कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आयपीएल हंगाम दुबईत सुरु झाला. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबईला 5 गडी राखून पराभूत केलं. चेन्नईला 2018 पासून आतापर्यंत सलग पाचवेळा मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता. मुंबईविरुद्धच्या या पराभवाची मालिका खंडीत करत चेन्नई सुपरकिंग्जने विजयी सलामी दिली. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सौरभ तिवारीच्या खेळीच्या जोरावर चेन्नईसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अंबाती रायडु आणि फाफ डुप्लेसी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने हे आव्हान सहज पूर्ण केलं. या विजयासह चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली.
चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना धोनीचा कर्णधार म्हणून हा 100 वा विजय आहे. एखाद्या संघाचे नेतृत्व करताना अशी कामगिरी करणारा धोनी हा आयपीएलच्या इतिहासातला पहिलाच कर्णधार ठरला आहे. धोनीनं आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आतापर्यंत 105 विजय मिळवले आहेत. त्यातले 5 विजय हे पुणे वॉरिअर्सकडून खेळताना मिळवले होते.
दरम्यान, सामना जिंकणाऱ्या चेन्नईची 2 बाद 6 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मुंबईने पकड घट्ट करण्याऐवजी केलेली ढिलाई चेन्नईच्या पथ्यावर पडली. रायडू आणि डुप्सेसी यांनी या संधीचा फायदा घेत शतकी भागीदारी केली. मुंबईचा हुकमी वेगवान गोलंदाज बुमराह निष्प्रभ ठरला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी मिळालेल्या मुंबईची सुरूवात जोरदार होती. रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार मारुन आव्हानात्मक परिस्थितीत सुरू झालेल्या या आयपीएलमध्ये जान फुंकली पण लेगस्पिनरसमोर नेहमीच अडखळणाऱ्या रोहितला आज पियूष चावला या चैन्नईच्या लेगस्पिनरने बाद केले. दुसरा सलामीवर डिकॉकला मात्र चांगला सुर सापडला होता, पण तोही आशा निर्माण करुन बाद झाला.
बिनबाद 46 आणि 2 बाद 48 अशी अवस्था झालेल्या मुंबईचा डाव सूर्यकुमार यादव अणि सौरभ तिवारी यांना सांभळला मात्र "सूर्य'ही मावळला. हार्दिक पंड्याने जडेजाला दोन षटकार मारुन रंग भरले परंतु जडेजाच्याच चेंडूवर डुप्लेसीने पंड्या व तिवारी यांचे सीमारेषेवर दोन अप्रतिम झेल पकडून मुंबई संघाच्या "सीमा' रोखल्या.