भाजपने अर्थमंत्री निर्मला सीतामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पर्यवेक्षक बनवले आहे. दोघेही मंगळवारी मुंबईला जाणार असून विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत बोलणार आहेत. मात्र, भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे
भारतीय जनता पक्षाने मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्रातील पक्ष विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली. पर्यवेक्ष कांच्या नियुक्तीनंतर महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळण्याची अपेक्षा आहे.
भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पक्षाच्या संसदीय मंडळाने महाराष्ट्रातील पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकीसाठी विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. 3 डिसेंबरला राज्यात पक्ष विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. 288 सदस्यीय विधानसभेत महायुतीने 230 जागा जिंकल्या आहेत. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या.
निवडणूक निकाल जाहीर होऊन आठवडा उलटून गेला तरी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालेले नाही. नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत भाजपच्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे.