Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदींनी केलं 2 वंदे भारत एक्सप्रेसचं उद्गाटन, मराठीतून भाषणाची सुरूवात करत म्हटलं

नरेंद्र मोदींनी केलं 2 वंदे भारत एक्सप्रेसचं उद्गाटन, मराठीतून भाषणाची सुरूवात करत म्हटलं
, शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (17:25 IST)
Twitter
देशाला नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन अर्पित करताना मला आनंद होत आहे, अशी मराठीतून सुरूवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (10 फेब्रुवारी) महाराष्ट्रातल्या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन झालं.
मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन मार्गांवर या वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत.
'वंदे भारत' एक्सप्रेसच्या वेगामुळे हा प्रवास नेहमीपेक्षा एक ते दोन तासांनी कमी होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.
 
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विणी वैष्णव यांचे आभार मानले.
 
मोदी सरकारनं यंदा पहिल्यांदा रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी 13,500 कोटी रुपये दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
 
'तुळजापूरच्या भवानीचं, पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन सोपं होणार'
उद्घाटनाच्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, या दोन्ही गाड्या देशाच्या आर्थिक राजधानीला आस्थेच्या शहरांशी जोडेल. यामुळे विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वांनाच फायदा होणार आहे.
 
या गाड्यांमुळे शिर्डीच्या साईबाबांचं, तुळजापूरच्या भवानीचं आणि पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन करणं सोपं होणार आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
 
त्यांनी पुढे म्हटलं, "देश मोठ्या वेगाने 'वंदे भारत' ट्रेन सुरू करत आहे. आता देशभरातले खासदार त्यांच्या भागात वंदे भारत सुरू करण्याची मागणी करत आहे. देशातल्या 17 राज्यांमधल्या 108 जिल्ह्यांमधून 'वंदे भारत' जाते.
 
पाचपट अधिक जास्त पैसे यंदा पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. डबल इंजिन सरकरामुळे महाराष्ट्राता विकास कामांना वेग येईल."
 
पायाभूत सोयी-सुविधांबद्दल बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, यामुळे गरिबांना रोजगार मिळतो, श्रमिकांना, मध्यमवर्गांना सर्वांना रोजगार मिळेल. पायाभूत सुविधांमुळे व्यापारउदीम वाढेल.
 
'वंदे भारत'ची वैशिष्ट्यं
या दोन्ही रेल्वे धावण्यास सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रात धावणाऱ्या 'वंदे भारत' रेल्वेंची संख्या चारवर पोहोचणार आहे.
 
गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे मुंबई-अहमदाबाद आणि बिलासपूर-नागपूर वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रात सुरू झाल्या होत्या.
 
या पार्श्वभूमीवर वंदे भारत रेल्वेविषयीच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात.
 
देशी बनावटीची पहिली सेमी हाय-स्पीड रेल्वे
वंदे भारत ट्रेनची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेतून करण्यात आली आहे. ही रेल्वे भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय-स्पीड रेल्वे म्हणून ओळखली जाते.
 
ही रेल्वे 18 डब्यांची असल्याने सुरुवातीला तिला T-18 या नावाने ओळखलं जात होतं. पण शताब्दी, दुरांतो, गरीबरथ यांच्यासारख्या रेल्वेच्या प्रकारांच्या धर्तीवर या रेल्वेचं नामकरण वंदे भारत एक्सप्रेस असं करण्यात आलं. पुढे या रेल्वेच्या डब्यांची संख्याही घटवून 16 करण्यात आली.
 
वंदे भारत रेल्वे ही पूर्णतः वीजेवर धावणारी रेल्वे आहे. साधारणपणे, वेगळं इंजीन (लोकोमोटिव्ह) आणि त्याला जोडलेले डबे अशा स्वरुपातील रेल्वेने आपण पूर्वी प्रवास करायचो.
पण गेल्या काही काळात जगभरातील रेल्वेंमधील वेगळ्या इंजीनद्वारे ओढल्या जाणार्‍या गाड्यांचं स्वरूप बदलून त्यांची जागा इंजीनरहीत तंत्रज्ञानाने घेण्यास सुरुवात झाली आहे.
 
उदाहरणार्थ, आपण लोकल रेल्वे किंवा मेट्रो रेल्वेमध्ये पाहतो, तशा प्रकारे ईएमयू (Electric Multiple Unit) प्रकारातील या रेल्वे आहेत.
 
EMU रेल्वे प्रकारातील ट्रेन-सेट हे धावण्यास तुलनेने जलद, देखभाल करण्यास सोपे तसंच कमी ऊर्जा खर्च करणारे असतात.
 
