Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमदारपत्नींना महायुतीकडून उमेदवारी

maharashtra neta
, शुक्रवार, 5 एप्रिल 2024 (11:35 IST)
लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांचे अर्ज भरायला सुरुवात झाली असून प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्यापही काही उमेदवारांची घोषणा होत आहे. राज्यातील ४८ पैकी काही महत्त्वाच्या जागांवर जागावाटपातील तिढा कायम आहे. त्यामुळे, हळुहळु उमेदवारांची घोषणा सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज बीड आणि भिवंडी मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना धाराशिवमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
 
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर, ओमराजेंनी प्रचारालाही सुरुवात केली. मात्र, त्यांच्याविरुद्धच्या उमेदवारांसाठी धाराशिवकरांना मोठी वाट पाहावी लागली. त्यानुसार, आज अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे, तुळजापूरचे भाजपा आमदार असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नीला ही उमेदवारी मिळाली आहे. महायुतीने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी ३ विद्यमान आमदारांच्या पत्नींना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये, धाराशिव, बारामती आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातून ही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, लोकसभेची निवडणूक ही आपली निवडणूक, आपली माणसे असा राजकीय कार्यक्रम असल्याचेही दिसून येते.
 
भाजपाने अमरावतील लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा यांचे पती रवि राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे, आमदारपत्नीला भाजपाने लोकसभेच्या मैदानात उतरवल्याचे दिसून येते. त्यानंतर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आता, महायुतीकडून आणखी एका महिला उमेदवाराची घोषणा झाली, ज्यांचे पती विद्यमान आमदार आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पती तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विशेष म्हणजे ते भाजपा नेते असून आजच त्यांच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
 
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सोडवताना आणि काही जागांचे साठेलोठे करताना अशाप्रकारे तीन विद्यमान आमदारांच्या पत्नींना लोकसभेच्या रणांगणात उतरवण्यात आले आहे. त्यामध्ये, भाजपाने १ तर राष्ट्रवादी काँग्रेसने २ उमेदवार दिले आहेत. भाजपाने आतापर्यंत २४ जागांवर उमेदवारांची घोषणा केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची जागा महादेव जानकर यांना दिली असून आतापर्यंत चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. या दोन्ही पक्षाने तीन आमदारपत्नींना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे धाराशिवमधील अर्चना पाटील या सुनेत्रा पवार यांच्या जवळच्या नातलगही आहेत.
 
Edited By- Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना पेक्षा 100 पट जास्त घातक महामारी