लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ‘सी-व्हिजिल’ अॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून आचारसंहिता भंगाबाबत ३ हजार २११ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर आचारसंहिता भंगाचे १५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमध्ये या अॅपच्या माध्यमातून नागरिकही सजगतेने भाग घेत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
निवडणुकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभाग आदी विभागांकडून कार्यवाही सुरू आहे. या विभागांनी आतापर्यंत ११८ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४४ कोटी २२ लाख रुपये रोकड, २२ कोटी रुपये किमतीची २८ कोटी ४७ लाख लिटर दारू, ६ कोटी ३० लाख रुपयांचे मादक पदार्थ, ४५ कोटी ४७ लाख रुपयांचे सोने, चांदी व इतर मौल्यवान जवाहिर यांचा समावेश आहे.
आतापर्यंत आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडित इतर स्वरुपाचे १५ हजार ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कालमांतर्गत ३३७ गुन्हे, लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत ४८ गुन्हे, अनधिकृतरित्या दारू बाळगणे, विक्री, वाटपासाठी दारूची वाहतूक आशा स्वरुपाचे १३ हजार ७०२ गुन्हे, बेकायदेशीररीत्या शस्त्र, जिलेटीन व इतर स्वरूपाचे स्फोटक पदार्थ बाळगणे आदींबाबत ६०१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नशेचे पदार्थ (नारकोटिक्स ड्रग्ज) बाळगल्याबाबतचे १११, स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत १२ गुन्हे, अन्न व औषध अधिनियमांतर्गत ५२ गुन्हे आदींचा समावेश आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत शस्त्र परवानाधारकाकडून ४० हजार ९७ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. सूचना देऊनही जमा न केलेली ३० शस्त्रे जप्त करण्यात आली असून १३५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.