयारीसाठी हा टप्पा महत्त्वाचा असणार आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन याविषयी बीबीसीच्या जोनाथन अमोस यांना माहिती देतात, "मंगळ मोहिमेचं वेळापत्रक बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतानाच आखण्यात आलं होतं. त्यांनी 2033 ही पर्यंतची मुदत दिली होती. पण त्यानंतरच्या दोन्ही राष्ट्राध्यक्षांनीही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. सध्याची परिस्थिती पाहता 2030च्या दशकात, 2040 पर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं."
 
फक्त चंद्रावर जाण्यासाठी एवढा खर्च का करायचा? असा प्रश्न तुमच्यापैकी काहींना पडला असेल. पण अवकाश मोहिमा किंवा अंतराळ संशोधनातून नवं तंत्रज्ञान विकसित होतं, नवा वैज्ञानिक दृष्टीकोन तयार होऊ शकतो आणि सुधारणा होत जातात तसा अशा मोहिमांवरचा खर्चही कमी करता येतो. या गोष्टी मानवाच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्सअॅपवर JioMart लाँच करण्यासाठी Meta, Jio यांनी हातमिळवणी केली