पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाला केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने’ गौरविण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी (बु) ग्रामपंचायतीला ‘नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराने’ तर राज्यातील एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि 14 ग्रामपंचायतींना ‘दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने येथील पुसा परिसरातील सी सुब्रमन्यम सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-2019’ प्रदान करण्यात आले. यावेळी छत्तीसगड, कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडू राज्यांचे पंचायतराज मंत्री तसेच केंद्रीय पंचायतीराज मंत्रालयाचे सचिव अमरजित सिन्हा, अपर सचिव संजयसिंह मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात पंचायतराज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी एकूण 5 श्रेणींमध्ये देशातील विविध राज्य, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना एकूण 246 पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला तीन श्रेणींमध्ये एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पंचायतराज क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या विविध इलेक्ट्रॉनिक्स सेवांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाला देशातील पहिल्या क्रमांकाच्या ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने’ गौरविण्यात आले. राज्याच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
ग्रामसभांच्या माध्यमातून गावांचा सामाजिक व आर्थिक विकास केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याच्या लोणी (बु.) ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. सरपंच लक्ष्मण बनसोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
स्वच्छता,नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन, ई-प्रशासन यांच्यासह नागरिकांना उत्तमरित्या शासनाच्या सेवा पुरविल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समिती आणि बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीला ‘दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
राज्यातील 14 ग्रामपंचायतींना ‘दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यात सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्याच्या अंकलखोप ग्रामपंचायत, गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सिरेगांव, नागपूर जिल्हयातील मौदा तालुक्याच्या चिरव्हा ग्रामपंचायत याच जिल्हयातील कामठी तालुक्याच्या कढोली ग्रामपंचायत, अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील चंद्रपूर ग्रामपंचायत, गडचिरोली जिल्हयातील मुलचेरा तालुक्याच्या सुदंरनगर, रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील धौलवेली, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या खदांबे (खु.), भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या बनवडी, अमरावती जिल्ह्याच्या अमरावती तालुक्यातील पुसदा, सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील कंसगली, बुलढाणा जिल्हयाच्या शेगाव तालुक्यातील मोरगाव डिग्रस आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या वियाहद (खु) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.