महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024:ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.
ते म्हणाले, "महाराष्ट्र 2024 च्या विधानसभा निवडणुका केवळ राज्याच्या भवितव्यावरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या भवितव्यावर परिणाम करणार आहेत.आम्ही महाविकास आघाडीला 269 जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीशिवाय काही जागांवर आम्ही इतर पक्षांच्या लोकांनाही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
नोमानी म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजातील 117 उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे, याशिवाय 23 मुस्लिम उमेदवारांनाही पाठिंबा दिला जाईल. आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असून आपल्या लोकांना मतदान करण्यास सांगणार असल्याचे नोमानी यांनी सांगितले.
यापूर्वी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला 17 मागण्यांचे पत्र पाठवले होते, त्यात त्यांनी लिहिले होते की, निवडणुकीत पाठिंबा हवा असेल तर आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.