प्रसिद्ध वृत्तनिवेदिका हर्षदा स्वकुळने काही महिन्यांपूर्वी आपण ऑस्ट्रेलियात आपल्या पतीकडे राहायला जात असल्याचे जाहीर केले होते. कोरोना काळात आपल्या लोकांसोबत राहणं अधिक महत्वाचं असल्याचं सांगत तिने आपल्या नोकरीचा राजीनामा देत थेट मेलबर्न गाठले. त्यामुळे वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत आता ती दिसणार नसल्याची खंत अनेकांना होती. मात्र, यांवर हर्षदाने चांगला तोडगा काढला आहे. मेलबर्नमध्ये स्थायिक असलेली हर्षदा आपल्या दर्शकांना थेट युट्युबच्या माध्यमातून भेट देत आहे. विशेष म्हणजे, युट्युबवर देखील तिला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊन मधील मेलबर्नची सफर ती प्रेक्षकांना घडवून आणत असून, तिने नुकताच टाकलेल्या एका व्हिडियोला एक मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असल्याचे निदर्शनास आले आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये एक लाख सब्स्क्राइबर लाभल्यामुळे यूट्यूब द्वारे देण्यात आलेल्या सिल्व्हर ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करत तिने आपला आनंद व्यक्त केला.
लॉकडाऊनच्या काळातला ऑस्ट्रेलिया सुपर मार्केटमधली शॉपिंग असो वा तिने केलेला स्ट्रीट बाजारहट असो, तिचे प्रत्येक व्हिडियो मराठी दर्शक आवडीने पाहत आहेत.
थोडक्यात काय तर, एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा चेहरा बनलेली हर्षदा आता टॉप मॉस्ट युट्युबर्स च्या यादीमध्ये देखील ठसा उमटवण्यास सज्ज झालेली आहे.