Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीक्षेत्र गिरनारपर्वत गुरुदेव दत्तप्रभूंचे निवासस्थान

girnar datta temple
भगवान दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष निवास करण्याचे ठिकाण असे हे गिरनार पर्वत. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने सुशोभित केलेले आणि बारा हजार वर्षे तपश्चर्या करून सिद्ध केलेले असे हे गिरनार पर्वत आहे. अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्टया हे परिसर लहान मोठ्या पर्वतांच्या श्रेणींनी वेढलेला आहे. या पर्वतास रेवताचल पर्वत, रैवत,रेवताचल, कुमुद, उज्जययंत असे म्हणून ओळखतात. रेवताचल, कुमुद आणि उज्जययंत ही नावे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी निगडित आहे. श्री गिरनार हे भगवान दत्तात्रयांचे अक्षय निवासस्थान म्हणून प्रख्यात आहे. गिरनार(जुनागड)(सौराष्ट्र गुजरात) (GIRNAR) हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते.जुनागड या शहरापासून हे स्थान 5 किमी अंतरावर आहे.गिरनार पर्वत जाण्यासाठी 10,000 पायऱ्या चढून जावे लागते. दत्त भक्त येथे दत्तात्रयांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जातात.येथे आल्यावर नेहमी गुरुदेव दत्तांचा निवास असल्याचा प्रत्यय दत्त भक्तांना येतो. गिरनार पर्वत हे निसर्गरम्य, वन्यप्राणी, विविध औषधी वनस्पतीने समृद्ध असा परिसर आहे. 
ही भूमी योगी सिद्ध महात्मांनी समृद्ध आणि संपन्न आहे. गिरनार पर्वत असे पवित्र सिद्ध स्थान आहे,येथे अनेक संतांना प्रभू दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे. बाबा किनाराम अघोरी, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, नारायण महाराज, रघुनाथ निरंजन, या संतांना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे. 
गिरनार पर्वताच्या पायथ्याला भवनात मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथे दरवर्षी शिवरात्रीच्या मेळाव्यात या कुंडाजवळ 10 ते 12 लाख लोकांचा जमावडा असतो. या मृगी कुंडाच्या संदर्भात  एक आख्यायिका आहे की, स्वयं देवाधिदेव महादेव या कुंडात स्नानासाठी येतात. या परिसरात जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा, असे अनेक आखाडे आहे. इथे श्री शेरनाथबापू संचलित आश्रम बघण्यासारखे आहे. 
या आश्रमात अनेक वर्षांपासून अन्नदान सुरु आहे. गुरुशिष्य नाथ परंपरा येथे जपली जाते. लंबे हनुमानासमोर पायवाटेने आत चालत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मिरी बापूंचे आश्रम आहे. 
दत्त गुरूंचे जागृत स्थान गिरनार पर्वतच्या पायऱ्या चढताना सुरुवातीलाच एक कमान लागते इथून भाविक पायऱ्या चढायला सुरुवात करतात. ज्यांना या पायऱ्या चढणे अशक्य वाटते ते कमानीजवळ डोलीवाले असतात. ते डोलीमधून देखील जाऊ शकतात. डोलीवाले 5 ते 10 हजार रुपये माणशी घेतात. 200 पायऱ्या चढण केल्यावर डावीकडे श्री भैरवाच्या मूर्तीचे दर्शन होतात. 2000 पायऱ्या चढण केल्यावर वेलनाथ बाबा समाधी स्थळ असे फलक दिसते. 2250 पायऱ्या नंतर राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुहा आढळते. आत गेल्यावर दोन सुबक मुर्त्या दिसतात. पुढे गेल्यावर माली घाट येथे श्रीरामाचे मंदिर आहे.येथे थंड पाण्याचे कुंड आहे. 
