अयोध्या.. मागच्या काही वर्षात हे नाव भारतातील प्रत्येकाने ऐकलं असेल. 22 जानेवारी 2024ला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला राम मंदिराचा मुद्दा मदत करणार हे स्पष्ट झालं होतं. पण लोकसभेच्या निकालात हा मुद्दा महत्त्वाचा ठरल्याचं जाणवलं नाही.
ज्या उत्तर प्रदेशात राम मंदिर बांधलं गेलं त्याच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. एवढंच काय ज्या जिल्ह्यात हे राम मंदिर आहे त्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार लल्लू सिंग यांचा मोठा पराभव झाला आहे.
भाजपला जागांच्या बाबतीत मोठं नुकसान झालं असून यावर्षी केवळ 33 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले. समाजवादी पक्षाला 37 जागा मिळाल्या आणि अखिलेश यादवांचा हा पक्ष देशात तिसरा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे.
अयोध्या ज्या मतदारसंघात आहे त्या फैजाबादमध्ये समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंग यांचा 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.
भाजपच्या हिंदुत्वाच्या प्रचाराला अवधेश कुमार यांनी हरवलं असल्याचं आता बोललं जातंय.
हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अवधेश प्रसाद म्हणाले की, "मी भाजपच्या विरोधात लढत नव्हतो तर लोकच भाजपच्या विरोधात लढत होते. दलितांनी मला सगळ्यात जास्त समर्थन दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बनलेल्या राम मंदिराचं श्रेय भाजप घेऊ पाहत होती. त्यांना मंदिराचा राजकीय फायदा उठवायचा होता. बेरोजगारी, महागाई, गरिबी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांपासून भाजपला ही निवडणूक दूर घेऊन जायची होती."
अवधेश प्रसाद म्हणाले की, "मी भाजपच्या विरोधात लढत नव्हतो, भाजपच्या विरोधात लढणारे लोक होते. भाजपच्या धोरणांचे खरे बळी ठरलेल्या दलित बांधवांकडून आम्हाला सर्वात मोठा पाठिंबा मिळाला, दलितांसोबतच आम्हाला ओबीसी आणि अल्पसंख्याकांचाही पाठिंबा मिळाला. आम्हाला शेतकऱ्यांचा पाठिंबा आणि शेतकऱ्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन मला मतदान केलं. भटक्या जनावरांमुळे शेतकरी त्रस्त होते."