- शुमाएला खान
''आजपर्यंत कोणत्याही हिंदू मुलीनं पुढं पाऊल टाकलेलं नाही. तसंच कोणतीही हिंदू मुलगी क्रीडा क्षेत्रात आलेली नाही. आमच्या हिंदू समुदायात तर आई-वडील मुलींना शिक्षणाची परवानगीही देत नाहीत. पण मी खूप आनंदी आणि नशीबवान आहे कारण मला चांगले आई-वडील लाभले.''
या आहेत तुलसी मेघवार. त्या पाकिस्तानातील सॉफ्टबॉल आणि बेसबॉलच्या नॅशनल चॅम्पियन आणि पहिल्या हिंदू स्पोर्ट्स गर्ल आहेत.
21 वर्षीय तुलसी मेघवार पाकिस्तानातील सिंध प्रातांच्या कोटरी शहरात साधू मोहल्ल्यात राहतात. फाळणीच्या पूर्वीपासूनचा हा भाग आहे. याठिकाणी गुरुनानक यांचे पुत्र बाबा श्रीचंद यांचा प्राचीन दरबारही आहे.
तुलसी मेघवार यांनी सांगितलं की, 2016 मध्ये त्या सहाव्या वर्गात शिकत होत्या तेव्हा शाळेत एक स्पोर्ट्स कॅम्प झाला होता. त्यात अनेक मुली सहभागी झाल्या होत्या.
त्यांनाही त्या कॅम्पमध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली आणि सुदैवानं त्यांची निवडही झाली.
'बेसबॉल आणि सॉफ्टबॉल खेळ आहेत हेही माहिती नव्हतं'
''मला बेसबॉल आणि सॉफ्टबॉल हे खेळ आहेत हेही माहिती नव्हतं. ते कसे खेळतात माहिती नव्हतं. कारण पाकिस्तानात प्रामुख्याने क्रिकेट खेळलं जातं.
मी कॅम्पमध्ये सहभागी झाले तेव्हा मला समजलं की हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ असून तो जागतिक स्तरावर खेळला जातो. ''
तुलसी मेघवार यांनी आतापर्यंत बेसबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धा, दोन सिंध गेम्स आणि तीन स्थानिक ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या आहेत. त्यासाठी त्यांना सुवर्ण पदकांसह अनेक पदकं आणि प्रमाणपत्रं मिळालेली आहेत.
मुलांच्या मैदानात मुली
कोटरी सिंध नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं एक छोटंसं शहर आहे. याठिकाणी खेळाडू आणि सामान्य लोक अशा सर्वांसाठी हिरवळ किंवा गवत असलेलं एकच मैदान आहे.
सूर्यास्तापूर्वी हे एकमेव मैदान क्रिकेट आणि फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचं खेळण्याचं मैदान असतं आणि सूर्यास्तानंतर त्याठिकाणी फॅमिली पार्क तयार होतं.
तुलसी मेघवार म्हणाल्या, "इथं मुलींसाठी वेगळं मैदान नाही. त्या याच स्थानिक मैदानात सराव करतात, तिथं मुलंही खेळत असतात.
त्यांच्यामध्येच मुलीही खेळत असतात, त्यामुळं खूप अडचणी येतात. नॅशनल गेम्ससाठी जायचं असेल तर खूप सराव करावा लागतो. पण इथं खूप अडचणींनंतर सराव करता येतो."
मैदानाशिवाय तुलसी घरी बहिणीबरोबरही सराव करतात. पण त्यांच्याकडे मर्यादीत सुविधा आहेत. शिकण्यासाठी तर त्यांच्याकडे असलेलं एकमेव साधन म्हणजे, इंटरनेट आणि यूट्यूब.
"मी टीव्हीवर पाहते, इंटरनेटवर बेसबॉलच्या सामन्यांचे व्हीडिओ सर्च करते. मुलींना खेळताना पाहून मला खूप आनंद होतो. हे व्हीडिओ पाहून त्यांचे नियम समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्या कशा खेळतात ते पाहून मीही तसं खेळण्याचा प्रयत्न करते."
'एका कानाने ऐकायचं दुसऱ्यानं सोडायचं'
तुलसी मेघवार यांचे वडील हरजी मेघवार पत्रकार आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते हिंदू समुदायाचं वृत्तपत्र 'संदेश' चालवत होते. पण आर्थिक संकटामुळं त्यांना ते सुरू ठेवता आलं नाही.
हरजी म्हणाले की, जेव्हा त्यांनी मुलींना शिकवण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या समुदायानं त्यांना बरंच काही ऐकवलं.
मुली हाताबाहेर जातील असं म्हटलं पण त्यांनी कुणाच्याही बोलण्याकडं लक्ष दिलं नाही.
तुलसी मेघवार आणि त्यांच्या दोन मोठ्या बहिणी शिक्षणाबरोबरच घरात शिवणकाम आणि विणकाम करातत. त्यापासून तयार केलेल्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करतात.
तुलसी बाईक चालवतात आणि स्वतःच्या बाईकवर प्रॅक्टिससाठी जातात.
तुलसी यांच्या मते, त्या क्रीडा क्षेत्रात आल्या तेव्हा हिंदू समुदायाच्या काही लोकांनी त्यांचं कौतुक केलं, तर काहींनी टीका केली.
"हिंदू समुदायातील काही जणांनी कौतुक केलं. पाकिस्तानातून पहिली हिंदू मुलगी पुढं जात आहे, असं म्हटलं. पण काही लोकांनी एकटी मुलगी बाहेर कशी जाणार, आई-वडील कसे असं करू देत आहे, असं म्हणत टीकाही केली," असंही त्या म्हणाल्या.
"मी त्यांचं म्हणणं एका कानानं ऐकते आणि दुसऱ्या कानानं सोडून देते. मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. मला काय करायचं आहे, हे मला माहिती आहे. मला पुढं जायचं आहे. मी सध्या सिंधच्या पातळीवर खेळत आहे, पण मी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावं असे माझ्या आई-वडिलांचे आणि माझे प्रयत्न आहेत," असंही तुलसी म्हणाल्या.