2600 पायऱ्यांवर राणकदेवीआईची शीळ आहे. या शिळेवर दोन्ही हातांच्या पंज्याचे निशाण आहे. पुढे गेल्यावर 3500 पायऱ्यांजवळ प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. येथे संतान प्राप्ती झाल्यावर आपल्या बाळांना घेऊन देवीआईच्या दर्शनास आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. इथून पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत.इथे प्राचीन राजवाड्याचे जैन मंदिर आहे. हे जैन मंदिर 22 वे तीर्थंकर नेमिनाथांचे आहे. नेमिनाथांची काळ्या पाषाणाची अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. या ठिकाणी नेमिनाथ साधना करत असायचे. पुढे गेल्यावर जैनांचे पहिले तीर्थंकर आदिनाथांची भव्य प्रतिमा आढळते. येथे उत्तम कलाकुसर केलेल्या जैन मंदिरांचा समूह आहे. पुढे गेल्यावर  गौ-मुखी गंगा म्हणून स्थान आहे.  येथे गाईच्या मुखातून गंगेचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव आणि बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौमुखी वरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूने चढण करताना 4800 पायऱ्यांवर अंबाजी टुक येते हे शक्तीपीठ 51 शक्तिपीठांपैकी एक आहे.या ठिकाणी देवी पार्वतीने अंबाच्या रूपात वास्तव्य केले होते. या मंदिरात अंबादेवीआईच्या सन्मुखाचे दार कायम बंद असते. हे दार होळी पौर्णिमा किंवा नवरात्रीलाच उघडले जाते. इथे असलेली अंबामातेची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. देवी आईच्या शक्तीची प्रचिती इथे येतेच. मातेच्या दर्शन केल्यावर प्रवास सुखकरच होतो. पुढे गेल्यावर  5500 पायऱ्या चढण केल्यावर श्री गौरक्षनाथ टुंक स्थान जे या गिरनार पर्वतावरील सर्वात उंच स्थान आहे येते. हे स्थान समुद्रसपाटीपासून सुमारे 3 ,666 फुटावर आहे. 
 असं म्हणतात की नेहमीच गुरूंचे स्थान उंचीवर असावे. या साठी गोरक्षनाथांनी दत्तगुरुंकडे प्रार्थना केली होती की ''आपले चरणांचे दर्शन मला सतत व्हावे'' दत्त महाराजांनी हे मान्य केले.म्हणून गौरक्षशिखर उंचीवर आहे. इथे नवनाथ संप्रदायच्या गुरु गोरक्षनाथांनी घोर तपश्चर्या केली त्यांना दत्तगुरूंनी साक्षात्कार दिला. आजतायगत येथे गोरक्षनाथांचा वावर असल्याचे समजले जाते. येथे बाजूलाच गोरक्षअखंड धुनी आहे.बाजूला पाप पुण्याची खिडकी आहे. या खिडकीतून निघाल्यावर मोक्ष मिळतो. असे समजले जाते. 
पुढे शिखरवर जाण्यासाठी 1000 ते 1500 पायऱ्या उतरावे लागते. पुढे गिरनार बापूंची गुहा आहे. येथे भैरवनाथाचे मंदिर आहे.  पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात. उजव्या बाजूच्या कमानीतून 300 पायऱ्या उतरून कमंडलू स्थान आहे. 
डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे जाऊन 1000 पायऱ्या चढून गुरुशिखर आहे. या गुरुशिखरावर चढताना काही वेगळाच अनुभव येतो. या ठिकाणी श्री दत्तात्रेयांनी तब्बल 12 हजार वर्षे तपश्चर्या केली होती. हे त्यांचे अक्षय निवास स्थान आहे. या 10 X 12 चौ.फूट जागेत भगवान दत्तात्रेयांच्या पादुका ,एक सुबक मूर्ती आहे. बाजूला प्राचीन गणेश आणि हनुमानाची मूर्ती आहे. ही मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. येथे एक प्राचीन शिवलिंग आहे. 
येथे एक प्राचीन घंटा आहे अशी आख्यायिका आहे की या घंटावर 3 वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेऊन वाजवल्यावर सर्व पितरांनां मुक्ती मिळते. 
