Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग Aundha Nagnath Jyotirlinga

aundha nagnath
, सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (08:05 IST)
- महेश जोशी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे गाव बालाघाट पर्वताच्या कुशीत वसलेले आहे.
 
मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी नागनाथ एक आहे. प्राचीनकाळी हा प्रदेश दारुकावन नावाने प्रसिद्ध होता. ऋषिमुनींना त्रस्त करून सोडणार्‍या दारुका राक्षसाचा वध करून भगवान शंकराने याच ठिकाणी लिंग रूपाने वास्तव्य केले. येथील नागेश्वराचे मंदिर अतिशय प्राचीन असून स्थापत्याचा आश्चर्यकारक आविष्कार या मंदिरावरील कोरीव कामाचे अवलोकन केल्यास सहज लक्षात येतो.
 
या मंदिराच्या शिल्पकलेची वेरूळ व अजिंठा येथील शिल्पकलेची तुलना करून काही इतिहासकारांनी या मंदिराच्या उत्पत्तीचा संबंध वाकाटक आणि राष्ट्रकुट घराण्याशी व त्या कालखंडाशी जोडला. परंतु, चिकित्सक दृष्टीने पाहिल्यास या मंदिराचे पूर्ण शिल्पकाम हे हेमाडपंती असल्याचे जाणवते. हेमाडपंती कालखंड सर्वसाधारण 11 ते 12 वे शतक असा मानला जातो. यामुळे या कालखंडातच या मंदिराचे निर्माण कार्य झाले असावे. तसा पुरावा 1294 मध्ये येथे कनकेश्वरी देवी जवळ सापडलेल्या शिलालेखातून मिळतो. ह्यात यादव राजा रामदेवराय यांनी या मंदिरास उल्लेख केल्याचा सापडतो म्हणून या मंदिराचा कालखंड 11 ते 12 वे शतक मानला जातो.
 
मंदिराची रचना
नागेश्वर मंदिर हे शिल्पकलेने नटलेले आहे. हे मंदिर द्वादंश कोणी उतरत्या कंगोर्‍यांनी चौथर्‍यावर हेमांडपंती पद्धतीनुसार बांधलेले आहे. मंदिराच्या भोवती 20 फूट उंचीचा तट असून त्याला 4 प्रवेशद्वारे आहेत. या मंदिराच्या आवारासह लांबी 289 बाय 190 फूट एवढी आहे. मुख्य मंदिर मात्र 126 बाय 118 फूट इतके आहे. मंदिराच्या आतील भागात वर्तुळाकार मंडप 8 खांबांनी तोलून धरला आहे. त्याचे छत घुमटाकार असून अष्टकोनी कलाकुसरीचे आहे. अशा येथील मंदिराच्या गर्भगृहात सुंदर शिवलिंग भूमिगत पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे. परधर्मीयांच्या हल्ल्यापासून मंदिरातील मूर्तीला इजा पोहचू नये किंवा संभाव्य आक्रमणांपासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ही खबरदारी घेतली आहे.
 
मंदिरात अर्धमंडप अंतराळ गर्भगृह हे महत्त्वाचे घटक आहेत. मंडपाची लांबी रुंदी 40 बाय 40 फूट अंतराळ व गर्भगृहाची व्याप्ती 25 बाय 5.66 फूट इतकी आहे. या मंदिरात 8 नक्षीदार स्तंभ आहेत. यावर यक्षयक्षीण आदी शिल्पे कोरल्याने ह्याचे सौंदर्य वृद्धिंगत झाले आहे. या शिल्पात काही महत्त्वपूर्ण शिल्पांची माहिती पुढील प्रमाणे :
 
1. शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले असून रावण पर्वत हालविण्याचा प्रयत्न करीत आहे.
२. भगवान विष्णूचे दशावतार.
३. अर्धनारीनटेश्वराचे शिल्प त्यात शंकराचा अर्धाभाग व पार्वतीचा अर्धाभाग आहे.
४. नटराज तांडव नृत्य करताना.
५. एका शिल्पात एका व्यक्तीस तीन तोंडे व चार पाय यातील कोणतीही एक बाजू झाकली तर एका व्यक्तीची पूर्ण कृती बनते.
६. याशिवाय मंदिरावर तिन्ही बाजूने अंदाजे ५.५ फूट लांब व ८ फूट रुंदीची एक आकर्षक ध्यानस्त योग्याची मूर्ती भव्य स्वरूपात दर्शनी पडते.
 
तत्कालीन कलाकारांनी गाभार्‍यातील दूषित हवा बाहेर काढण्यासाठी सोय केलेली आहे. बांधकामात जेथे जोड आहेत. त्याठिकाणी लोखंड व शिसे या धातूच्या मिश्रणाचा उपयोग करून बांधकाम मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. ही यात्रा पाच दिवस चालते. महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे साक्षात भगवान शंकराच्या विवाहाचा दिवस मानला जातो. यात्रेच्या पाचव्या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या परिसरात लाकडी रथामध्ये श्रीच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. हा लाकडी रथ भाविक मोठ्या श्रद्धेने ओढतात.
webdunia
रथोत्सवाला लाखो भाविक उपस्थित असतात. रथोत्सवाने यात्रेची सांगता होते. दिवसेंदिवस येथील यात्रेचे स्वरूप बदलत असून आता पुरेशा जागे अभावी यात्रेत चित्रपटगृहे, विविध दुकाने, आकाश पाळणे, सर्कस कमी प्रमाणात येत असल्याचे जाणवते. यात्रेत असलेला पूर्वीचा उत्साह कमी होत असला तरी दर्शनार्थी भाविकांच्या संख्येत मात्र फार मोठा प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे.
 
कसे पोहचाल
औंढा नागनाथला जाण्यासाठी जवळचे स्टेशन चोंडी आहे. हे सुमारे 21 किमी अंतरावर आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शहरांना आणि महाराष्ट्राबाहेर रेल्वेने चांगले जोडलेले आहे. दुसरा पर्याय म्हणजे हिंगोली स्टेशन जे सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि बस किंवा टॅक्सीने औंढा येथे पोहोचता येते.
 
औरंगाबाद विमानतळ औंढा नागनाथचे सर्वात जवळचे स्थानिक विमानतळ आहे जे सुमारे 210 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी विमानतळ हे जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे सुमारे 580 किमी अंतरावर आहे. त्यामुळे विमान प्रवासाने औंढा नागनाथला सहज जाता येते.
 
औंढा ते मुंबई हे अंतर अंदाजे 580 किलोमीटर आहे. हे औरंगाबादपासून सुमारे 200 किलोमीटर आणि नागपूरपासून 360 किलोमीटर अंतरावर आहे. राज्य परिवहन आणि खाजगी बस या शहरे आणि औंढा नागनाथ दरम्यान चालतात. याशिवाय चोंडी, परभणी येथूनही बसेस धावतात. याशिवाय, तुम्ही औंढापासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या हिंगोली स्टेशनची निवड करू शकता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध गायक कुमार सानू डीपफेक व्हिडिओचे बळी ठरले