Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टायटॅनिकच्या 'या' दुर्मिळ कलाकृती एका गुप्त गोदामात का ठेवण्यात आल्या आहेत?

Titanic
, शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (10:16 IST)
मगरीच्या कातडीपासून बनवलेली एक हॅंडबॅग आणि आजही सुंगंध येणाऱ्या अत्तराच्या (परफ्युम) अतिशय छोट्या कुप्या.. अशा अनेक अत्यंत मौल्यवान वस्तू आणि कलाकृती जगातील सर्वात प्रसिद्ध जहाजाच्या समुद्राखालील ढिगाऱ्यामधून मिळाल्या आहेत. ते जहाज म्हणजे 'टायटॅनिक' (Titanic).
 
मात्र या कलाकृती ज्या गोदामात किंवा संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत, ते अतिशय गुप्त ठेवण्यात आलं आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. कारण या सर्व गोष्टी आणि कलाकृती अत्यंत मौल्यवान आहेत.
 
अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतातील अ‍ॅटलांटा या शहरात कुठेतरी हे संग्रहालय आहे, एवढंच याबद्दल सांगता येऊ शकतं.
 
या गोदामातील कपाटांमध्ये हजारो वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये उलटा ठेवलेला बाथटब, जहाजात असणारी छोटी गोलाकार खिडकी, बारीक नक्षीकाम असलेली काचेची भांडी आणि छोटी बटणं अशा असंख्य वस्तूंचा समावेश आहे.
 
हे गोपनीय संग्रहालय किंवा गोदाम पाहण्याची आणि त्यातील वस्तूंमागील गोष्टी जाणून घेण्याची दुर्मिळ संधी बीबीसीला मिळाली.
 
मगरीच्या कातड्याच्या हँडबॅगमागील शोकांतिका
आरएमएस टायटॅनिक इन्कॉर्पोरेशन (RMS Titanic Inc) कंपनीनं या सर्व कलाकृती शोधल्या आहेत. या कलाकृतींचा संग्रह करणाऱ्या कंपनीच्या संचालिका टोमासिना रे आहेत.
 
मगरीच्या कातड्यापासून बनवण्यात आलेल्या हँडबॅगबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, "ही खरोखरच अतिशय सुंदर आणि फॅशनेबल अशी छोटी बॅग आहे."
 
आरएमएस टायटॅनिक इन्कॉर्पोरेशन या अमेरिकन कंपनीकडं टायटॅनिकच्या समुद्राखालील ढिगाऱ्यामधून वस्तू शोधण्याचे अधिकार आहेत. कंपनीनं आजवर जहाजाच्या अवशेषांतून किंवा भंगारातून 5,500 पेक्षा अधिक वस्तू मिळवल्या आहेत. यातील काही निवडक वस्तूंंचं जगभरात प्रदर्शनही करण्यात आलं आहे.
 
याठिकाणी असलेली ही खास बॅग मगरीच्या कातड्यापासून बनवलेली आहे. उत्तर अटलांटिक महासागराच्या तळाशी कित्येक दशकं ही बॅग सुरक्षित राहिली. या हँडबॅगेच्या आत सापडलेल्या अतिशय नाजूक वस्तू देखील सुरक्षित राहिल्या.
 
हँडबॅगेतील या वस्तूंवरून त्याच्या मालकाच्या आयुष्याविषयीची माहिती समोर येते. त्या म्हणजे जहाजाच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास करणाऱ्या मरियन मीनवेल (Marian Meanwell).
 
"त्या महिलांच्या हॅट (टोपी) विकणाऱ्या 63 वर्षांच्या व्यावसायिका होत्या. नुकताच नवरा गमावलेल्या विधवा मुलीला भेटण्यासाठी त्या अमेरिकेत चालल्या होत्या," असं टोमासिना सांगतात.
 
या हँडबॅगमध्ये एक फिकट झालेला फोटो मिळाला. तो फोटो मरियन मीनवेल यांच्या आईचा असल्याचं समजलं जातं.
 
अमेरिकेत नवं आयुष्य सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रंही त्या बॅगेत होती. त्यात लंडनमधील त्यांच्या घरमालकाच्या हस्ताक्षरातील एक पत्रही होतं. ते एक शिफारस पत्र होतं.
 
"मीनवेल या खूपच चांगल्या भाडेकरू होत्या. त्या वेळेवर घरभाडं द्यायच्या," असं पत्रात लिहिलेलं होतं.
 
बॅगमध्ये मीनवेल यांच्या वैद्यकीय तपासणीचं कार्डही होतं. तिसऱ्या वर्गातील सर्व प्रवाशांना त्या निरोगी आहेत आणि अमेरिकेत त्यांच्यामुळं कोणत्याही प्रकारचा आजार येणार नाही, याची खात्री पटण्यासाठी कार्ड आवश्यक होतं.
 
पाण्यात राहून फिकट झालेला हा कागद एका दुर्दैवी घटनेची साक्ष देणारा आहे.
 
मरियन मीनवेल यांनी व्हाईट स्टार लाईनच्या 'मॅजेस्टिक' या दुसऱ्या जहाजाचंही तिकिट काढलेलं होतं. पण, काही कारणास्तव ते जहाज प्रवासाला निघू शकलं नाही. त्यामुळं मीनवेल यांना टायटॅनिकवर पाठवण्यात आलं होतं.
 
त्यांनी टायटॅनिक मधून प्रवास केला खरा, मात्र त्या अपघातात मृत्यू पावणाऱ्या 1,500 प्रवाशांपैकी त्या एक ठरल्या.
 
"त्यांची गोष्ट सांगणं आणि या वस्तू सांभाळून ठेवणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण एरव्ही त्या प्रवाशांच्या यादीतलं फक्त एक नाव ठरल्या असत्या," असं टोमासिना म्हणतात.
 
अजूनही सुगंध कायम असलेला परफ्युम
टायटॅनिकच्या अपघातातून जे प्रवासी बचावले त्यांच्या वस्तूही महासागराच्या तळातून परत आणण्यात आल्या.
 
टोमासिना यांनी एक प्लॅस्टिकचा डबा उघडला आणि हवेत एक विशिष्ट सुगंध पसरला. त्या म्हणाल्या की, "अजूनही यात सुगंध आहे."
 
त्या डब्याच्या आत परफ्युमच्या छोट्या कुप्या होत्या. त्या सीलबंद आहेत. मात्र समुद्रतळाशी अनेक दशकं राहिल्यानंतरही त्यातून सुगंध येत आहे.
 
टोमासिना सांगतात, "जहाजावर एक परफ्युम विक्रेता होता. त्याच्याकडं परफ्युमच्या 90 पेक्षा जास्त कुप्या होत्या."
 
त्यांचं नाव होतं अ‍ॅडोल्फ सालफेल्ड (Adolphe Saalfeld). ते जहाजावरील दुसऱ्या वर्गातील प्रवासी होते.
 
टायटॅनिकच्या अपघातातून बचावलेल्या 700 लोकांपैकी सालफेल्ड एक होते. टायटॅनिक बुडत असताना प्रवाशांना वाचवताना महिला आणि मुलांना प्राधान्य देण्यात आलं होतं. त्यामुळे जहाजातून वाचलेल्या काही पुरुषांना अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं.
 
"आम्हाला हे सापडलं तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र मला असं वाटतं की, अपघातातून वाचल्यानंतर त्यांच्या मनात एक अपराधीपणाची भावना राहिली असेल," असं टोमासिना म्हणतात.
 
आलिशान-विलासी, शॅम्पेन लाईफस्टाईल
या संग्रहामध्ये शॅम्पेनची एक बाटलीही आहे. या बाटलीत सुस्थितीतील शॅम्पेन आहे आणि बाटलीच्या तोंडावर बूच (कॉर्क) लागलेलं आहे.
 
"समुद्राच्या तळाशी पाण्यात असल्यामुळे दाबामुळे कदाचित बाटलीच्या कॉर्कमधून थोडंसं पाणी आत गेलं असण्याची शक्यता आहे. यामुळं बाटलीवरील दाबाचं नियमन झालं असेल. त्यानंतर ही बाटली समुद्राच्या तळाशी जाऊन बसली," असं टोमासिना म्हणतात.
 
1912 मध्ये एका प्रचंड हिमनगाशी टक्कर होऊन टायटॅनिक हे जहाज बुडालं. बुडताना जहाजाचे दोन तुकडे झाले आणि जहाजातील सर्व सामान इतस्तत: विखुरलं. यामुळे विस्तीर्ण भागात जहाजाचे अवशेष पसरले.
 
"समुद्राच्या तळाशी असंख्य बाटल्या आणि स्वयंपाकघरातील असंख्य भांडीदेखील आहेत. कारण एका स्वयंपाकघराजवळच प्रत्यक्षात जहाज मोडलं होतं," असं टोमासिना म्हणतात.
 