इथे 5 हजार वर्षांपासून असलेली दैव दुर्लभ देणगी अशी अखंड धुनी आहे. आजही ती धुनी प्रकट होते. या अग्निरूपानं साक्षात श्री दत्तप्रभूच प्रकटतात. दत्तमहाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथं येतात.   
आश्रमाच्या मागील बाजूने उतरले की महाकाली गुंफेच्या डोंगराकडे वाट जाते. 
ही वाट घनदाट जंगलातून आहे येथे पायऱ्या नसून खडकाळ दगडावरुन चालत जावे लागते. गुहेत मातेचा उग्र मुखवटा असलेली मूर्ती आहे. बाजूला असणाया दोन डोंगरावर रेणुका माता आणि अनुसूया मातेची मूर्ती आहे. 
गिरनारच्या बाजूस भव्य दातार पर्वत आहे. या पर्वतावर चढण करताना 3 हजार पायऱ्यावर दातार भगवानांचे वास्तव्य आहे. या पर्वतावर चढण करणे अवघड आहे.  
गिरनार पर्वताची परिक्रमा करण्यासाठी उजव्या हाताला ठेऊन प्रदक्षिणा घालतात. गिरनारच्या भोवती घनदाट जंगल आहे. या जंगलात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आज्ञा शिवाय अनुमती मिळत नाही. फक्त परिक्रमेच्या कालावधीत येथे 5 दिवसांसाठी भाविकांना प्रवेश देण्यात येते. गिरनार पर्वताची परिक्रमा केल्यावर आपले सर्व पापांचा नाश होतो पापांपासून मुक्ती मिळते. अशी आख्यायिका आहे. भाविक येथे परिक्रमा करतात.  
गिरनार पर्वत हा एका चिर निद्रेत झोपलेल्या साधूंसारखा भासतो, आणि जे महाराजांचे गुरूशिखर आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषाच्या कपाळावर मधोमध म्हणजेच आज्ञा चक्रावर आहे. 
थोडक्यात गिरनार ची पहिली पायरी जेथून सुरू होते ते मूलाधार आणि गुरुशिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्र पर्यंत असा प्रवास होतो, पहिल्या 7500 पायऱ्या पर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो. इथे 10,000 पायऱ्या चढून जावे लागते. आणि प्रत्येक पायरीवर आपल्यातील दुर्गुणांना सोडून पुढच्या पायरीवर पाऊल टाकायचे असते. काम, क्रोध, मत्सर, अशा सर्व दुर्गुणांचा त्याग करून  शेवटच्या पायरी पर्यत चढायचे असते.   
गुरुशिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते, महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही. फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते, अश्रू दाटून येतात. कंठ सद्गदित होतो, अष्टभाव दाटून येतो . फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि दत्तगुरूंची हसरी मूर्ती दिसत राहते , इथला प्रभावच तशा आहे. ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात. उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात निलमणी सारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळी सारख्या कोमल आणि तेजस्वी असे गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन होते. मग "दत्त दत्त ऐसें लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन , मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान" हे अगदी अनुभवास येते. म्हणजेच मानवी जन्म सार्थकी लागतो. सहस्त्रार चक्रापर्यंत प्रवास पूर्ण होतो.महाराजांना एकच विनंती," गुरु महाराज आम्ही कधी चुकलो, अडखळलो, वाम पंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणावेस अशी दत्तगुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना.  
 
या ठिकाणी जाण्यासाठी -
बस मार्गे -सुरत,बडोदा,अहमदाबाद या शहरातून जुनागड(गिरनार)साठी नियमीत बससेवा आहे.
रेल्वे मार्गे - सुरत,अहमदाबाद,राजकोट,जुनागड अशी रेल्वे सेवा आहे.
या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ayodhya Ram Mandir Song राम मंदिरासाठी गायले आदर्श शिंदे