जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविण्यासंदर्भात ऐतिहासिक प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाल्याचे दिसत आहे. दोन्ही शेजारी देशांचे संबंध आणखीच बिघडतील, असा थयथयाट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि भारताचा माजी क्रिकेटपटू व खासदार गौतम गंभीर ट्विटरवर एकमेकांना भिडले आहेत.
शाहिद आफ्रिदी म्हणाला कि, संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार काश्मिरींना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे? ते झोपलेले का आहेत? काश्मीरमध्ये होत असलेलं आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, असे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले. आफ्रिदीने हे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही टॅग केलं आहे.