येत्या १० ऑगस्टपूर्वी कोरोनाची लस बाजारात आणणार असल्याचं रशियन प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 'ही' जगातली पहिली कोरोना लस ठरणार आहे. सुरुवातीला रशियाकडून ही लस ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच १५ ऑगस्टपर्यंत बाजारात आणण्याची तयारी केली गेली होती. मात्र, आता ती १० ऑगस्टपर्यंतच बाजारात येऊ शकते, असं रशियन वैज्ञानिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी लागणाऱ्या सरकारी स्तरावरच्या परवानग्यांसाठी काम सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, या लसीच्या किती पातळ्यांवर चाचण्या झाल्या आहेत आणि त्या किती यशस्वी ठरल्या आहेत, याविषयी मात्र अद्याप पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही.
ही लस बाजारात आल्यानंतर सामान्य नागरिकांच्या आधी डॉक्टर, नर्स अशा आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ती दिली जाणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षमपणे कोरोनाचा सामना करू शकेल आणि त्यांच्या उत्साह देखील वाढेल, असं रशियन वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.