मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा पीडित मोशे होल्झबर्ग याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरुसलेममध्ये भेट घेतली. यावेळी मोदी, तुम्ही मला आवडता असे 11 वर्षांच्या लहानग्या मोशे याने मोदींना सांगितले. तर तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू भारताला भेट देऊ शकतोस असे आमंत्रण देतानाच, तुला आणि तुझ्या कुटुंबाला दिर्घ मुदतीचा व्हीसा दिला जाईल असे मोदींनी मोशेला यावेळी आश्वासन दिले.
26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. बेबी मोशे आणि त्याचे इस्त्रायली आई-वडील मुंबईच्या नरीमन हाऊसमध्ये राहात होते. 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊसला लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात 173 लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये बेबी मोशेचे आई-वडीलही होते. त्यावेळी दोन वर्षांच्या मोशेला त्याला सांभाळणाऱ्या सैंड्रा सैम्युअल या महिलेने वाचवले. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यात मोशेने त्याचे आई वडील गमावले. मोशेच्या आई – वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचे आजी-आजोबा मोशेला इस्रायलला घेऊन गेले. मोशेला सांभाळणारी सॅंड्रा सॅम्युअलही इस्त्रायलला गेली… तिने स्वतःच्या मुलासारखे मोशेला सांभाळले आहे. 26/11 च्या घटनेनंतर मोशेला इस्त्रायलचे नागरिकत्व देण्यात आले. सॅंड्रालाही दोन वर्षांनंतर इस्रायलचे नागरिकत्व दिले गेले. तसेच सॅंड्राने दाखवलेल्या धैर्याबद्दल तिचा इस्त्रायलमध्ये सन्मानही करण्यात आला.