दिवाळीच्या सुट्यांमध्ये तुम्ही जर श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे जात असाल तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने भगवती श्री सप्तशृंगी मातेचे मंदिराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवार, २७ ऑक्टोबरपासून रविवार, १३ नोव्हेंबरपर्यंत दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले ठेवले जाणार आहे. त्यामुळे भाविकांना भगवती श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिवाळी उत्सव कालावधी दरम्यान राज्यातील तसेच परराज्यातील विविध शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी असते. तसेच दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी पायी पालख्या येत असतात. नवरात्र उत्सवातही मोठी गर्दी असते. गेल्या २ वर्षात कोविड-१९ संसर्गजन्य परिस्थितीमुळे श्री भगवती दर्शनासाठी येवू न शकलेले भाविक यांची संख्या विचारात घेण्यात आली आहे. अचानक होणाऱ्या संभाव्य गर्दीची परिस्थिती टाळणे हेतूने श्री भगवती मंदिर हे २४ तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या गर्दीची योग्य ती विभागणी तसेच भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणार ताण विभागून भाविकांना श्री भगवती दर्शनाचा विशेष लाभ घेता येईल. या दृष्टीने सदरचा निर्णय विश्वत संस्थेने घेतला आहे.
आवश्यतेनुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच फ्युनीकुलर रोप वे ट्रॉली सुविधा देखील भाविकांना सुरू असेल असे नियोजन करण्यात आले आहे. कालावधीत भाविकांनी २४ तास दर्शन व्यवस्था सुरू असेल, याची नोंद घेवून गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता आपल्या निर्धारित वेळेत श्री दर्शनासाठी येवून मंदिर व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य देवू करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor