Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुर्की भूकंप : भूकंपात आई गेली, पण नाळही न कापलेलं बाळ मात्र ढिगाऱ्याखाली जिवंत राहिलं

baby legs
, शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (17:37 IST)
5 फेब्रुवारी 2023...लहानगी इरमाक आपल्या घरात, गादीवर निवांतपणे झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिच्या गादीवरच होती, पण झोपेतून जागी झालीच नाही. इरमाकवर घराच्या छताचा एक भाग कोसळला होता...
इरमाकने जगाचा निरोप घेतला होता, पण तिचे वडील तिला निरोप देऊच शकत नव्हते. तिचे वडील मेसूत हंसर यांनी इरमाकचा एक हात हातात घेतला होता. काही तासांपूर्वी हसत्या खेळत्या असलेल्या आपल्या घराच्या ढिगाऱ्याजवळ ते बसून होते.
 
आपल्या मुलीला असं पाहून त्यांचं मन सुन्न झालं होतं... पण डोळ्यांतलं पाणी आटलं होतं आणि चेहरा निर्विकार होता. भूकंपाचा धक्का बसलेल्या तुर्कीमधल्या कहरामनमारस शहरात राहणारे मेसूत काहीच बोलत नाहीयेत. पण त्यांचा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या मनातली कालवाकालव तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही...तिथे शब्दही अपुरे पडतील.
 
काही सेकंदात हजारो लोक कसे आपले प्राण गमावतात, लाखोंच्या आयुष्यात कसा एका क्षणात अंधार होऊ शकतो, याचं ताजं आणि हृदयद्रावक उदाहरण म्हणजे तुर्की आणि सीरियामध्ये झालेला भूकंप.
 
दोन्ही देशांमध्ये भूकंपामुळे 15 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे.
 
ढिगाऱ्याखालून अजूनही लोकांना बाहेर काढलं जात आहे. कोणालाही ढिगाऱ्याखालून काढलं की सर्वांत आधी ती व्यक्ती जिवंत आहे की नाही हे आधी पाहिलं जात आहे.
 
या लेखात आपण अशाकाही व्यक्तींबद्दल बोलणार आहोत, ज्यांचं आयुष्य चमत्कारापेक्षा कमी नाही. अनेक तास ढिगाऱ्याखाली राहून, मृत्यूशी झुंज देऊन हे लोक परतले आहेत.
 
ही गोष्ट केवळ एवढ्याच लोकांची नाहीये...तुर्की आणि सीरियातले कित्येक लोक अशा अनुभवातून जात आहेत. जे वाचू शकले, त्यांचे अनुभव चमत्कार मानले जात आहेत आणि जे वाचले नाहीत, त्यांच्या केवळ आठवणीच उरल्या आहेत...
 
ढिगाऱ्याखाली राहूनही वाचलं हे तान्हं बाळ
ठिकाण- उत्तर सीरियातला एफरीन भाग
 
विनाशकारी भूकंप होऊन अनेक तास उलटून गेले होते.
बचाव कार्य सुरू होतं. क्रेनच्या मदतीने ढिगारे हटविण्यात येत होते. तेवढ्यात अचानक गोंधळ सुरू झाला. एक माणूस ढिगाऱ्यातून काही तासांपूर्वीच जन्म झालेल्या मुलीला घेऊन धावत येत होता. ही नवजात मुलगी जेव्हा सापडली, तेव्हा तिची नाळही तशीच होती. पण तिच्या आईचा मृत्यू झाला होता, मुलगी मात्र वाचली होती.
 
बाळ जिथे सापडलं होतं, तिथेच त्याचं घर होतं. काही तासांपूर्वी या घरात कदाचित या मुलीच्या जन्माची तयारी सुरू असेल...पण आता या घरातले सर्वच जण मृत्यूमुखी पडले आहेत. वाचला आहे हा चिमुकला जीव. तिला जवळ घेऊन खेळवायलाही कोणी राहिलं नाहीये.
 
