महायुतीच्या जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. अशातच भुजबळ यांनी "अजित पवारांनी महायुतीकडे नाशिकची जागा मागितली आहे. मात्र तुम्हाला ही जागा घ्यायची असेल तर घ्या, पण तिथून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्या, असं वरून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आल्याचं त्यांनीच मला सांगितलं," असा दावा छगन भुजबळांनी केला आहे.
भाजप नेतृत्वाकडून छगन भुजबळ यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठीही विचारणा करण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र ही चर्चा भुजबळांनी फेटाळून लावली आहे. "या चिन्हावर, त्या चिन्हावरच लढा, यासाठी माझ्याकडे कोणी मागणी केलेली नाही, विचारणा केलेली नाही, अट टाकलेली नाही," असा खुलासा भुजबळ यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केला. यावर छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, एक कार्यकर्ता आल्यावर आपल्याला आनंद होतो. राज ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा सुद्धा लोक माणसावर प्रभाव आहे. त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे महायुतीची ताकद निश्चितपणे वाढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor