लोकसभा निवडणूक 2024 चे सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
देशात एनडीएला 292 तर इंडिया आघाडीला 234 जागांवर यश मिळालं.
महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करायचा झाल्यास लोकसभेच्या 48 जागांपैकी महायुतीला 18 जागांवर तर महाविकास आघाडीला 30 जागांवर यश मिळाल्याचं पाहायला मिळालं.
या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपप्रणित एनडीए तसंच विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या आज दिल्लीत बैठका आहेत.
महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या बैठकीला कोणाची उपस्थिती असेल, हे अजून समजलं नाहीये.
दुसरीकडे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित असतील.
काल (4 जून) निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आपण दुपारी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार असल्याचं म्हटलं होतं.
उद्धव ठाकरे यांनीही माध्यमांशी संवाद साधताना इंडिया आघाडीने सत्तास्थापनेचा दावा करायला हवा, असं म्हणत सकाळी संजय राऊत, अनिल देसाई हे दिल्लीला रवाना होतील आणि आपण स्वतः संध्याकाळी दिल्लीला जाऊ असं सांगितलं होतं.
त्यामुळे या बैठकांमधून आता काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचचं लक्ष असेल.