या बाळाच्या वडीलांचे चुलत भाऊ खलील अल्-सुवादी यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं, "मुलीच्या आई-वडिलांचे मृतदेह एकमेकांच्या शेजारीच होते. आम्ही ढिगारा उपसत होतो, तेव्हा आम्हाला आवाज ऐकू आला. आम्ही अजून खोदकाम केलं. दगड-माती बाजूला केल्यावर आम्हाला बाळ सापडलं. त्याची नाळ आईसोबत जोडलेलीच होती. आम्ही त्याला वेगळं केलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो."
या बाळावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
 
जे रंग आणि चेहरे ओळखायला या बाळाला वर्षं लागली असती, तेच आता जन्माबरोबरच त्याच्या अस्तित्त्वाशी कसे जोडले गेले आहेत याची झलक एका व्हीडिओमध्ये पाहायला मिळते.
 
एएफपीच्या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती मृतदेह दाखवताना सांगतो, "जांभळ्या रंगाच्या चादरीमधील मृतदेह मुलीच्या काकूचा आहे, पिवळ्या रंगाच्या चादरीत बाळाच्या आईचा मृतदेह आहे, तपकिरी रंगाच्या चादरीमध्ये मुलीचे वडील आहेत."
 
पाण्याच्या काही थेंबांनी दिलं जीवनदान
स्थळ- तुर्कीमधील हाते
 
एक लहान मुलगा ढिगाऱ्याखाली अडकलेला आहे. त्याचे डोळे उघडे आहेत. एक व्यक्ती त्याला बाटलीच्या टोपणाने पाणी पाजत आहे.
 
ही व्यक्ती बचाव पथकाचा सदस्य आहे.
 
मुलगा 45 तासांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेला होता. मुलाचं नाव आहे मोहम्मद.
बचाव पथकातील कर्मचारी त्याला सांगत असतात, "मोहम्मद, पाणी पी...पाणी पी." तो जेव्हा पाणी पितो, तेव्हा ते त्याला म्हणतात- "शाब्बास, खूप छान"
 
मुलाच्या चेहऱ्यावर फिकट हसू उमटतं आणि ते पाहून बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनाही आनंद होतो.
 
ते सांगतात, "आता जास्त वेळ लागणार नाही. धीर सोडायचा नाही मोहम्मद...शाब्बास! आता अजून तोंड उघड."
 
हा मुलगा मूळचा सीरियाचा आहे. स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, मुलाचं नाव मोहम्मद अहमद आहे आणि तो भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकला होता.
 
50 तासांनंतर ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर पडला पोपट
स्थळ- तुर्कीमधलं मलाट्या
 
माणूस असो की एखादा प्राणी किंवा पक्षी, प्रत्येकाच्या आयुष्याला मोल आहे.
 
जर एखाद्या व्यक्तीला वाचवण्यात आल्यानंतर आनंद साजरा केला जात असेल, तर एखाद्या पक्ष्याचा जीव वाचल्यावरही हीच भावना निर्माण व्हायला हवी.
 
तुर्कीमध्ये ढिगाऱ्याखालून एका पोपटाला जिवंत बाहेर काढण्यात आलं. हा पोपट जसा बाहेर आला, तसा लोकांनी जल्लोष केला.
या पोपटाला बाहेर काढल्यावर एका बॉक्समध्ये ठेवण्यात आलं आणि सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं.
 
सात मजली इमारत आणि 62 तास
स्थळ- तुर्कीमधलं अदियामन
 
भूकंपाचे धक्के बसले, तेव्हा लोक गाढ झोपेत होते. भूकंपानंतर तातडीने बचावकार्य हाती घेतलं गेलं.
 
भूकंप आल्यानंतर जवळपास 62 तासांनंतर लोकांना एक चमत्कार पाहायला मिळाला.
सात मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 12 वर्षांच्या एका मुलाला जिवंत बाहेर काढण्यात आलं. गेट्टी या फोटो एजन्सीने या मुलाचं नाव किहिन अमीर असल्याचं म्हटलं आहे.
 