त्यावेळी जहाजावर शॅम्पेनच्या हजारो बाटल्या होत्या. जहाजावरील पहिल्या वर्गाच्या प्रवाशांना भव्यपणा, ऐश्वर्य, सर्वोत्तम जेवण आणि ड्रिंकची सेवा पुरवण्यात यावी अशी जहाजाच्या मालकाची इच्छा होती.
 
"टायटॅनिक हा जणू तरंगता महाल होता. त्याकाळी टायटॅनिक सर्वात आलिशान, दिमाखदार जहाज होतं," असं टोमासिना सांगतात.
 
त्यामुळे प्रवाशांना शॅम्पेन, जिम, सर्वप्रकारच्या सुखसुविधा आणि विलासी गोष्टी पुरवणं हे जहाजासाठी खूपच महत्त्वाचं राहिलं असेल.
 
टायटॅनिकच्या बांधणीसाठी वापरलेले खिळे
टायटॅनिक पहिल्या-वहिल्या प्रवासाला निघालं होतं. साऊथॅम्पटनहून निघून ते अमेरिकेला जात असतानाच एका प्रचंड हिमनगाशी त्याची टक्कर झाली होती.
 
सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक असलेल्या त्या काळच्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था जहाजात होत्या. टायटॅनिकबद्दल असं म्हटलं जायचं की, हे जहाज इतकं भक्कम आहे की कधीही बुडणार नाही.
 
जहाजावर वापरण्यात आलेल्या खिळ्यांपैकी काही खिळे, धातूच्या जाड पिना टोमासिना यांनी आम्हाला दाखवल्या. या खिळ्यांचा आणि पिनांचा वापर करून जहाजाच्या पोलादी पट्ट्या किंवा फळ्या एकमेकांना जोडण्यात आल्या होत्या.
 
या खिळ्या आणि पिनांची संख्या तीन लाखांपेक्षा अधिक होती.
 
"टायटॅनिक बुडालं तेव्हा अशीही चर्चा होती की त्यांनी जहाजाची बांधणी करताना हलक्या दर्जाचं साहित्य वापरलं होतं आणि त्यामुळेच खूपच वेगानं जहाज बुडालं," असं टोमासिना सांगतात.
 
टायटॅनिकच्या काही खिळ्यांमध्ये अशुद्धता तर नाही हे पाहण्यासाठी त्यांची तपासणीही करण्यात आली.
 
यासंदर्भात त्या पुढे सांगतात, "या खिळ्यांमध्ये अशुद्ध धातूचं (खनिजांच्या गाळाचं) (slag)प्रमाण जास्त होतं. हा काचेसारखा पदार्थ असतो. ज्यामुळे थंडीत हे खिळे अधिक ठिसूळ होऊ शकतात."
 
"हे खिळे ठिसूळ असते आणि खिळ्याचा वरचा म्हणजे डोक्याकडचा भाग जर सहजपणे निखळला असता, तर हिमनग जहाजावर जिथे आदळला तिथली खिळ्यांची शिवण उसवली गेली शकली असती. यातून तिथे मोठी फट तयार झाली असती."
 
टोमासिना म्हणतात, टायटॅनिक नेमकं कसं बुडालं याबद्दल अजून बरंच काही जाणून घ्यायचं बाकी आहे.
 
जहाज बुडण्याच्या कारणांचा शोध घेण्यास आम्ही सक्षम आहोत. ज्याद्वारे विज्ञानात भर घालता येईल. त्यामागची कथा जाणून घेणं ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.
 
जहाजावरील भेदभाव
एरव्ही समाजात दिसून येणारा भेदभाव टायटॅनिकवरील प्रवाशांमध्येही होता. सामाजिक आणि आर्थिक पातळीवर त्यांच्यात विभागणी करण्यात आलेली होती. इतकंच काय ज्यातून चहा किंवा इतर पेय घ्यायचे ते कप आणि ज्यात जेवायचे त्या प्लेट्स (ताटं) यामध्येसुद्धा फरक होता.
 
लाल रंगाचा व्हाईट स्टार लोगो असलेला तिसऱ्या वर्गाचा (थर्ड क्लास) एक पांढरा मोठा कप (mug)खूपच साधारण मात्र मजबूत आहे. तर दुसऱ्या वर्गाच्या प्लेटवर (सेकंड क्लास) सुंदर निळ्या रंगाची फुलांची नक्षी आहे. तुलनेनं ती दिसायला अधिक चांगली आहेत.
 
