देशभरात काल स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु, भारताचा शेजारील देश आणि पारंपारिक शत्रू असणाऱ्या पाकिस्तानमध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन काळा दिवस म्हणून पाळला गेला. जम्मू -काश्मीरबाबतच्या भारताच्या निर्णयाचा सुरूवातीपासूनच पाकने विरोध केला आहे त्यातच काल सरकारच्या या निर्णयाचा निषेध म्हणून देशभरात काळा दिवस पाळण्यात आला.
केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार आणि वाहतूक संबंध तोडले. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनीही गुरुवारी पानावर काळी चौकट प्रसिद्ध केली तर तेथील सर्वच नेते, रेडिओ पाकिस्तान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही आपल्या सोशल मीडियावरील प्रोफाइल बदलून ते काळे केले. पाकिस्तानी नागरिकांनीही घराचे छत आणि गाड्यांवर काळे झेंडे लावले. इस्लामाबादसह सर्वच प्रमुख शहरांत तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्येही भारतविरोधी मोर्चे काढण्यात आले.