शिवसेनेची भूमिका तोंडच न दिसणार्या केसाळ कुत्र्यासारखी आहे, अशा शब्दांत भारतबंदला विरोध करणार्या शिवसेनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली आहे. शिवसेनेने बंदला विरोध करीत विरोधकांवरच टीका केली होती. शिवसेनेला स्वतःची भूमिका राहिली नाही, ह्यांची पैश्याची कामे अडली की हे सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि ती झाली की सत्तेत राहतात. भाजपा सत्तेत असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणे, गॅसचे दर वाढणे हे लाजिरवाणे आहे.
इंधनाचे दर आमच्या हातात नाही मग जेव्हा विरोधात होतात तेव्हा आंदोलन का केले होते? असे विचारताना तुमच्या हातात जर दरांचे नियंत्रण नाही तर आंध्र प्रदेश आणि राजस्थान सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कसे कमी केले असाही प्रश्न ठाकरें यांनी उपस्थित केला. आमच्यासाठी महत्त्वाचे पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. महागाईचा भडका उडाला आहे त्यामुळे बंद कुणी पुकारला आहे याचा विचार न करता आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आंदोलन केले असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.