नाशिक : येत्या ३१ डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व पुस्तक मराठीतून मिळतील त्यामुळे पॉलिटेक्निक शिक्षण सहज आणि सोपे होईल, विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होईल अशी माहिती नाशिकमध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. इंग्रजीमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी शक्यतो मराठीत शिकवावं. ते जर इंग्लिशमध्ये शिकवणार असतील तर इंग्लिशमध्ये शिकवलेलं मराठीत भाषांतर होण्यासाठी डिवाइस देण्यात येणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. लघु उद्योग भारती नाशिक, इंजिनियरिंग टॅलेंट सर्च २०२२ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे.
दहावीनंतर पॉलिटेक्निक (अभियांत्रिकी पदविका) किंवा बारावीनंतर इंजिनिअरिंगसाठी (अभियांत्रिकी) प्रवेश घ्यायचा म्हटले, की ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे इंग्रजीचं राहते संकट उभे राहतं. अशात पॉलिटेक्निकचे पुस्तके मराठीतून मिळाले तर नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल. आपल्या भाषेतून समजणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं सोपं होईल. त्यामुळे मराठीतून पॉलिटेक्निकच्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी अशा व्यक्त केली जात आहे.
त्यासोबतच काही नवीन अभ्यासक्रम आता सुरू करण्यात येणार असून या अभ्यासक्रमांमुळे शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्त्व देखील विकसित झाले पाहिजे, शिक्षणात स्किल डेव्हलपमेंटचे विषय देखील राज्यातील विद्यापीठांनी घ्यावे सूचना केल्या चंद्रकांत पाटील यांनी केल्या आहेत.
आर्थिक बाबतीत ५ व्या नंबर वर..
देशाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना चंद्रकांत पाटलांनी म्हणाले आर्थिक बाबतीत आपण आता ५ व्या क्रमांकावर आलो आहोत. १५० वर्ष आमच्यावर राज्य करणाऱ्या इंग्लंडला देखील आम्ही आता मागे टाकले आहे. मला पाचव्या स्थानावरून पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी संशोधन आणि विज्ञानमध्ये क्रांती झाली पाहिजे.
Edited by: Ratnadeep Ranshoor