मुंबईच्या भांडूप भागातील ड्रिम्स मॅाल सनराईज रुग्णालयाला शुक्रवारी पहाटे आग लागली. मुंबई आपत्कालिन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातून 76 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत होते. ही आग आता अटोक्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
आपत्कालीन विभागाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, 30 कोरोना रुग्णांना पालिकेच्या जंबो रुग्णालयात हालवण्यात आलं आहे तर इतर 30 रुग्णांना फोर्टिस रुग्णालय पाठव्यात आलं आहे. इतर रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आग मोठी अजून आगीचं ठोस कारण समजू शकलेलं नाही.
याठिकाणी सात रुग्ण व्हॅन्टिलेटरवर उपचार घेत होते अशी पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत सहा जणांचा मृत्यू झालाय.
आग विझवण्यासाठी 22 आगीचे बंब पाठवण्यात आले होते.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पहिल्यांदाच मॉलमध्ये हॉस्पिटल बघत असून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्या म्हणाल्या. आगीचं कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल, असं पेडणेकर यांनी म्हटलं.