मात्र पहिल्या वर्गाच्या प्लेट्स नाजूक चिनी मातीपासून बनलेल्या आहेत. त्यांच्यावर सोनेरी कडा आहेत आणि प्रकाशात पाहिल्यास त्यावर तुम्हाला फुलांच्या हाराच्या एक पॅटर्नची झलक दिसते.
 
"हे पॅटर्न किंवा डिझाइन बहुधा रंगीत असतील, मात्र त्यावर रंगाचा पातळ थर देण्यात आला होता. त्यामुळं ते रंग धुतले गेले होते," असं टोमासिना म्हणतात.
 
पहिल्या वर्गातील श्रीमंत प्रवाशांना चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण वाढण्यात येत असे. मात्र तिसऱ्या वर्गातील प्रवाशांची स्थिती वेगळी होती.
 
"तिसऱ्या वर्गातील प्रवाशांना चीनी मातीची भांडी स्वत:च हाताळावी लागायची. ही भांडी हाताळायला ती इतर भांड्यांपेक्षा अधिक मजबूत असायची," असं टोमासिना सांगतात.
 
टायटॅनिक बुडाल्याच्या ठिकाणाहून वस्तू गोळा करण्याची कायदेशीर परवानगी फक्त आरएमएस टायटॅनिक इन्कॉर्पोरेशन या कंपनीला देण्यात आलेली होती.
 
1994 मध्ये अमेरिकेच्या एका न्यायालयानं त्यांना हा अधिकार दिला होता. मात्र, असं करताना कंपनीला काही कडक अटींचं पालन करावं लागणार होतं.
 
या सर्व वस्तू नेहमीच एका ठिकाणी असल्या पाहिजे. जेणेकरून स्वतंत्रपणे त्यांची विक्री करता येणार नाही आणि योग्यप्रकारे त्यांचं जतन केलं जाईल.
 
आतापर्यंत सर्वच कलाकृती किंवा वस्तू जहाजाच्या अवशेषातून किंवा ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आल्या आहेत. मात्र अलीकडेच कंपनीनं जहाजातून मार्कोनी रेडिओ उपकरण हस्तगत करण्याची इच्छा व्यक्त केली. यातून वाद निर्माण झाला.
 
या मार्कोनी रेडिओ उपकरणाद्वारेच बुडण्याच्या रात्री टायटॅनिकनं आपत्कालीन संदेश प्रसारित केले होते.
 
काहींना असं वाटतं की, टायटॅनिकचा समुद्राखालील ढिगारा ही एक कबर आहे आणि त्याला हात लावता कामा नये.
 
या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना टोमासिना म्हणाल्या की, "टायटॅनिक ही एक अशी गोष्ट आहे जिचा आम्ही आदर करू इच्छितो"
 
"आम्ही टायटॅनिकशी निगडीत स्मृतींचं जतन केलं जाण्याची खातरमजा करू इच्छितो. कारण प्रत्येकजण टायटॅनिकपर्यत जाऊ शकत नाही आणि म्हणूनच या सर्व गोष्टी आम्ही लोकांसमोर आणू इच्छितो."
 
या गोपनीय संग्रहालयात वस्तू किंवा कलाकृती ठेवण्यासाठी लवकरच आणखी कपाटं आणि खोल्यांची गरज पडू शकते.
 
अलीकडेच टायटॅनिकच्या ढिगाऱ्याजवळ कंपनीकडून एक नवीन मोहिम सुरू करण्यात आली. याचा उद्देश या ढिगाऱ्याचे लाखो फोटो घेण्याचा आहे. मग या फोटोंचा वापर करून एक सविस्तर 3डी (3D)चित्र तयार केलं जाणार आहे.
 
त्याचबरोबर या मोहिमेत मार्कोनी रेडिओ रुमच्या सद्यस्थितीचं सर्वेक्षण देखील केलं जाणार आहे. भविष्यात या ढिगाऱ्यातून काढल्या जाऊ शकणाऱ्या वस्तूंची ओळखसुद्धा मोहिमेच्या टीमकडून पटवली जाणार आहे.
 
या मोहिमेत कदाचित त्यांना आणखी काही वस्तू सापडतील आणि दुर्दैवी टायटॅनिक आणि त्यातील प्रवाशांबद्दल त्या प्रत्येक वस्तूद्वारे एकादी अपरिचित कहाणी समोरही येऊ शकेल.

Published By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पीक विमा योजनेच्या 8 वर्षांत कंपन्या की शेतकरी, नेमकं कुणाचं भलं झालं? वाचा