Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीदत्त क्षेत्र औदुंबर Shri Datta Kshetra Audumbar

Shri Datta Kshetra, Audumer
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेलं औदुंबर हे भारतातील अनेक दत्तक्षेत्रांपैकी प्रमुख क्षेत्र आहे. या ठिकाणी श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी चार महिने वास्तव्य केलं होतं. तेथून पुढील तपश्चर्येसाठी त्यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षं वास्तव्य केलं. स्वामींनी असे सांगितले आहे की, माझे वास्तव्य नेहमी औदुंबर या वृक्षात असेल. जो भाविक या वृक्षाची नियमितपणे पूजा करेल किंवा औदुंबर वृक्षाखाली गुरुचरित्राचे पारायण करेल त्याला केलेल्या पारायणाचे चांगले फळ मिळेल. त्याच्यावर माझा आशीर्वाद नेहमीच राहील. कोल्हापूरचा एक  मूढ ब्राह्मण कृष्णा नदीच्या पैलतीरावर श्री भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे.भुवनेश्वरी मातेच्या दर्शनासाठी आला देवीच्या दर्शनानंतर देवीला म्हणाला माझी वाचा परत मिळाली नाही तर  मी जीभ कापून इथेच ठेवेन मग भुवनेश्वरी मातेने असे सांगितले की या नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक तेजस्वी सत्पुरुष बसलेले आहे .त्यांचे दर्शन घे ते तुझी इच्छा पूर्ण करतील. स्वामींच्या आशीर्वादाने त्या मूढ ब्राह्मणास  ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याला वाचा आली.ह्याचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात आढळतो. औदुंबर या क्षेत्राची महती अशी आहे की, या ठिकाणी श्री संत जनार्दनस्वामी आणि श्री संत एकनाथ महाराजांना श्री दत्तदर्शन झाले.
 
श्रीनरसिंह सरस्वती स्वामींचा जन्म वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड इथं झाला. तेथून पुढे ते औदुंबर इथं आले. औदुंबर ही अंकलखोपची वाडी आहे. भिलवडी, अंकलखोप आणि औदुंबर ही एक किमी परिसरात वसलेली गावं आहेत. असं म्हणतात की, या परिसरात नेहमी तपस्वींचा वावर असतो. या पवित्र वातावरणात कृष्णेत स्नान करून भाविक श्री दत्तगुरूंच्या विमल पादुकांचे दर्शन घेतात. श्रीदत्त पादुकांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतांना बाजूच्या ओवऱ्यांमधून दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण करताना दिसतात. मंदिराच्या प्रांगणात औदुंबराच्या वृक्षाची सावली आहे. आकाशात सूर्य तळपत असता औदुंबर वृक्षाची सावली जमिनीवर अशी दिसते जणू रांगोळीच काढलेली आहे. मंदिरातून पायऱ्या चढून वर आल्यावर ब्रह्मानंद स्वामींचा मठ लागतो. हे स्वामी 1826 साली गिरनारहून औदुंबर येथे आले त्यांनी इथेच तपश्चर्या केली. नंतर त्यांनी इथेच समाधी घेतली. स्वामी ब्रह्मानंदांचे शिष्य स्वामी सहजानंद यांनी औदुंबराचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. पवित्र औदुंबर क्षेत्री चैत्र मासात कृष्णामाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, श्री दत्तजयंती असे मोठे उत्सव साजरे केले जातात.  
 
या तीर्थक्षेत्री कसे जावे?
एसटीने : औदुंबर क्षेत्री जाण्यासाठी सांगली एसटी स्थानकावरून नियमित एसटी सेवा आहे. सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर मार्गावर हे क्षेत्र आहे. 
रेल्वे मार्ग : पुणे-कोल्हापूर मार्गावर भिलवडी रेल्वे स्थानक आहे. या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने 8 किमी अंतरावर असलेले औदुंबर क्षेत्री जाता येते.
 
राहाण्याची सोय : या ठिकाणी राहाण्यासाठी धर्मशाळा देखील आहे. इथे भाविकांच्या राहाण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय होऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सानंदमध्ये रंगणार 'गालिब' नाटक