युरोपात प्रवासी रेल्वे सहसा अशाच पद्धतीच्या असतात. त्यामधून प्रेरणा घेऊन भारताने बनवलेली ही पहिलीच रेल्वे आहे.
 
2019 ला पहिली वंदे भारत रुळावर
15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून तिचं उद्घाटन केलं होतं. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर देशातील पहिली वंदे भारत ट्रेन धावली होती.
दिल्ली ते वाराणसी हे 759 किलोमीटरचं अंतर ही रेल्वे केवळ 8 तासांत पूर्ण करते. भारतातील वेगवान रेल्वेंच्या यादीत आघाडीवर असलेल्या शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमधून हाच प्रवास करण्यास 11 ते साडेअकरा तासांचा वेळ लागतो. त्यामुळे पहिल्यावहिल्या वंदेभारत एक्सप्रेसचं त्यावेळी खूप कौतुक झालं होतं.

नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसनंतर नवी दिल्ली-कटरा(वैष्णोदेवी), मुंबई-गांधीनगर, नवी दिल्ली-अंब अंदौरा, चेन्नई-म्हैसूर, बिलासपूर-नागपूर, हावडा-जलपाईगुडी, विशाखापट्टणम-सिकंदराबाद अशा एकूण 8 रेल्वे देशात सुरू झाल्या आहेत. या यादीत आणखी दोन रेल्वे आता जोडल्या गेल्या आहेत.
 
वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये
* वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 16 वातानुकूलित डबे असतात. त्यापैकी 2 एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे आहेत. प्रत्येक डब्याची एकूण आसन क्षमता 1,128 प्रवासी इतकी आहे.
* डब्यांच्या खालील रचना बदलण्यात आल्याने पारंपारिक डब्यांपेक्षा सामान ठेवण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होते.
* सर्व डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे लावलेले असतात. त्याचं नियंत्रण रेल्वे चालकांकडे असतं.
* प्रत्येक डब्यात प्रवाशांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी संपर्क यंत्रणा (GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम) लावण्यात आलेली असून त्यामध्ये 32 इंची एलसीडी टीव्हीसुद्धा समाविष्ट आहे.
मनोरंजनाच्या उद्देशाने ऑन-बोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अतिशय आरामदायक आसनव्यवस्था. बाहेरील उष्णता आणि आवाज नियंत्रित ठेवम्यासाठी इन्सुलेशन.
* प्रकाशयोजना संयुक्त आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध. इलेक्ट्रिक बिघाड झाल्यास ट्रेनच्या प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन दिव्यांची सोय.
* गरम जेवण, गरम आणि थंड पेयपदार्थ देण्यासाठी पॅन्ट्री कारची सोय.
* बायो-व्हॅक्यूम प्रकारातील शौचालयांची प्रत्येक डब्यात सुविधा.

वंदे भारत 2.0
सुरुवातीला भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस आणल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करून वंदे भारत 2.0 चा नवा अवतार सादर करण्यात आला.
 
वंदे भारत 2.0 च्या आवृत्तीची पहिली रेल्वे मुंबई-गांधीनगर 30 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते रवाना झाली होती.
 
पूर्वीची रेल्वे 430 टन होती. त्यात आणखी कपात करून 392 टन वजनापर्यंत तिचं वजन घटवण्यात आलं.
 
त्यामुळे पूर्वी 160 किलोमीटर प्रतितासपर्यंत धावू शकणाऱ्या रेल्वेचा आता 180 किमी प्रतितासपर्यंत वाढवण्यात येऊ शकतो.
 
160 किलोमीटरचा वेग गाठण्यास पूर्वीच्या रेल्वेला 145 सेकंद लागायचे. वंदे भारत 2.0 मध्ये हा वेग 140 सेकंदांतच गाठता येतो.
 
तसंच प्रत्येक डब्यात 180 कोनापर्यंत वळवता येऊ शकणाऱ्या खुर्च्याही बसवण्यात आल्या आहेत.
 
तिकीटदर कसा असेल?
वंदे भारत एक्सप्रेससाठी असणारा तिकीटदर हा चर्चेचा विषय ठरला आहे.
 
हा तिकिटदर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून तो कमी करण्यात यावा, अशी मागणी विविध प्रवासी संघटनांकडून सुरू आहे. अद्याप रेल्वे प्रशासनाने मात्र या मागणीला प्रतिसाद दिलेला नाही.
वंदे भारतच्या तिकिटदर रचनेनुसार याचं बेसिक फेअर हे एसी चेअरकार डब्यासाठी शताब्दी रेल्वेपेक्षा 1.4 पट तर एक्झिक्युटिव्ह क्लासच्या डब्यासाठी हा दर 1.3 पट निश्चित करण्यात आलेला आहे.
 
