उत्तर कोरियाने गुरुवारी दोन क्षेपणास्त्र जपानी समुद्रात डागले होते. त्या दोन क्षेपणास्त्रांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे.
उत्तर कोरियाने गेल्या एका वर्षात केलेली ही पहिलीच चाचणी होती. तसंच जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर उत्तर कोरियाने पहिल्यांदाच अशा प्रकारची चाचणी केली आहे.
अमेरिकेसह जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध नोंदवला आहे. याचं प्रत्युत्तर त्याच पद्धतीने देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया बायडन यांनी दिली.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नियमांनुसार उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र चाचणी करण्यास बंदी आहे.
उत्तर कोरियाने या चाचणीबाबत शुक्रवारी (26 मार्च) एक प्रसिद्धीपत्रकही काढलं. त्यामधील माहितीनुसार, उत्तर कोरियाने आपल्या पूर्व सीमेवरून 600 किलोमीटरवरचं लक्ष्य या दोन क्षेपणास्त्रांनी गाठलं.
पण, याचवेळी त्यांच्याकडून जपानच्या सीमेचं उल्लंघनची झालेलं आहे.
या शस्त्रास्त्रांची निर्मिती म्हणजे मोठं यश आहे. यामुळे देशाच्या लष्करी सामर्थ्याला ताकद मिळेल. इतरांकडून मिळणाऱ्या धमकीचं सडेतोड उत्तर देता येईल, असं ज्येष्ठ नेते रि प्योंग चोल यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
चोल यांनीच हे परीक्षण केलं, यावेळी किम जोंग उन उपस्थित नव्हते, असं या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलं आहे.
नवीन क्षेपणास्त्राची वहनक्षमता 2.5 टन इतकी आहे. एखादं अणुबॉम्बही यामधून वाहून नेता येऊ शकतं, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
उत्तर कोरियाची चाचणी आता कशासाठी?
उत्तर कोरिया करत असलेली ही चाचणी आता कशासाठी करण्यात येत आहे, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो.
पण याचं सोपं उत्तर आपल्याला मिळणार नाही.
सर्वप्रथम, त्यांची इच्छा असल्याने ते या चाचण्या करतात. त्यांना नवनव्या शस्त्रास्त्रांची चाचणी करायची असते.
पण नुकतीच केलेली ही चाचणी बायडन प्रशासनाला एक इशारा असल्याचं सांगितलं जात आहे.
दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर संस्थेच्या माहितीनुसार उत्तर कोरियाने जो बायडन यांच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचं ठरवलं होतं.
उत्तर कोरियाचा नागरिक असलेला संशयित आरोपी मुन चोल म्याँग याचं मलेशियातून अमेरिकेत प्रत्यर्पण करण्यात आलं होतं. तसंच संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत उत्तर कोरियाविरोधात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या सगळ्यांचा निषेध उत्तर कोरिया क्षेपणास्त्र चाचणीच्या माध्यमातून नोंदवत आहे, असं म्हटलं जात आहे.
उत्तर कोरिया त्यांच्या देशातील नागरिकांना देत असलेली संदेश आणि जगाला देण्यात येणारा संदेश यामध्ये मोठा फरक आहे.
उत्तर कोरियातील एका सरकारी वृत्तपत्रातील बातमीनुसार, किम जोंग उन हे नव्या प्रवासी बसची चाचणी घेत होते, क्षेपणास्त्रांची नव्हे.
किम जोंग यांना जगभरात मोठी लष्करी शक्ती म्हणून उदयाला यायचं आहे. पण त्यांच्या स्वतःच्या देशात आपली आर्थिक परिवर्तनवादी प्रतिमा त्यांना तयार करायची आहे.
उत्तर कोरियाने घेतलेली ही चाचणी म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन असल्याचं जो बायडन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं.
आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल, असं बायडन यांनी म्हटलं आहे.
सोबतच मी सौहार्दाचे संबंध बनवण्यासाठीही तयार आहे. पण त्यासाठी त्यांनी आण्विक चाचण्यांपासून दूर (डिन्यूक्लिअरायझेशन) जाण्याची अट असेल, असं बायडन म्हणाले.
नॉर्थ कोरियाने नेमकं कोणत्या प्रकारचं क्षेपणास्त्र डागलं याची स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही.
तेथील सरकारी माध्यम KCNA मधील बातमीनुसार, ही सॉलिड फ्यूएल इंजीनची अद्ययावत आवृत्ती आहे. कमी उंचीवरून उडाण घेत मारा करण्याची क्षमता यामध्ये आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळातही अशाच प्रकारची डिन्यूक्लिअरायझेशन विषयाची चर्चा झाली होती. त्यानंतरही ही चाचणी करण्यात आल्याने उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्र मोहिमेची प्रगती यातून दिसून येते.
उत्तर कोरियाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही अशीच एक चाचणी घेतली होती. हे तेच क्षेपणास्त्र असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्या क्षेपणास्त्राचं हे सुधारित स्वरुप असेल तर प्रत्यक्षात ही खूप मोठी बाब आहे, असं मत जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉनप्रोलिफिरेशन स्टडीजचे (CNS) संशोधक जेफ्री लुईस यांनी म्हटलं.
अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या मदतीने उत्तर कोरियाला वजनदार आण्विक शस्त्र सोडणं सहज शक्य आहे, असं विपीन नारंग यांनीही सांगितलं. नारंग हे MIT मध्ये संरक्षणविषयक प्राध्यापक आहेत.
अशा प्रकारची शस्त्रं बनवणं अवघड आहे. पण उत्तर कोरियाने ही क्षमता आधीच विकसित केलेली आहे, असंही काही जाणकारांचं मत आहे.
उत्तर कोरियाने एका वर्षापूर्वी बॅलिस्टीक मिसाईलची चाचणी घेतली होती. तेव्हा अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरिया प्रमुख किम जोंग उन यांच्यात तणाव निर्माण झाला होता.
उत्तर कोरियासोबत संबंध निर्माण करण्यास आपल्याला अपयश आलं, अशी कबुली बायडन प्रशासनानेही दिली आहे.