Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री क्षेत्र कारंजा : दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान

श्री क्षेत्र कारंजा : दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान
फोटो साभार -सोशल मीडिया 
थोर दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी किंवा कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे.
हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मानव अवतारातील दुसरा अवतार असलेले श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे. आजही श्रीनृसिंहसरस्वती स्वामींचा वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यातश्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना श्रीनृसिंहसरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता. त्या वाड्यामधे आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते. हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्रीनृसिंहसरस्वती स्वामींची मूर्ती आहे. इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत
 
विदर्भामध्ये वाशीम जिल्ह्यात कारंजा या नावाचे हे दत्तगुरूंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान असून मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. या श्री गुरुमंदिराची बांधणी 1934 साली ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी केली. इथे श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना तसेच श्रीदत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचीही स्थापना करण्यात आली आहे. वऱ्हाडात कारंजा नगरातील अंबाभवानी आणि माधव या दाम्पत्याला नरहरी नावाचे पुत्ररत्न प्राप्त झाले. हेच ‘श्रीनृसिंह सरस्वती स्वामी’ आहे. अशी आख्यायिका आहे की जन्मताच नरहरी बाळाच्या मुखातून ‘ॐ’काराचा उच्चार बाहेर पडू लागला अशा प्रकारे या नरहरीने च श्रीदत्तात्रेयांच्या द्वितीय अवतारात जन्म घेतला असे मानले गेले.
 
प्राचीन काळापासून कारंजा क्षेत्राचे महात्म्य प्रख्यात आहे. स्कंद पुराणातील पाताळखंडामध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख केला गेला आहे. असे म्हणतात की पूर्वी कारंजा आणि त्याच्या जवळपास पाणीच नव्हते ऋषिमुनींना पिण्यापुरते  पाणी देखील मिळत नव्हते. म्हणून ऋषी वशिष्ठांचे शिष्य करंजमुनी यानी एक तलाव खणण्यास सुरु केले.त्यांना खणतांना बघून  इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला. रेणुकादेवी करंजमुनींच्या समक्ष प्रकटली.  तिने करंज क्षेत्राचे यमुना माहात्म्यचे  वर्णन केले.  त्या म्हणाल्या गंगा व यमुना बिंदूमती कुंडात आहेत.  गंगा व यमुना कुंडात गुप्त होऊन बिंदुमती (बेंबळानदी) या नावाने वाहते. ती काही ठिकाणी गुप्तरूपात आहे व काही ठिकाणी प्रकट होते . यमुना-महात्म्य सांगून रेणुका देवी गुप्त झाली. नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली. सर्व ऋषींनी आपल्या तपश्चर्याने आणि  सामर्थ्यांने सर्व नद्या व तीर्थे यांचे आवाहन  केले. त्यामुळे तो तलाव गच्च भरला. करंज ऋषींना येथे आश्रम करण्याची आज्ञा देऊन सर्व तीर्थ व नद्या आपापल्या ठिकाणी निघून गेल्या अशी आख्यायिका आणि श्रद्धा आहे. करंजमुनींच्या कृपा प्रसादा मुळे गरुडापासून आपले आणि आपल्या कुळाचे संरक्षण होण्यासाठी शेषराज इथे वास्तव्यास आले. म्हणून या करंज क्षेत्राला शेषांकित क्षेत्र असे देखील म्हटले जाते.  

कारंजा येथील गुरूमंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती, पूजा, अभिषेक  झाल्यावर श्रींच्या निर्गुण पादुकांवर गंधलेपन केले जाते. दररोज सकाळी  आठ वाजता शंखनाद होतो. त्यावेळी निर्गुण पादुकांवर अत्तरमिश्रित चंदनाचा लेप लावण्यात येतो. नंतर त्या पादुका गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेवलेल्या चौरंगावर ठेवतात.भक्त पादुकांचे दर्शन घेण्यास जमा होतात. श्रींची पूजा केल्यावर पादुका   श्रींजवळ ठेवल्या जातात. नंतर नैवेद्य दाखवून पुन्हा निर्गुण पादुका त्यांच्या जागी ठेवण्यात येतात. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. 
 
या क्षेत्री असे जावे- 
बस  मार्गे - वाशीम, अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कारंजा हे 60 कि. मी. अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बस सेवा आहे. 
रेल्वे मार्ग - मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशनवर उतरून बस मार्गाने 30 कि. मी. अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते. 
 
राहण्याची सोय- इथे निवासासाठी भक्त निवास आहे इथे भक्तांना  दुपारी 1 वाजता महाप्रसादाची सोय आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंकिता लोखंडे ठरली बिग बॉस 17 घराची नवी कॅप्टन