याव्यतिरिक्त आरक्षम दर, सुपरफास्ट सरचार्ज, जीएसटी आदी वेगळे आकारण्यात येतात. जेवण आवश्यक असल्यास त्याचा वेगळा दर आकारला जातो.
 
वंदेभारत ट्रेनमध्ये लहान मुलांसाठी अर्धा दर अशी कोणतीही संरचना नाही. त्यामुळे मुलांसाठीही पूर्ण तिकिटदर देऊनच तुम्हाला प्रवास करावा लागेल.
 
ऑगस्टपर्यंत 75, तर 3 वर्षांत 400 वंदे भारत
15 ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात भारताचं पुढील उद्दीष्य काय असेल, याविषयी माहिती दिली होती.
 
स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनिमित्त ऑगस्ट 2023 पर्यंत 75 वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा विचार मोदींनी व्यक्त केला होता.
या माध्यमातून देशभरातील प्रत्येक कोपरा वंदे भारत एक्सप्रेसने जोडला जाईल, असं मोदी त्यावेळी म्हणाले होते.
 
त्याच प्रमाणे, 2022 च्या अर्थसंकल्पातही वंदे भारत एक्सप्रेसचा उल्लेख करण्यात आला होता.
 
त्यानुसार, पुढील तीन वर्षांत एकूण 400 वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती करण्यात येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं.
 
लातूरच्या कारखान्यात निर्मिती
सध्या वंदे भारत रेल्वेच्या डब्यांची निर्मिती चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये होत आहे. आगामी काळात महाराष्ट्रातील लातूर येथील कोच फॅक्टरीमध्येही वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे.
 
लातूरसह सोनिपत, रायबरेली येथील कारखान्यातही डब्यांच्या निर्मितीचं नियोजन रेल्वे प्रशासनाने केलं आहे, अशी माहिती नुकतेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
लातूरचा रेल्वेचा कारखाना लातूर शहरापासून सुमारे 18 किलोमीटरवर आहे. येथे 350 एकर परिसरात हा कारखाना पसरलेला आहे. त्यापेकी 120 एकरच्या क्षेत्रात पहिल्या फेजचं बांधकाम झालेलं आहे.
 
लातूरमध्ये पहिल्या वर्षी 250 डबे, दुसऱ्या वर्षी 400 तर तिसऱ्या वर्षी 700 डब्यांची निर्मिती केली जाऊ शकते.
 
स्लीपर कोचही लवकरच
सध्या वंदे भारत रेल्वेंमध्ये केवळ एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि एसी चेअरकार कार अशा दोन दर्जांचे डबे आढळून येतात.
 
म्हणजेच इतर रेल्वेंना असते, तशी स्लीपर क्लासची सुविधा या रेल्वेमध्ये नाही. मात्र, आगामी काळात या रेल्वेमध्ये स्लीपर क्लास सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
 
रेल्वे डब्यात स्लीपर कोचचा समावेश करण्याचा विषय आला की साहजिकच त्या डब्यांचं वजन वाढतं. पण वजन नियंत्रणात ठेवून कशा प्रकारे वंदे भारतमध्ये स्लीपर डबे जोडले जाऊ शकतात, या दृष्टिकोनातून रेल्वे मंत्रालय प्रयत्न करत आहे.
 
2023-24 चा अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर काही दिवसांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी रेल्वेच्या वंदे भारतविषयीच्या उपक्रमांबाबत माहिती दिली होती.
 
ते म्हणाले, "देशात स्लीपट वंदे भारत रेल्वेही सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी टेंडर लवकरच काढण्यात येईल."
 
वंदे मेट्रोही येणार
लोकल रेल्वे, मेट्रो रेल्वे यांच्या धर्तीवर वंदे मेट्रोची सुरुवात करण्याचाही रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे. म्हणजे, ब्रॉडगेजवरून चालणारी, लोकलप्रमाणेच उपनगरांना जोडणारी अशी ही रेल्वे असू शकते.
 
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याविषयी म्हणाले, "शंभर किलोमीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या शहरांदरम्यान वंदे मेट्रो सुरू करण्यात येईल. डिसेंबर 2023 पर्यंत वंदे मेट्रो सेवेत दाखल होईल."

Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3000 रुपये