औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.
औरंगाबाद-अजिंठा राज्य महामार्गावरील औरंगाबाद शहरापासून अवघ्या 22 कि.मी. अंतरावर असलेल्या फुलंब्री तालुक्यातील वन क्षेत्राने वेढलेल्या 35 ते 40 कुटुंबांचे सारोळा हे छोटेसे गांव. हे गाव चौका घाटापासून 7 कि.मी.अंतरावर आहे. घनदाट झाडाझुडपांनी आणि डोंगरमाथ्याने वेढलेल्या या गावाची निसर्ग किमया वेगळीच. यामुळेच तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपूते यांच्या वन पर्यटन स्थळाच्या संकल्पनेतील निसर्गाच्या सानिध्यात रममान होण्यासाठी सारोळा गावचा परिसर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून सज्ज होत आहे. वन विभागाने त्याचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे.
या वन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळामार्फत सन 2008-08 मध्ये सुमारे 13 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने दोन व्ह्यू पॉइंटसह पॅगोडा साकारण्यात आला आहे. हे व्ह्यू पॉईंट समुद्र सपाटीपासून एक हजार मीटर उंचीवर असल्याने या ठिकाणास थंड हवेचे ठिकाण संबोधण्यात येत आहे. सारोळा गाव परिसरातील 637 हेक्टर वनक्षेत्राबरोबरच एक वनतळे व एक लघु पाटबंधारे प्रकल्पाने नटलेले पहावयास मिळते. एक पॉईंट 45 मीटर लांब असून तो सारोळा गाव परिसरातील डोंगरमाथा, डोंगरकडा व दर्यांचे दर्शन घडवतो. दुसरा व्ह्यू पॉईंट 50 मीटर लांबीचा असून यावरुन औरंगाबाद शहर व चौका घाट राज्य महामार्गाचे विहंगम दर्शन घडते.
सारोळ्याचे वनपर्यटन
पहिल्या व्ह्यू पॉईंटच्या पायथ्याशी श्री गणेशाचे मंदिर असून त्या नजीकच्या काळ्याशार पाषाणात पुरातनकालीन दगडात कोरलेला हौद आहे. या हौदाची खोली 9 फुट असून लांबी 7 व रुंदी 5 मीटर आहे. यातील पाण्याचा संचय बारमाही उपलब्ध असल्याने याचा फायदा जनावरे, पर्यटक व गावकर्यांना होतो. तसेच मंदिरातील वेळोवेळच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी याच पाण्याचा उपयोग होत असल्याचे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले.
वॉच टॉवर व अन्य किरकोळ कामांसाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडून 2009-10 या आर्थिक वर्षात चार लाख 68 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून मंदिर परिसरात 15 बाय 20 फुटाचे शेड उभारण्यात येणार आहे. तिसरा व्ह्यू पॉईंटही उभारण्याचे नियोजन वन विभागाकडून करण्यात आले आहे. सारोळा गाव परिसराला लागूनच डोंगराच्या पायथ्याशी ब्रिटीश-निजाम काळातील एक जुने व सुंदर विश्रामगृह असून त्याच्या जोडीला 50 वर्षांपूर्वी दुसरे एक विश्रामगृह बांधण्यात आले आहे. सुटीच्या दिवशी पर्यटक व शाळकरी मुलांच्या सहली या स्थळाला अवर्जून भेट देतात.
जिल्ह्यातील अजिंठा, वेरुळ या जागतिक पर्यटन स्थळाबरोबरच म्हैसमाळ या थंड हवेच्या पर्यटन स्थळासारखाच सारोळा वन पर्यटन स्थळाचा पर्यटक लाभ घेत आहेत. त्यामुळे वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून या स्थळाचा विकास घडवून आण्याचा प्रयत्न होत आहे.
या परिसरात निलगायी, हरीण, रानडुक्कर, कोल्हे, पालींदर, मोर व अन्य पशुपक्षी तसेच सरपटणारे अजगर, फुरसा यासारखे प्राणी पहावयास मिळतात. ऋतूचक्रानुसार बिबा, करवंदे, चारोळी, टेंभूर्णे यासारख्या रानमेव्याची पर्यटकांना चव चाखता येते. वन व्यवस्थापन समितीमार्फत जंगलातील चार्याचे नियोजनात्मक संरक्षण केले जाते. चार्यापासून मिळणार्या उत्पन्नातील अर्धी रक्कम वनक्षेत्र परिसरातील गाव विकासाच्या किरकोळ कामासाठी खर्च करुन उर्वरित अर्धी रक्कम वन विभागाकडे शासन दरबारी जमा केली जाते. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जंगलाची आणि राज्य महामार्गाकडील दुसर्या व्ह्यू पॉईंटवरुन दिसणार्या अनोख्या सूर्यास्ताची मजा पर्यटकांना औरच वाटते.