पाकिस्तानातील क्वेटा येथील नवाब अकबर बुगती स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या प्रदर्शनीय सामन्यादरम्यान स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले.
स्फोटाच्या आवाजानंतर सामना काही काळ थांबवण्यात आला आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम, शाहिद आफ्रिदी आणि इतर प्रमुख खेळाडूंना सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
मात्र, सुरक्षा तपासणीनंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला.
पाकिस्तानचे बहुतांश खेळाडू स्टेडियममध्ये उपस्थित होते
रिपोर्टनुसार, स्फोटाच्या वेळी बाबर, आफ्रिदी, इफ्तिखार अहमद, वहाब रियाझ यांच्यासह पाकिस्तान क्रिकेट संघातील अनेक दिग्गज खेळाडू स्टेडियममध्ये उपस्थित होते.
पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा एक प्रदर्शन सामना खेळण्यासाठी ते स्टेडियममध्ये थांबले होते.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोटानंतर सामना थांबवण्यात आला आणि सर्व खेळाडूंना पोलीस संरक्षणात ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले. त्यानंतर सुरक्षा तपासणीनंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला.
या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने घेतली आहे
प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) रविवारीच एक निवेदन जारी करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
टीटीपीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा स्फोट सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आला होता.
स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात आतापर्यंत पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.