संपूर्ण कुटुंबाला जिवंत बाहेर काढण्यात यश
स्थळ-सीरिया
 
5 फेब्रुवारीला ज्या छताखाली पूर्ण कुटुंब झोपलं होतं, त्याच ठिकाणाहून अनेक तासांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं.
 
ही गोष्ट अत्यंत चमत्कारिक आणि दुर्मीळ मानली जात आहे. व्हीडिओमध्ये बचाव पथक आधी घरातील लहान मुलांना बाहेर काढताना दिसत आहे आणि नंतर मोठ्या माणसांना
 
या सगळ्यांना थेट अँब्युलन्समध्ये नेलं जातं आणि तिथून हॉस्पिटलमध्ये.
सीरिया हे असं ठिकाण आहे, जे गेल्या दशकभरापासून विध्वंसाला सामोरं जात आहे. कधी हा विध्वंस इस्लामिक स्टेटमुळे झालेला पाहायला मिळतो, तर कधी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे
सीरियामध्ये काही ठिकाणं अशीही आहेत, जिथे भूकंपानंतर कित्येक तास मदतच पोहोचली नव्हती. केवळ मदतीसाठीचा आक्रोश आणि रडण्याचे सूर ऐकू येत होते.
 
भूकंपातही भावा-बहिणीचं प्रेम अतूट राहिलं...
स्थळ- सीरियातील हारम गाव
 
एका घराचं छत कोसळून त्याखाली एक बहीण-भावाची जोडी अडकली होती. जवळपास 36 तासांनंतर बचाव पथकाचे लोक इथे पोहोचले, तेव्हा त्यांचे चेहरे धुळीने माखले होते. पण दोघेही हालचाल करत होते.
 
सीएनएनच्या बातमीनुसार, ही दोन्ही मुलं बहीण भावंडं आहेत. बहिणीने भावाला डोक्याजवळ पकडलं होतं.
 
बचाव पथकाचे लोक जेव्हा इथे पोहोचले तेव्हा मरियम नावाची ही मुलगी ओरडली, "मला इथून बाहेर काढा...मी तुमच्यासाठी काहीही करेन. आयुष्यभर तुमची गुलामी करेन."
 
या मुलीच्या भावाचं नाव इलाफ आहे. सीएनएनसोबत बोलताना या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, इलाफ या नावाचा अर्थ 'सुरक्षा' होतो.
मुस्तफा यांनी सांगितलं, "मी आणि माझी तीन मुलं झोपलो होतो, तेव्हाच हा भूकंप आला. जमीन हादरायला लागली. आमच्यावर छत कोसळलं आणि आम्ही त्याखाली दबलो गेलो. आमच्यावर जी वेळ आली, ती कोणावरही येऊ नये. लोकांनी आमचा आवाज ऐकला आणि मदत केली."
 
सोशल मीडियावर असे अजून काही व्हीडिओ आणि फोटोही शेअर केले जात आहेत.
 
सीरियामधील नागरी सुरक्षा संघटना व्हाइट हेल्मेटने असे काही व्हीडिओ प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये अनेक तासांनंतर एखाद्या मुलाला किंवा मोठ्या व्यक्तिंना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं जात आहे. कोणी 40 तास अडकलं होतं, तर कोणाला 50 तासानंतर सुखरुप बाहेर काढलं गेलं.
 
व्हाइट हेल्मेटने ट्वीट केलेल्या एका व्हीडिओमध्ये म्हटलं आहे, "चमत्कार वारंवार होतात."
व्हाइट हेल्मेटने आपल्यासोबत काम करणाऱ्या बचाव पथकातील एका व्यक्तिबद्दल माहितीही दिली आहे, "काही दिवसांपूर्वी लोकांचे प्राण वाचविणाऱ्या आमच्या एका सहकाऱ्याने स्वतःचे प्राण गमावले आहेत."
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदींनी केलं 2 वंदे भारत एक्सप्रेसचं उद्गाटन, मराठीतून भाषणाची सुरूवात करत म्हटलं