चिपळूण हे मुंबई-पणजी महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे. पुणे - मुंबई - सातारा - कर्हाड इत्यादी गावांशी गाडी मार्गाने जोडले गेले आहे. तसेच चिपळूण कोकण रेल्वेनेही जोडलेले आहे. चिपळूण जवळ वशिष्ठी नदीची खाडी आहे.सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते.
या व्यापारी मार्गावर अंकूश ठेवण्यासाठी तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेल चा गोपाळगड तर खाडीच्या अंतर्भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला.
गोवळकोट उर्फ गोविंदगड असे नाव असलेला हा लहानशा आकाराचा किल्ला मुख्य:त गोवळकोट म्हणूनच स्थानिकांमधे परिचित आहे. चिपळूणपासून साधारण ४ कि.मी. अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिनही बाजुनी वस्तीने घेरलेला आहे.
चिपळूणच्या बाजारपेठेतून गडाकडे जाणारा मार्ग गाडीमार्ग असून खाजगी वाहने पायथ्यापर्यंत जातात. गडाच्या पायथ्याला करंजेश्वरी देवीचे मंदिर आहे. मंदिर आणि त्याचे प्रांगण उत्तम प्रकारे सुशोभित केलेले आहे. पुर्वी या भागामधे करंजाची विपूल झुडुपे होती. या झुडुपांमधे देवी प्रकटली म्हणून तीचे नाव करंजेश्वरी देवी पडले. या आठव्या शतकातील मंदिराचा सध्या जिर्णाद्धार करण्यात आला असून तेथे रहाण्याचीही उत्तम व्यवस्था आहे.
गोवळकोटावर पाणी नाही. त्यामुळे येथूनच पाणी सोबत घेता येईल. येथिल पायर्यांच्या मार्गाने दहा पंधरामिनिटांमधे चढून वर आल्यावर जलशुद्धीकरण प्रकल्पाची भव्य इमारत आहे. तेथूनही एक कच्चा गाडीरस्ता मदरशा जवळून खाली उतरतो. या प्रकल्पाजवळून पाच दहा मिनिटांच्या काहीशा चढाव्यावर किल्ल्याची तटबंदी दिसते. या तटबंदीमधील दरवाजा मात्र नष्ट झालेला आहे. दोन्ही बाजूचे दोन बुरुज धरुन उभे आहेत. यातील डावी कडील बुरुजावर झेंडयाचा खांबावर भगवा झेंडा फडकताना दिसतो. झेंडय़ाखालीच तोफही आहे. या बुरुजावर जाण्यासाठी पायर्या आहेत. उजवीकडील बुरुजावरही मोठय़ा आकाराच्या दोन तोफा पडलेल्या आहेत.
गडाची तटबंदी रुंद असलीतरी ती मधून मधून ढासळलेली असल्याने कधी वरुन तर कधी खालून गड फेरी मारावी लागते. गोवळकोटाची तटबंदी ही रचीव दगडांची आहे. त्यामुळे ती अनेक ठिकाणी ढासळलेली दिसते. गडावर रेउजाई मातेचे मंदिर आहे. त्याचा नव्यानेच जिर्णेद्धार करण्यात आलेला आहे.
येथिल तटबंदीवरुन चालत पश्चिम अंगाला आल्यावर या बुरुजावरुन वशिष्ठ नदीच्या खाडीचे सुरेख दृष्य दिसते. हिरवीगार शेते आणि नारळी पोफळीच्या बागा मन प्रसन्न करतात. मुंबई-पणजी महामार्गावरील वाहतूकही येथून दिसते.
बुरुजाच्या बाजुला असलेल्या उंचवटय़ावरुन गडाचा पुर्ण देखावा दिसतो. या उंचवटय़ाच्या खाली मोठा तलाव आहे. हा तलाव बांधीव असून आत उतरण्यासाठी पायर्याही केलेल्या आहेत. मात्र सध्या तलावात टिपूसभर पाणी सुद्धा टिकत नाही.
मोक्याच्या ठाकाणी असलेल्या गोवळकोट छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात आणून त्याची दुरुस्ती केली होती. याचे उल्लेख सापडतात. किल्ल्याचा आकार लहान असला तरी तासाभराचा अवधी कसा निघून जातो ते कळत नाही आणि आपण परतीच्या वाटेकडे चालू लागतो.