Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी

narsinhwadi
शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (08:07 IST)
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे. कुंभी, कासारी, तुलसी, सरस्वती आणि भोगावती या पाच पवित्र नद्या म्हणजेच पंचगंगा. पंचगंगेचा इथे कृष्णाबरोबर संगम होतो. आणि पुढे ती कर्नाटकात वाहत जाते. नृसिंहवाडीच्या पूर्वेस कृष्णा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. त्यामूळे यास विशेष महत्त्व आहे. म्हणून या संगमास विशेष महत्त्व प्राप्त झाले. श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची तपोभूमी आणि कर्मभूमी असलेली कृष्णा-पंचगंगाच्या नयनरम्य तीरावर वसलेली नृसिंहवाडी ही दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते. श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना, भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो.
पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम आहे.
नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती हलवली जाते. दरवर्षी पूर आल्यावर हे असे केले जाते. या ठिकाणी भाविकांची गर्दी बारा महिने असते. या ठिकाणी भाविकांसाठी भक्तनिवास, धर्मशाळा, भक्तवात्सल्य, प्रसादालय आहे. वाडीतील दत्त मंदिराशी निगडित अशी माहिती आहे की विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीची दृष्टी परत येण्यासाठी इथे प्रार्थना केली होती. मुलीची दृष्टी परत आल्यानंतर त्याने या मंदिराचे बांधकाम करून दिले. यामुळे या मंदिरास कळस नाही. श्री दत्तात्रेयावतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी या ठिकाणी बारा वर्षे वास्तव्य केले होते. अमरापूर हे नदीच्या पैलतीरावर असलेले गाव आहे.
 
प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे सांगतात की, ही वाडी म्हणजे श्री दत्तात्रेयांची राजधानी आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय शरण आलेल्यांची दु:खे निवारण करण्यासाठी आहेत. परमपावन श्री नारायण स्वामी महाराज, श्री गोपाळस्वामी महाराज, श्री मौनी स्वामी महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अशा सिद्धांनी वास्तव्य केले. काही काळानंतर या स्थानास श्री नृसिंहवाडी हे नामाभिधान प्राप्त झाले.
 
श्री नृसिंहवाडीच्या या परमभाविक सेवेकऱ्यांनीच आपल्या प्रेमाने गुरूमाउलीला सतत जागृत ठेवले आहे. श्री नरसिंहगुरु स्वयं अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहेत, राजांचे अधिराजे आहेत आहेत. तरीही अत्यंत मृदुहृदयी, भक्तवत्सल आहेत. स्मर्तुगामी आहेत. ‘मला अहंकार नाही’ असाही अहंकार साधकांना नसावा, असे ते सांगतात.
या ठिकाणी अनेक भक्तांच्या त्यामध्ये आर्त, जिज्ञासू अर्थार्थी यांच्या कामना श्री महाराज पूर्ण करत असल्याने हे स्थान प्रसिद्ध आहे.
 
 प्रात:काळापासून या अर्चनेस आरंभ होतो. भूपाळ्या, काकड आरती हा उपक्रम असतो. सूर्योदयाच्या पूर्वी महाराजांना कृष्णेच्या पाण्याने स्नान घालतात. महाराजांच्या पादुकांवर भगवे वस्त्र अर्पण करतात. 
 
माध्याह्नकाळी पादुकांची महापूजा केली जाते. पादुकांवर दूध, केळी, तूप, मध यांचे लेपन करून पादुकांना गरम पाण्याने स्नान घालतात. नंतर सुवासिक चंदनाचे लेपन करतात.
 
सायंकाळी सात वाजल्यापासून महाराजांच्या सायंपूजनास प्रारंभ होतो. त्या वेळी अर्चक पंचोपचार पूजा करून धूप अर्पण करून मंगल आरती करतात. त्या वेळी चांदीच्या पात्रामधून केशरयुक्त दूध, काही फराळाचे जिन्नस आणि नाना प्रकारची फळे यांचा नैवेद्य श्री महाराजांना अर्पण केला जातो.
 
खरोखरच श्रीदत्त महाराजांच्या नामस्मरणाने सारे विकार शांत होतात. सात्त्विक बुद्धीने वर्तन करणाऱ्या भक्तांवर श्रीगुरू माउलींचा आशीर्वादाचा हात नेहमीच असतो. त्रस्त लोकांना संकटमुक्त करतात. संन्याशांना आत्मज्ञानवंत करून मोक्ष देतात. रोग्यांना बरं करतात. अभिमान नष्ट करुन निरभिमानता देतात. स्वर्गार्थी लोकांना स्वर्ग देतात. भक्तांना दु:खमुक्त करून, सुखरूप करण्यासाठी ते नरसोबावाडीला अखंड जागत बसलेले असतात. या ठिकाणी श्री महाराजांचे उत्सवही साजरे केले जातात. श्री दत्तजयंती, श्री गुरु द्वादशी, श्री नृसिंह जयंती, श्री गुरुप्रतिपदा, श्री गुरुपौर्णिमा, श्री नारायण स्वामींचा उत्सव, श्री टेंबे स्वामींचा उत्सव, दक्षिण द्वार सोहळा असे उत्सव साजरे केले जातात. पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत श्री महाराजांचे दर्शनास लांबलांबचे भक्त येत असतात. महाराज संन्यासी असल्यामुळे पावित्र्य कायम राखण्यासाठी मंडपात अर्चकांशिवाय कोणासही प्रवेश दिला जात नाही.

शिबिकेच्यावेळी श्रद्धा अर्चकाशिवाय शिबिकेला कोणीही स्पर्श करावयाचा नाही, असा येथील नियम आहे. यासाठी धोतर, उपरणे घातलेले भक्तवृंद असतात आणि डाव्या बाजूला शर्ट व इतर वस्त्र घातलेले असतात. शिबिकेच्या मागे अब्दागिरी आणि छत्र असते. नृसिंहवाडीमध्ये श्री मारुतीरायाचे मंदिर आहे. श्री ब्रह्मानंद स्वामी, श्री नारायण स्वामी मंदिरे इत्यादी देवतांची मंदिरे आहेत. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे श्री नृसिंहवाडीतील वस्ती वाढत आहे. अनेक भक्तांना समाधान आणि शांती प्राप्त होते. म्हणून ते वाडीत येत असतात. 
 
कसे जायचे?
एसटी- हे क्षेत्र कोल्हापूरपासून पूर्वेस 50 कि. मी. अंतरावर आहे. सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 22 किमी. अंतरावर दक्षिणेस हे क्षेत्र आहे. सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे. सांगली-कुरूंदवाड बसनेसुद्धा इथे जाता येते.
 
रेल्वे मार्ग- सांगली हे कोल्हापूर-मुंबई मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे. 
 
इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त-निवास आहे. दुपारी 12 वाजता महाप्रसादाची सोय आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NORA FATEHI waving Indian flag नोराचे स्टेजवर बेभान कृत्य