आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 रुपयात जिओफोन 2 उपलब्ध करून देण्याची घोषणा धूमधडाक्यात केली असली तरी हे फोन मोदींच्या मेक इन इंडिया मोहिमेखाली बनणार नाहीत तर ते मेड इन चायना असतील असे समजते. द मोबाइल असोसिएशन सल्लागार समितीचे अध्यक्ष भूपेन रसिन यांनी हा अंदाज ईकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केला आहे. या समितीकडून इंटेल, मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्स, जीवी मोबाइल, कार्बन मोबाइल अशा 100 हून अधिक कंपन्यांना सल्ला देण्याचे काम आहे.
रसीन या मुलाखतीत बोलताना म्हणाले, जिओचे फोन भारतात बनत नाहीत तर ते चीनमधून आयात केले जातात. हे फोन 501 रुपयात बाजारात उपलब्ध करून देण्याच्या घोषणेमुळे किमान 100 स्वदेशी फोन उत्पादकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. विविध माध्यमातून येत असलेल्या बातम्यातून रिलायंस जिओ फोन जुने द्या, नवे घ्या योजनेखाली विकले जातील असेही म्हटले जात आहे.