देशाची राजधानी दिल्लीसह मोठ्या शहरांना कोरोना विषाणूने घट्ट विळखा घातला असून रोज हजारो मृत्यू होत आहेत. परंतु महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याबाबत बोलणार आहोत. नंदुरबारच्या जिल्हाधिका-यांनी डिसेंबरमध्ये कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली होती. तिचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
नंदुरबार हा आदिवासी बहुल मागास जिल्हा आहे. डॉ. राजेंद्र भरुड हे जिल्हाधिकारी आहेत. येथे गेल्या वर्षी कोरोना रुग्णांसाठी केवळ २० बेड उपलब्ध होते. परंतु आज येथील रुग्णालयांमध्ये १२८९ बेड, कोविड केअर सेंटरमध्ये १११७ बेड आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ५,६२० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी भक्कम आरोग्य यंत्रणा उभारली आहे.
कोणताही कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी डॉ. भरुड यांच्या देखरेखीखाली शाळा, वसतिगृहे, सोसायटी आणि मंदिरांमध्येही बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील ७००० हून अधिक विलगीकरण कक्ष आणि १३०० आयसीयू बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नंदुरबारमध्ये स्वतःचे ऑक्सिजन प्लांट आहेत. त्यामुळे जिल्हा कोणावरही अवलंबून नाही. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भरुड यांचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि बायोकॉनचे चेअरमन किरण मुजूमदार शॉ यांनी कौतुक केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण राज्यात नंदुरबार मॉडेल राबविण्याची घोषणा केली आहे.
डॉ. राजेंद्र भरुड २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले आहे. डॉक्टरी पेशा असल्यामुळे त्यांना महामारीचा अंदाज आलेला होता. त्यामुळे त्यांनी नंदुरबार मॉडेलसारखी यंत्रणा उभारण्यास डिसेंबरपासूनच सुरुवात केली होती. नंदुरबारमध्ये आज १२०० रुग्ण रोज आढळत आहेत. डॉ. भरुड यांनी जिल्हा विकास निधी आणि एसडीआरएफच्या फंडातून तीन ऑक्सिजन प्लांट लावले आहेत. या प्लांटमध्ये ३००० लीटर प्रतिमिनिट ऑक्सिजन तयार होतो. द्राव्य ऑक्सिजन प्लांट लावण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे. कोरोनारुग्णांसाठी गेल्या तीन महिन्यात २७ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत.