इंडियन प्रीमिअर लीगच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित सामने युएई अर्थात संयुक्त अरब अमिराती इथे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत.
आयपीएलसाठी खास बायोबबल उभारण्यात आलं होतं. मात्र कोरोनाने हे बायोबबल भेदलं. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील माणसं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने 4 मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आलं होतं.
हंगामातील उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार यासंदर्भात साशंकता होती. मात्र शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत वेळापत्रकावर शिक्कामोर्तब झालं. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली.
भारतीय संघ काही दिवसातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होत आहे. न्यूझीलंडविरुद्धची ही टेस्ट झाल्यानंतर भारतीय संघ महिनाभर इंग्लंडचमध्येच असेल. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यादरम्यान पर्यायी भारतीय संघ श्रीलंकेत वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिका खेळणार आहे.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकप भारतात होणार आहे. मात्र कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता वर्ल्डकपही युएईतच होण्याची चिन्हं आहेत.